Fruit Crop : तंत्र अंजीर लागवडीचे...

अंजीर लागवडीसाठी पूना अंजीर, दिनकर, एक्सेल, कोनाद्रिया, दिएन्ना, फुले राजेवाडी या जातींची निवड करावी.
Fig Cultivation
Fig CultivationAgrowon

अंजीर लागवडीसाठी (Fig Cultivation) पूना अंजीर, दिनकर, एक्सेल, कोनाद्रिया, दिएन्ना, फुले राजेवाडी या जातींची निवड करावी. झाडाचा बुंधा ४ फूट (१.२५ मीटर) उंचीपर्यंत मोकळा ठेवावा. त्यानंतर मात्र फांद्या येऊ द्याव्यात. माथ्यावर सर्व बाजूंना पसरतील अशा पुष्कळ फांद्या ठेवून वळण द्यावे.

Fig Cultivation
ब्रॅंडेड अंजीर, सीताफळाला मिळ लागली देशांतर्गत बाजारपेठ

कोरडी उष्ण हवा अंजीर फळास फार चांगली असते. ओलसर दमट हवामान घातक ठरते. अति थंडीमुळे फळात साखर तयार होण्याची क्रिया थांबते. हवेतील आर्द्रता वाढल्यास फळाला भेगा पडतात. जोराच्या पावसाच्या सरी पडून गेल्यानंतर गार वारा सुटला तर काही प्रमाणात झाडावर तांबेरा पडतो. जेथे सरासरी २५ इंच (६२५ मिमी) पाऊस पडतो आणि सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये निश्‍चितपणे थांबतो, अशा प्रदेशातील हवामान अंजिराच्या लागवडीस अनुकूल असते. कमी पावसाच्या भागात जिथे ऑक्टोबर ते मार्चपर्यंत पाण्याची सोय आहे अशा ठिकाणी अंजीर लागवडीस वाव आहे.

१) तांबूस रंगाच्या चिकण मातीच्या व पृष्ठभागाखाली ३ ते ४ फुटांवर मुरमाचा थर असलेली जमीन या फळाच्या लागवडीस उत्कृष्ट असते. चुनखडी असलेल्या तांबूस काळ्या मातीतही अंजिराची वाढ चांगली होते. मात्र खूप काळी जमीन या फळझाडाला अयोग्य असते. अंजिराची मुळे साधारणत: ३ फूट खोल जातात. तेव्हा जमिनीची निवड करताना खोल, परंतु पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. मध्यम ओल टिकवून ठेवणाऱ्या निचऱ्याच्या हलक्या जमिनीत सेंद्रिय खताचा भरपूर पुरवठा केल्यास झाडांची चांगली वाढ होते.
२) लागवडीसाठी पूना अंजीर, दिनकर, एक्सेल, कोनाद्रिया, दिएन्ना, फुले राजेवाडी या जातींची निवड करावी.
३) जमिनीची चांगली मशागत करावी. जमीन नांगरून व ढेकळे फोडून सपाट करून घ्यावी. हलक्या ते मध्यम प्रकारच्या जमिनीत अंजीर लागवडीसाठी ४.५ मीटर बाय ३ मीटर अंतरावर तर भारी जमिनीत ५ मीटर बाय ५ मीटर अंतरावर खुणा करून घ्याव्यात. खुणेच्या ठिकाणी १ मीटर बाय १ मीटर बाय १ मीटर आकारमानाचे खड्डे खोदून घ्यावेत. खड्डे भरताना तळाशी पालापाचोळ्याचा पातळ थर द्यावा. त्यानंतर १ किलो बोनमील किंवा १.५ किलो सुपर फॉस्फेट,२५ ते ३० किलो कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत आणि पोयट्याची माती यांच्या मिश्रणाने भरून घ्यावा. चांगला पाऊस झाल्यानंतर तयार कलमांची लागवड करावी. कलम लावल्यानंतर लगेच पाणी द्यावे. लागवडीनंतर सुरुवातीच्या काळात ३ ते ४ दिवसाआड पाणी द्यावे. नवीन लावलेल्या कलमांना बांबूचा आधार द्यावा.

आंतरपिकांची लागवड ः
१) पहिल्या दोन किंवा तीन वर्षांपर्यंत झाडांतील मोकळी जागा आंतरपिके घेण्यासाठी वापरली जाऊ शकते. ताग, बोरू, धैंचा वगैरेसारखी हिरवळीची पिके किंवा मटकी, मूग, उडीद, सोयाबीन लागवड करतात. यामुळे जमिनीची प्रत सुधारण्यास मदत होते.

कलमांची निगा, वळण आणि आकार ः
१) कलमांची लागवड केल्यानंतर आवश्यक तेवढी काळजी घेतल्यास एक ते दीड महिन्यात त्यांना नवी पालवी फुटते आणि वाढ सुरू होते. झाडे लहान असताना त्यांच्या बुंध्यामधून जमिनीच्या सपाटीपासूनच धुमारे (फुटवे) फुटतात. तीन ते चार सशक्त फुटवे ठेवून इतर फुटवे काढून टाकावेत, झाडे वाढवावीत.
२) झाडाचा बुंधा ४ फूट (१.२५ मीटर) उंचीपर्यंत मोकळा ठेवावा. त्यानंतर मात्र फांद्या येऊ द्याव्यात आणि माथ्यावर सर्व बाजूंना पसरतील अशा पुष्कळ फांद्या ठेवून वळण द्यावे.
३) वळण देण्याचे काम कलमांची वाढ सुरू झाल्यापासून सुरू करावे. नको असलेल्या फांद्या नियमितपणे काढाव्यात.
४) अंजिराच्या झाडास खोड किड्याचा फार मोठ्या प्रमाणात उपद्रव होतो. एकच खोड ठेवले तर खोडकिड्यामुळे संपूर्ण झाडच वाया जाण्याचा धोका असतो. परंतु तीन ते चार खोडे राखली असता एखादे खोड किडीने पोखरल्यास तेवढे खोड जमिनीलगत छाटून झाड वाचवता येते.

अन्नद्रव्य व्यवस्थापन ः
१) झाडांची जोमाने वाढ होण्यासाठी लागवडीच्या सुरुवातीच्या काळात नियमित खते द्यावीत. पूर्ण वाढलेल्या झाडास ५० किलो शेणखत, ११२५ ग्रॅम नत्र (२४४१ ग्रॅम युरिया), ३२५ ग्रॅम स्फुरद (२०३१ ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट) आणि ४१५ ग्रॅम पालाश (६९३ ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश) प्रति झाड द्यावे. यातील ५० टक्के नत्र व संपूर्ण स्फुरद आणि पालाश बहर धरताना आणि उर्वरित ५० टक्के नत्र बहर धरल्यानंतर एक महिन्याने प्रति वर्ष द्यावे.
२) जमिनीत अन्नद्रव्याचे प्रमाण योग्य ठेवण्यासाठी खतांचा संतुलित वापर करणे आवश्यक असते. सेंद्रिय खते वापरणे अत्यंत गरजेचे असते. बहर नियोजन करताना निंबोळी पेंड, जिवाणू संवर्धक, हिरवळीचे खत, गांडूळ खत, योग्य आच्छादन व पिकांचे अवशेषांचा वापर महत्त्वाचा आहे.
३) झाडांना कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, गंधक, बोरॉन, जस्त, लोह, मॉलिब्डेनम, मँगेनीज, तांबे इत्यादी सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज असते. ही अन्नद्रव्ये योग्य प्रमाणात व योग्य वेळी द्यावीत.


पाणी व्यवस्थापन ः
१) झाडाच्या वाढीबरोबर पाण्याची गरज वाढते. जमिनीच्या मगदुरानुसार भारी जमिनीत ७ ते ८, मध्यम जमिनीत ५ ते ६ आणि हलक्या जमिनीत ३ ते ४ दिवसांनी संरक्षित पाणी द्यावे. फळ वाढीच्या काळात पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी.
२) जमिनीत जास्त ओलावा टिकून राहिल्यास फळे भेगाळण्याचे प्रमाण वाढते. पाणी देत असताना बुंध्यापाशी पाणी साचून राहणार नाही, याकडे लक्ष द्यावे. यासाठी खोडालगत मातीची भर लावावी.
३) ठिबक सिंचन पद्धतीने पाणी दिल्यास झाडापर्यंत पाटातून वाया जाणारे ६० ते ७० टक्के पाणी वाचवता येते, खते पाण्यात मिसळून देता येत असल्याने खतांच्या मात्रेत २५ ते ३० टक्के बचत होते. तणांचा प्रादुर्भाव कमी होतो.

Fig Cultivation
अंजीर पिकातील तांबेरा नियंत्रण

बहराचे नियोजन ः
१) अंजिराला दोन वेळा बहर येतो. पावसाळ्यात येणाऱ्या बहराला खट्टा आणि उन्हाळ्यात येणाऱ्या बहराला मीठा बहर म्हणतात. खट्टा बहरातील फळे ऑक्टोबर ते जानेवारी महिन्यापर्यंत तयार होतात, परंतु ती आंबट व बेचव असतात.
२) मीठा बहरातील फळे मार्च-एप्रिलमध्ये तयार होतात. या बहरातील फळांचा दर्जा चांगल्या प्रतीचा असल्याने चांगला बाजारभाव मिळतो.
३) लागवडीच्या दुसऱ्या वर्षापासून तुरळक फळे येऊ लागतात, परंतु फळांचे उत्पादन पहिल्या तीन वर्षांपर्यंत घेऊ नये. सातव्या-आठव्या वर्षापासून उत्पादन वाढत जाते. त्यानंतर २० ते २५ वर्षे बाग नियमितपणे भरपूर फळे देते.
४) फळ तयार होण्यास सुमारे १२० ते १४० दिवसांचा कालावधी लागतो. फळांचा हंगाम एप्रिल अखेरपर्यंत चालू राहतो. फळांचा हिरवा रंग जाऊन फिक्कट हिरवा अंजिरी-विटकरी लालसर जांभळा रंग येऊ लागतो. फळांचा कडकपणा जाऊन फळे मऊ होऊ लागतात. निगा राखल्यास एका झाडापासून सरासरी २५ ते ३० किलो फळे मिळतात.

आरोग्यदायी महत्त्व ः
१) पोषणदृष्ट्या, औषधीदृष्ट्या आणि व्यापारीदृष्ट्या अंजीर हे अतिशय महत्त्वाचे फळ.
२) अंजिराचा उष्मांक ७५ आणि अन्नमूल्य निर्देशांक ११ म्हणजेच सफरचंदापेक्षाही जास्त.
३) फळामध्ये साखर, लोह, चुना, तांबे तसेच अ आणि ब जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात उपलब्ध.
४) आम्लतेचे प्रमाण नगण्य असल्यामुळे हे फळ गोड.
५) ताजे किंवा सुके अंजीर टॉनिकसारखे उपयोगी पडते. रक्तातील लोहाची कमतरता भरून काढण्यात अंजिराचा फार मोठा उपयोग होतो.
६) अंजीर हे सौम्य रेचक असून, शक्तीवर्धक, पित्तनाशक व रक्तशुद्धी करणारे असल्यामुळे इतर फळांपेक्षा अधिक पोषक आहे.

अभिवृद्धी
१) अभिवृद्धी चांगले भरपूर उत्पादन देणाऱ्या झाडांची फाटे कलम लावून केली जाते. इतर पद्धतीपेक्षा सोईस्कर, स्वस्त, कमी श्रमाची व जलद पद्धत म्हणून फाटे कलम पद्धत सर्वत्र फार लोकप्रिय आहे. यासाठी साधारणत: ८ ते १२ महिने वयाच्या फांद्या कलमासाठी निवडाव्यात.
२) फाटे कलम तयार करताना फांदीच्या शेंड्याकडील भाग घ्यावा. फांदीची जाडी अर्ध्या इंचापेक्षा जास्त असू नये. निवडलेली फांदी १० ते १५ सेंमी लांब आणि किमान ४ ते ६ टपोरे सुदृढ डोळे असणारी असावी.
३) फांदीवरील सर्व पाने डोळ्यांना इजा होऊ न देता काढून टाकावीत. फाटे कलमे गादीवाफ्यावर ३० सेंमी अंतरावर लावावीत. छाट कलमांना खालच्या बाजूस आयबीए हे संजीवक लावले तर कलमास लवकर मुळ्या फुटतात.
४) गुटी कलमाच्या साह्याने सुद्धा अंजिराची अभिवृद्धी करता येते. जून महिन्यात एक वर्ष वयाच्या फांदीवर गुटी कलम केल्यास ऑगस्ट, सप्टेंबरपर्यंत कलमे शेतात लावण्यास तयार होतात.

संपर्क ः डॉ. प्रदीप दळवे, ८९८३३१०१८५
(अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू फळपिके (अंजीर आणि सीताफळ) संशोधन प्रकल्प,
जाधववाडी, ता. पुरंदर, जि. पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com