Sorghum Crop Agrowon
ॲग्रो गाईड

Jowar Crop : ज्वारी पिकात तयार केला हातखंडा

तारदाळ (जि. कोल्हापूर) येथील राजेंद्र बन्ने यांनी अनेक वर्षांचा अनुभव, सुधारित वाण व व्यवस्थापानातून ज्वारी पिकात हातखंडा तयार केला आहे. एकरी १३ ते १६ क्विंटलपर्यंत उत्पादन घेताना धान्यासह कडब्याला थेट ग्राहक तयार करण्यापर्यंत त्यांनी यश मिळवले आहे.

Raj Chougule

Jowar crop Story : कोल्हापूर जिल्ह्यात ऊस पिकाचे प्राबल्य आहे. असे असले तरी अनेक शेतकऱ्यांनी ज्वारी या पारंपरिक पिकाचेही उत्पादन घेण्यात सातत्य ठेवले आहे. जिल्हा बागायती असला, तरी काही भागांमध्ये अवर्षणग्रस्त परिस्थिती असते. हातकणंगले तालुक्यातील आळते, नेज, मजले, तारदाळ, खोतवाडी ही गावे याच पट्ट्यात येतात.

साहजिकच पाणी कमी असणारे शेतकरी जिरायती पिकांची निवड करतात. तारदाळ येथील राजेंद्र देवू बन्ने यांनी ऊसशेती करण्याबरोबर २५ वर्षांहून अधिक काळ ज्वारी पिकात सातत्य ठेवले आहे.

अडीच ते तीन एकरांत ज्वारी

बन्ने कुटुंबांची एकत्रित साडेदहा एकर शेती आहे. यात ऊस चार एकर आहे. माळरान व काळी भारी असे जमिनीचे दोन प्रकार आहेत. पाण्याची मुबलक सोय आहे असलेल्या ठिकाणी ऊस, तर तुलनेने कमी पाणी असणाऱ्या ठिकाणी ज्वारी असे नियोजन असते.

दरवर्षी ज्वारीचे क्षेत्र अडीच ते तीन एकर असते. काळ्या जमिनीत खरिपातील सोयाबीन भुईमूग आदी पिकांची काढणी झाल्यानंतर रब्बीमध्ये ज्वारीची लागवड केली जाते. सुरुवातीच्या काळात बन्ने मालदांडी ज्वारीची निवड करीत. त्याचे एकरी १० ते १२ क्विंटल उत्पादन मिळायचे.

अलीकडील दहा वर्षांपासून त्यांनी वाणात बदल करण्यास सुरुवात केली आहे. यात फुले रेवती या वाणावर अधिक भर दिला आहे. मागील वर्षी त्यांना फुले सुचित्रा या वाणचे बियाणेदेखील कृषी विद्यापीठाकडून मिळाले. सुधारित वाण व व्यवस्थापनातून एकरी चार ते पाच क्विंटलपर्यंत वाढ घेण्यात ते यशस्वी झाले आहेत.

व्यवस्थापनातील बाबी

सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत खरीप पीक काढून रान स्वच्छ केले जाते. ऑक्टोबरच्या कालावधीत ज्वारी पेरणीचे नियोजन असते. एकरी चार किलो बियाणे वापर होतो. कृषी महाविद्यालयाच्या सल्ल्यानुसार बीजप्रक्रिया केली जाते.

पेरणीनंतर पंधरा दिवसांनी खोडकिडा नियंत्रणासाठी कीटकनाशकाची फवारणी घेतली जाते. पेरणीच्या वेळी १०- २६- २६ दोन पोती व युरिया एक पोते अशी खते दिली जातात.

बुरशीनाशकांच्या दोन फवारण्या केल्या जातात. त्यामुळे करपा, तांबेरा रोगावर नियंत्रण मिळवता येते. पेरणीनंतर ३० व्या व ७५ व्या दिवशी पाणी दिले जाते. एकूण पीक कालावधीत दोन ते तीन वेळा पाणी नियोजन होते.

विक्री व्यवस्था

बन्ने यांच्या ज्वारीला इचलकरंजी व परिसरात ग्राहक ठरलेले आहेत. किलोला ३५ रुपये असा दर मिळतो. काही प्रमाणात व्यापाऱ्यांनाही विक्री होते. साधारण ८ ते १० फूट व त्याहून उंची असल्याने कडब्यालाही चांगली मागणी असते. त्याचेही ग्राहक ठरलेले आहेत.

एका एकरात कडब्याच्या ९०० ते एक हजार पेंढ्या मिळतात. शेकडा दोन हजार रुपये त्यास दर मिळतो. कडबा विक्रीतून सुमारे वीस हजार रुपयांचे उत्पन्न हती येते. हे उत्पन्न बोनस म्हणून ठरते. एकरी उत्पादन खर्च २० हजार रुपयांपर्यंत येतो.

मार्गदर्शनाचा फायदा

बन्ने हे बळीराजा कृषी विज्ञान मंडळाच्या माध्यमातून कृषिविषयक कार्यक्रमांमध्ये भाग घेतात. त्यांना कोल्हापूर येथील छत्रपती राजर्षी शाहू कृषी महाविद्यालयातील बाबूराव आवळे व कृषी विभागाचे कृषी सहायक कमाल बाणदार यांचे मार्गदर्शन मिळते.

त्यातून विद्यापीठाचे तंत्रज्ञान, नव्या जाती, बियाणे उपलब्धता व पेरणीपासून काढणीपर्यंत प्रत्येक टप्प्यावरील सल्ला मिळतो.

बन्ने ‘ॲग्रोवन’चे सुरुवातीपासूनचे वाचक आहेत. त्यातील यशकथा, बाजारभाव, कृषी सल्ला व हवामान अंदाजाचा मोठा उपयोग शेती व्यवस्थापनात होतो.

एकीतून प्रगती

राजेंद्र यांचे एकूण चार भावांचे संयुक्त कुटुंब आहे. पैकी राजेंद्र पूर्ण वेळ शेती पाहतात. भीमराव आर्थिक बाबी सांभाळतात. अर्जुन हातमाग व्यवसायाशी संबंधित आहेत.

तर जनावरे व्यवस्थापन आनंद पाहतात. कुटुंबात एकूण सदस्यांची संख्या १६ पर्यंत आहे. सर्वांच्या एकीमुळेच शेती सुकर व श्रम हलके करणारी झाल्याचे राजेंद्र सांगतात.

राजेंद्र बन्ने, ९४२३२०५४१३

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Politics : जिल्हा बँक, सहकारी साखर कारखाने कोल्हापूर जिल्ह्याचे सत्ता केंद्र; ६ आमदार साखर कारखानदार

Maharashtra Cabinet : पश्चिम विदर्भात अकोला, बुलडाण्याला मंत्रिपदाची आस

Vijay Wadettiwar : महायुती जिंकली अभिनंदन! पण, नवे सरकार शेतकऱ्यांसाठी काय करते? यावर आमचे लक्ष असेल; वडेट्टीवार यांचा इशारा

Sweet Sorghum Ethanol : गोड ज्वारीच्या इथेनॉल खरेदी दराला केंद्र सरकारचा खोडा?

Onion Market : हंगाम बदल, कांदा चाळ अर्थकारणाला चालना मिळेना

SCROLL FOR NEXT