Silk industry Agrowon
ॲग्रो गाईड

Silkworm Pest : रेशीम कीटकावरील उझी माशीचे एकात्मिक नियंत्रण

उझी माशी ही रेशीम कीटकावर उपजीविका करणारी परोपजीवी कीड आहे. या किडीचा प्रादुर्भाव कमी अधिक प्रमाणात दिसून येत आहे. यामुळे कोषांचे १५ ते २० टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते. रेशीम उद्योग करणाऱ्या शेतकऱ्यांनी उझी माशीचा जीवनक्रम, प्रादुर्भाव लक्षणे जाणून वेळीच नियंत्रणाचे एकात्मिक उपाय योजावेत.

टीम ॲग्रोवन

रेशीम उद्योगामध्ये (Silk industry) उझी माशीचा प्रादुर्भाव (Silkworm Pest) वर्षभर आढळत असला तरी ऑगस्ट ते नोव्हेंबर या दरम्यान जास्त प्रादुर्भाव राहतो. बदलता पाऊस, तापमान आणि आर्द्रतेनुसार उझी माशीची अंडी देण्याची क्षमता बदलते. पावसाळा आणि हिवाळ्यात उझी माशीचा जास्त प्रमाणात प्रादुर्भाव आढळतो. उन्हाळ्यात (मार्च ते जून) ३२ ते ४२ अंश सेल्सिअस तापमानामुळे उझी माशीचा प्रादुर्भाव कमी दिसून येतो.

जीवनक्रम

चार अवस्था : अंडी, मॅगट, कोष, प्रौढ माशी.

उझी माशीची मादी एका वेळी ४०० ते ५०० पांढऱ्या दुधाळ रंगाची अंडी देते. ही उझी मादी रेशीम अळीच्या वाढीच्या चौथ्या किंवा पाचव्या अवस्थेत १ ते २ अंडी त्वचेवर टाकते. अंडी उबवण काळ ४८ ते ६२ तासांचा असतो.

म्हणजेच २ ते ३ दिवसांत अंड्यातून अळी (मॅगट) बाहेर येते. ही मॅगट तिच्या छाती जवळील हूकच्या साह्याने छिद्र करून रेशीम कीटकाच्या शरीरात प्रवेश करते. त्यामुळे तिथे काळा डाग पडतो. फिक्कट पिवळसर अळी अवस्था ६ ते ८ दिवसांची राहते. अळीचे लालसर तपकिरी कोषात रूपांतर होऊन कोष अवस्था १० ते १२ दिवसांची असते. हा जीवनक्रम १८ ते २२ दिवसांत पूर्ण होतो.

प्रादुर्भावाची लक्षणे : रेशीम अळ्यांच्या शरीरावर काळे डाग दिसतात. कोषाच्या टोकाला गोलाकार छिद्र दिसते. रेशीम कोष तयार झाल्यास संगोपन ट्रेमध्ये उझी माशीचे तपकिरी रंगाचे कोष दिसतात.

उझी माशी नियंत्रणाचे उपाय संगोपनगृहाची स्वच्छता

राज्यामध्ये बहुतांश सर्व संगोपनगृह हे कच्चे किंवा शेडनेटपासून बनवलेले आहेत. जसजसे शक्य होईल, तसे त्याचे पक्के सिमेंट क्राँक्रीटमध्ये बांधकाम करावे. शिफारशीप्रमाणे दरवाजे खिडक्या आणि हवा खेळती राहण्याची व्यवस्था करावी.

सर्व खिडक्या व दरवाजांना नायलॉन वायर मेश जाळी लावून घ्यावी. म्हणजे उझी माशी कीटक संगोपनगृहात सरळ प्रवेश करणार नाही. तुती पानांच्या साठवणीसाठी वेगळी अंधारी खोली असावी. फांदी खाद्य देतेवेळी उझी माशी फांद्या किंवा पानांद्वारे सरळ संगोपनगृहात प्रवेश करते. कोष विक्री केल्यानंतर बाजारातून पोते घरी आणू नये. कारण तेथून उझी माशीच्या अळ्या, कोष आपल्या संगोपनगृहात येण्याची शक्यता असते.

रेशीम कीटकांची विष्ठा शेतात उघड्यावर न फेकता खताच्या खड्ड्यात गाडून टाकावी. कारण विष्ठेत उझी माशीच्या सुप्त अवस्था (कोष) असतात. प्रादुर्भावग्रस्त गावात एप्रिल ते मे महिना रेशीम कोषाचे पीक बंद ठेवावे

संगोपनगृहाचे व्यवस्थापन

संगोपनगृह, कोष खरेदी केंद्र, धागा निर्मिती केंद्र अशा सर्व ठिकाणी अळ्या, कोष गोळा करून जाळून नष्ट करावेत. या सर्व ठिकाणच्या जमिनीच्या भेगा बुजवून घ्याव्यात. संगोपनगृहातील खिडक्या व दरवाजावर १०० अंडी पुंजांसाठी २ कामगंध सापळे २० फूट अंतरावर लावावेत. त्यामध्ये वापरलेल्या ल्यूरकडे नर माशी आकर्षित होते. त्यामुळे प्रजननामध्ये अडथळा येऊन उझी माशीच्या पुढील उत्पत्तीस आळा बसतो.

उझी ट्रॅप म्हणजे एक लिटर पाण्यात उझीनाशकाची एक गोळी टाकून द्रावण तयार करावे. पांढऱ्या रंगाच्या प्लॅस्टिक ट्रेमध्ये हे द्रावण ओतावे. हे द्रावण पिवळ्या रंगाचे असते. हा ट्रे संगोपनगृहाच्या खिडकीच्या आतील व बाहेरील बाजूस ठेवावा. पिवळ्या रंगाकडे उझी माशी आकर्षित होऊन ट्रेमध्ये पडते.

गोळा केलेल्या अळ्या, कोष डिटर्जंटच्या द्रावणात टाकून नष्ट करावेत. रेशीम कीटकाच्या तिसऱ्या अवस्थेपासून पुढे उझी माशीचे सापळे कोष विणन काळापर्यंत रॅकवर लावावेत. रेशीम कीटकांना उझीनाशक गोळी किंवा सापळ्यांचा त्रास होत नाही.

जैविक पद्धतीने नियंत्रण

उझी माशीच्या कोषावर उपजीविका करणारे लिसोलायनेक्स थायमस हे परोपजीवी कीटक संगोपनगृहात रेशीम कीटकांनी चौथी कात टाकल्यानंतर तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी सोडावेत. १०० अंडीपुंजांसाठी परोपजीवी कीटकांचे दोन पाऊच लागतात. रेशीम कीटक कोषावर गेल्यानंतर लिसोलायनेक्स थायमस परोपजीवी कीटकांचे पाऊच चंद्रिकेजवळ ठेवावेत. कोष काढणीनंतर खताच्या खड्ड्याजवळ ठेवावेत.

केंद्रीय रेशीम संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, म्हैसूर येथून अगोदर पैसे भरून मागणी केली तर पोष्ट किंवा कुरियरच्या साह्याने परोपजीवी कीटकांचे पाऊच पाठवले जातात.अशा एकात्मिक पद्धतीचा वापर केल्यास उझी माशीमुळे होणारे रेशीम कोषाचे नुकसान टाळता येते.

- डॉ. चंद्रकांत लटपटे, ७५८८६१२६२२

- डॉ. संजोग बोकन, ९९२१७५२०००

(रेशीम संशोधन योजना, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT