Citrus Crop Management  Agrowon
ॲग्रो गाईड

Citrus Crop Management : लिंबूवर्गीय फळबागेतील पानगळ, फळावरील तपकिरी रॉट व्यवस्थापन

Team Agrowon

डॉ. योगेश वि. इंगळे, डॉ. दिनेश ह. पैठणकर

Citrus Crop : सद्यःस्थितीत आंबिया बहराची फळे ही विकसनशील अवस्थेत आहेत. रोपवाटिकेमधील कलमे, रोपे ही प्रामुख्याने नवतीवर आहेत. जुलै महिन्यामध्ये सततचे ढगाळ वातावरण आणि रिमझिम पाऊस यामुळे वातावरण बुरशीजन्य रोगांच्या प्रसारासाठी पोषक आहे. अशा वातावरणामध्ये वनस्पतिशास्त्रीय आंतरिक फळगळ, देठ सुकी, पानावरील डाग, पानगळ व फळांवर तपकिरी डाग या रोगासाठी कारणीभूत बुरशीची वाढ जोमाने होऊ शकते. त्यामुळे बागेमध्ये पानगळ व फळगळ यासाठी लक्षणे दिसून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे लिंबूवर्गीय फळबागेतील विकृती व फळगळीची लक्षणे जाणून वेळीच योग्य त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे.

फायटोफ्थोरा बुरशीच्या प्रादुर्भावाची लक्षणे

सध्या फायटोफ्थोरा बुरशीवाढीस अनुकूल वातावरण असून, तिच्या प्रादुर्भावामुळे लिंबूवर्गीय फळपिकाच्या पानावर चट्टे दिसू शकतात. तसेच तपकिरी कुज (ब्राउन रॉट) रोग उद्‍भवतो. हा रोग फायटोप्थोरा पाल्मिव्होरा आणि फायटोप्थोरा निकोशियानी या दोन प्रजातीमुळे उद्‍भवतो.

पानावरील चट्टे लक्षणे

पावसाळ्यात जमिनीलगतच्या फांद्यावरील पाने व फळांवर फायटोप्थोरा बुरशीचा प्रादुर्भाव सर्वप्रथम होतो. यामुळे पाने टोकाकडून करपल्यासारखी व मलूल होतात. अशी पाने हातात घेऊन चुरगळण्याचा प्रयत्न केल्यास त्यांची घडी होते, मात्र ही पाने फाटत नाहीत. टोकाकडून झालेले संक्रमण पूर्ण पानावर पसरून पाने तपकिरी काळे होतात. नंतर अशी पाने गळून झाडाखाली त्यांचा खच पडतो. फांद्या पर्णविरहित होतात. झाड जणू खराटे सारखे दिसते. परिणामी, अकाली फळगळ होते. पानावरील चट्ट्यांचा प्रादुर्भाव रोपवाटिकेमधील कलमे व नुकत्याच लागवड केलेल्या कलमांवर सुद्धा दिसून पडतात.

फळावरील तपकिरी रॉट किंवा फळावरील कुज लक्षणे

पानांवर प्रादुर्भाव झाल्यानंतर जमिनीलगतच्या हिरव्या फळांवर तपकिरी/ करड्या डागांची सुरुवात होते. फळे एका बाजूने करपू लागतात. फळाच्या हिरव्या सालीवर प्रादुर्भाव होऊन पूर्ण फळ हे तपकिरी काळ्या रंगाचे दिसू लागते. फळे सडून गळतात. या फळ सडीच्या अवस्थेस ‘ब्राउन रॉट’ किंवा ‘तपकिरी रॉट’ असे संबोधतात फळे खाली पडल्यानंतर फळांच्या पृष्ठभागावर पांढऱ्या बुरशीची वाढ दिसून येते. करड्या रंगाच्या फळांची तोड करून ती निरोगी फळासोबत मिसळल्यास निरोगी फळेही सडतात.

व्यवस्थापन

बागेमध्ये वाफे केलेले असल्यास त्यात पाणी साचून राहते. पावसाळ्यात वाफे मोडून टाकावेत. बागेच्या उताराच्या बाजूने शेतातील पाणी बाहेर काढावे. झाडांवर गळून पडलेल्या पानांची व फळांची त्वरित विल्हेवाट लावावी. असे रोगग्रस्त घटक बागेत किंवा बांधावर तसेच राहिल्यास त्याद्वारे रोगाचा प्रसार वाढून तीव्रता वाढते. वाफा स्वच्छ ठेवावा.

फायटोफ्थोरा बुरशीमुळे होणाऱ्या पानगळ व फळावरील तपकिरी कुज ‘ब्राऊन रॉट’ चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून संपूर्ण झाडावर फोसेटील ए.एल.* २.५ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड* (५० डब्लूपी) ३ ग्रॅम प्रति लिटर पाणी घेऊन फवारणी करावी. फवारणी करताना झाडाच्या परिघामध्येही फवारणी करावी. येथे जमिनीवरील आणि खाली पडलेल्या रोगग्रस्त घटकांवरील बुरशी व तिच्या सक्रीय बिजाणूंचा नायनाट होण्यास मदत होईल. चांगल्या परिणामासाठी या द्रावणामध्ये अन्य कोणतीही तत्सम बुरशीनाशके/कीटकनाशके/विद्राव्य खते मिसळू नयेत.

रासायनिक बुरशीनाशकांच्या फवारणीनंतर १५ दिवसाच्या नंतर ट्रायकोडर्मा हार्झियानम अधिक स्युडोमोनास फ्ल्यूरोसन्स* १०० ग्रॅम (प्रत्येकी) १ किलो शेणखतात मिसळून प्रति झाडाच्या परिघात जमिनीतून द्यावे.

कोलेटोट्रीकम बुरशीजन्य फळगळीसाठी बोर्डो मिश्रण ०.६ टक्का मिश्रणाची किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड* (५० डब्लूपी) २.५ ग्रॅम.

सध्या संशोधन प्रकल्पामध्ये ॲझोक्सिस्ट्रॉबिन अधिक डायफेनोकोनॅझोल** या संयुक्त बुरशीनाशकाच्या चाचण्या घेतल्या जात आहेत. त्यात १ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणे घेतलेल्या फवारणीचे निष्कर्ष उत्साहवर्धक असले तरी त्याला अद्याप ॲग्रेस्को शिफारस अथवा लेबल क्लेम नाही, याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी.

(नोंद: * ॲग्रेस्को शिफारस; लेबल क्लेम नाही.)

देठ सुकणे किंवा कोलेटोट्रीकम स्टेम एंड रॉट

कोलेटोट्रीकम बुरशीमुळे संत्रा फळाच्या देठाजवळ काळी रिंग तयार होऊन तो भाग काळा पडतो. अशा भाग नंतर वाढत जाऊन संपूर्ण फळ सडते. कोवळ्या फांद्यावरील पाने सुकणे व ती वाळणे ही या रोगाची सुरुवातीची लक्षणे आहेत. बरेचदा उशिरा झालेल्या संसर्गामुळे रोगग्रस्त फळे संकुचित होतात, काळे पडतात, वजनाने हलके होऊन कडक होतात. दीर्घ काळापर्यंत देठांना लटकत राहतात.

-----------

डॉ. योगेश वि. इंगळे, ९४२२७६६४३७, - डॉ. दिनेश ह. पैठणकर, ९८८१०२१२२२, (अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प - फळे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Soybean Subsidy : कापूस, सोयाबीन उत्पादकांना मिळाले ९६ कोटींचे अर्थसाह्य

Soybean Cotton Subsidy : कापूस, सोयाबीन उत्पादकांना २६५ कोटींवर अर्थसाह्य देय

MSP Procurement : ‘पणन’कडून तेरा ठिकाणी शासकीय खरेदी केंद्रे सुरू होणार

Fruit Crop Insurance : आंबा, काजू उत्पादकांना तातडीने विमा मिळावा

Soybean Cotton Subsidy : लातूरला १५१, तर धाराशिवला १४१ कोटींचे वाटप

SCROLL FOR NEXT