Fig Crop
Fig Crop Agrowon
ॲग्रो गाईड

Fig Crop Disease : अंजिरातील एकात्मिक रोगनियंत्रण

टीम ॲग्रोवन

डॉ. युवराज बालगुडे, डॉ. प्रदीप दळवे, नितीश घोडके

महाराष्ट्रात अंजीर पिकाची लागवड (Fig Crop Cultivation) दिवसेंदिवस वाढत आहे. कमी उत्पादन खर्चामध्ये अधिक उत्पन्न देणारे पीक म्हणून अंजीर (Fig Production) ओळखले जाते. अंजीर पिकावर (Disease On Fig) इतर फळपिकांच्या तुलनेत कमी प्रमाणात कीड-रोगांचा प्रादुर्भाव (Pest-Disease On Fig Crop) आढळतो. मात्र कीड-रोगांच्या प्रादुर्भावाचा झाडांवर परिणाम होण्याची शक्यता असते.

अंजीर पिकावर प्रामुख्याने तांबेरा, ॲन्थ्रॅकनोज, फळकुज, फळावरील ठिपके व मोझॅक या रोगांचा प्रादुर्भाव आढळून येतो. यात प्रामुख्याने तांबेरा रोगामुळे अंजीर उत्पादनात मोठी घट येते. नियंत्रणासाठी योग्य उपाययोजनांचा अवलंब करणे आवश्यक आहे.

१) तांबेरा ः

- या रोगामुळे उत्पादनात सुमारे ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट येऊ शकते.

रोगकारक बुरशी ः सिरोटीलीय फिकी.

लक्षणे ः

- सुरुवातीला पानांच्या खालच्या बाजूस तपकिरी रंगाचे लहान किंचित लांबट उंच असंख्य फोड दिसतात. या फोडांमधूनच पिवळसर, तपकिरी रंगाची बुरशीची भुकटी बाहेर पडते.

- ही भुकटी म्हणजेच या बुरशीचे बीजाणू होय. या बीजाणूंचा प्रसार हवेमार्फत कित्येक किलोमीटर अंतरापर्यंत होते.

- रोगाचा प्रादुर्भाव जास्त झाल्यास, पाने पिवळी पडून गळतात. अतिरोगग्रस्त बागेत झाडांवर फक्त फळे आणि फांद्या शिल्लक राहून पूर्ण पानगळ होते. अशा बागेत फळांची योग्य वाढ होत नाही.

- प्रादुर्भावग्रस्त फळांवर लहान काळपट रंगाचे असंख्य डाग पडतात. प्रादुर्भावग्रस्त फळे पिकत नाही. कडक होतात किंवा पिकल्यानंतर लगेच खराब होतात.

- बऱ्याचवेळा तांबेराग्रस्त पानावर अल्टरनेरीया रोगचा प्रादुर्भावदेखील होतो. त्यामुळे पाने डागाळलेली दिसतात.

रोगाची लागण किंवा प्रसार ः

- बागेतील रोगग्रस्त पाने किंवा फांद्यांमार्फत रोगाची प्राथमिक लागण होण्यास मदत होते.

- रोगाचे बीजाणू हवेमार्फत रोगाचा दुय्यम प्रसार करतात.

अनुकूल वातावरण ः

- कमी तापमान (१५ ते २५ अंश सेल्सिअस).

- हवेतील आर्द्रता ८० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक.

- पावसाळ्याच्या तुलनेत थंडीच्या काळात रोगाचा प्रादुर्भाव अधिक दिसून येतो. कारण थंडीच्या दिवसांत सकाळच्या वेळी पडणारे दव रोगासाठी पोषक ठरते.

२) पानावरील ठिपके ः

हा रोग सिलिन्ड्रोक्लाडीयम स्कोपॅरियम या बुरशीमुळे होतो.

लक्षणे ः

- सुरुवातीला पानांवर तपकिरी रंगाचे बारीक डाग पडतात. पुढील काळात डागांचा आकार वाढत जातो.

- रोगाचा जास्त तीव्रतेमध्ये पानाच्या कडा गडद तपकिरी रंगाच्या दिसतात. रोगग्रस्त पाने २० ते ३० दिवस अगोदर गळून पडतात.

- हा रोग सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात मोठ्या प्रमाणात दिसून येतो.

३) अ‍ॅन्थ्रॅकनोज / करपा ः

रोगकारक बुरशी ः स्पेशेलोमा फिकी कॅरीकी, कोलेट्रोट्रीकम ग्लोसीओस्पोरायडीस (gloeosporioides)

लक्षणे ः

- पानावर लहान गोलाकार तपकिरी ठिपके दिसतात.

- रोगग्रस्त फांद्या, पाने, फळे हे अवशेष हे रोगाची लागण होण्यास मदत करतात.

- रोगाच्या बीजाणूंचे पुनर्जीवन एक ते तीन वर्षे वयाच्या फांद्यावर मे ते सप्टेंबर या काळात सर्वाधिक होते.

४) फळावरील ठिपके ः

- रोगकारक बुरशी ः ब्रोट्राटीस सिनेरिया, अल्टरनेरिया फिकी, फ्युजारियम मोनिलफॉर्म.

- फळांवर वेगवेगळ्या आकाराचे गोलाकार, वेडवाकडे तांबूस काळपट रंगाचे ठिपके दिसतात.

५) अंजीर मोझॅक (विषाणू) ः

- पानावर पिवळसर हिरवे ठिपके विखुरलेले दिसतात. असे ठिपके एकत्र येऊन पानांवर वेड्यावाकड्या आकाराचे मोठे ठिपके दिसतात. अशी पाने पांढरट दिसतात.

- फळांची संख्या अत्यंत कमी राहते.

- अंजिरावरील कोळी या किडीमार्फत या रोगाचा प्रसार होतो.

एकात्मिक रोग व्यवस्थापन ः

रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना फायदेशीर ठरतात. त्यासाठी एकात्मिक रोग नियंत्रण पद्धतींचा अवलंब करावा.

- दरवर्षी बहार धरण्यापूर्वी बागेची हलकी छाटणी करणे आवश्यक असते. त्यामुळे रोगग्रस्त फांद्यांची संख्या कमी होते. नवीन फूट जोमाने येते. त्यावर रोगाचा प्रादुर्भाव अत्यल्प असतो.

- छाटणी केल्यानंतर झाडाखाली व बागेत पडलेली रोग्रस्त पाने व फांद्या गोळा करून बागेबाहेर नेऊन नष्ट करावीत.

- बागेत हवा भरपूर प्रमाणात खेळती राहील याची दक्षता घ्यावी. बागेस गरजेनुसार पाणी द्यावे.

- छाटणी झाल्यानंतर लगेच संपूर्ण झाडावर, झाडाखाली, जमिनीवर गंधक ३०० मेश २० किलो प्रति हेक्टर प्रमाणे धुरळणी करावी किंवा पाण्यात विरघळणारे गंधक २ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.

- अंजीराला कोवळी पाने फुटल्यानंतर साधारणत: छाटणीनंतर २० दिवसांपासून,

(फवारणी ः प्रतिलिटर पाणी)

क्लोरोथॅलोनील (०.२ टक्के) २ ग्रॅम अधिक कार्बेन्डाझीम १ ग्रॅम किंवा

कार्बेन्डाझीम १ ग्रॅम अधिक मॅन्कोझेब २.५ ग्रॅम (टँक मिक्स)

यापैकी एकाची १५ दिवसांच्या अंतराने आलटून-पालटून फवारणी करावी. अंजीर काढणीच्या किमान एक महिना अगोदर फवारणी बंद करावी.

- पानांवरील ठिपके, अ‍ॅन्थ्रॅकनोज, फळावरील ठिपके ः

नियंत्रण (फवारणी ः प्रतिलिटर पाणी)

क्लोरोथॅलोनील (०.१० टक्के) १ ग्रॅम

१५ दिवसांच्या अंतराने २ ते ३ फवारण्या रोगाची तीव्रता पाहून कराव्यात.

- डॉ. युवराज बालगुडे, ९८९०३८०६५४

(वनस्पती रोगशास्त्रज्ञ, अखिल भारतीय समन्वित

कोरडवाहू फळपिके (अंजीर आणि सीताफळ) संशोधन प्रकल्प, जाधववाडी, ता. पुरंदर, जि. पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : वाढत्या उष्णतेचा पशुधनास फटका

Public Well Policy : सार्वजनिक विहिरींच्या पुनरुज्जीवनावर धोरण काय?

Agriculture Irrigation : ‘म्हैसाळ’चे पाणी माडग्याळ शिवारात

Jalgaon Lok Sabha : ...तर जळगावचे चार खासदार पोहोचतील लोकसभेत

Banana Orchard Burn : सातपुड्याच्या पायथ्याशी केळी बागा करपल्या

SCROLL FOR NEXT