मुकुंद पिंगळे : ॲग्रोवन वृत्तसेवा
नाशिक : कांदा उत्पादनात (Onion Production) राज्यात आघाडीवर असलेल्या नाशिक जिल्ह्यात चालू वर्षीचा खरीप (Kharif) व लेट खरीप हंगाम (Kharif Season) अडचणीत सापडल्याची स्थिती आहे. खरीप कांदा लागवड मागील वर्षीच्या तुलनेने १७२९.५५ हेक्टरने, तर लेट खरीप कांद्याच्या लागवडी ११७९३.६० हेक्टरनी घटल्या आहेत. खरीप कांद्याची काढणी दसऱ्यापासून सुरू झाली. मात्र उत्पादनात व प्रतवारीत मोठी घसरण झाली. त्यामुळे आवक कमी आहे. तर लेट खरिपात ५० टक्क्यांवर लागवडी कमी आहेत. दिवाळीनंतर लागवडी वेगाने सुरू झाल्या. मात्र लागवड हंगाम लांबणीवर जाण्याची स्थिती आहे.
जिल्ह्यात प्रामुख्याने चांदवड, नांदगाव, येवला, निफाड, सिन्नर, देवळा व कळवण हे खरीप कांदा लागवडीसाठी प्रमुख तालुके आहेत. खरीप हंगामात चालू वर्षी चांदवड, मालेगाव, नांदगाव तालुक्यांत वाढ दिसून आली. तर येवला, सटाणा, निफाड, सिन्नर, देवळा तालुक्यांत लागवडीत मोठी घट दिसून आली. तर कळवण तालुक्यात लागवड शून्यावर आली आहे. चांदवड, मालेगाव, देवळा, नांदगाव तालुक्यांत काढणी सुरू झाली आहे. मात्र उत्पादकता व गुणवत्तेवर मोठा परिणाम दिसून येत आहे. सुरुवातीला लागवडी, तर नंतर काढणी अडचणीत सापडल्याची स्थिती आहे.
कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, (ता. २० ऑक्टोबरअखेर) कांदा उत्पादक पट्ट्यात लेट खरीप हंगामातील लागवडी सुरू आहेत. मात्र सप्टेंबर व ऑक्टोबरमधील पावसामुळे रोपवाटिकांचे नुकसान वाढले. परिणामी, दसऱ्यानंतर रोपांची अल्प उपलब्धता व मजूरटंचाईमुळे लागवड प्रभावित झाली आहे. त्यामुळे लागवडीत मोठी घट आली आहे. नांदगाव व सटाणा तालुक्यांत लागवडी वाढल्या. मात्र चांदवड व मालेगाव तालुक्यांत लागवडीत लक्षणीय घट झाली आहे. येवला, कळवण, देवळा, निफाड तालुक्यांत लागवडी कमी आहेत. तर सिन्नरला अद्याप लागवड झालेलीच नाही.
बुरशीजन्य रोगांचा विळखा वाढला आहे. ऑक्टोबरमधील अतिवृष्टीसदृश पावसामुळे अनेक ठिकाणी रोपवाटिका बाधित झाल्या तर लागवडी अक्षरशः पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेल्या. त्यामुळे आगामी काळात उत्पादनावर परिणाम होण्याचा अंदाज आहे.
...यामुळे कांदा हंगाम प्रभावित
- अतिवृष्टी, सततच्या पावसामुळे रोपवाटिकांचे नुकसान
- रोपांची उपलब्धता न झाल्याने लागवडीत घट
- मजूरटंचाईमुळे लेट खरीप लागवडी लांबणीवर
- लागवड क्षेत्रात पाणी साचून राहिल्याने वाढीवर परिणाम
- बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव
- कंद सड, वाढ व आकाराची समस्येने चिंगळीचे प्रमाण अधिक
खरीप व लेट खरीप कांदा लागवडीची तुलनात्मक स्थिती (२० ऑक्टोबरअखेर) ः
तालुका...खरीप २०२१-२२...लेट खरीप २०२१-२२
निफाड...१८०.५५/३९....६८.५०/६७.९
सिन्नर...३२५/३२...३०१/०
येवला...८,३२७/६,०३९...२,७६९/२,३७१
चांदवड...९,१८८/१०,७७७....१२,८१९.४०/५,७५३
मालेगाव...३,८९०/५,४००....७,६३६/३,१०७
सटाणा...२,६५०...३००...१,११०/१,६४५
नांदगाव...१,९७८/३,५६३...४८६/२,३७२
कळवण...२२६/०...४१८/१९०
देवळा...२,५७४/१,४५९...२,२६९/८१७.१
नाशिक जिल्ह्यातील एकूण लागवड :
वर्ष...खरीप...लेट खरीप
२०२१...२९,३३८.५५...२८,११६.६०
२०२२...२७,६०९...१६,३२३
झालेली घट...१,७२९.५५...११,७९३.६०
एकंदरीत कांदा लागवड ही ४० टक्के कमी झाली आहे. खरिपाच्या लागवडी अति पावसामुळे सडून गेल्या. रोपवाटिका पण खराब
झाल्या. त्यामुळे लेट खरीप लागवडी पण कमीच आहेत.
- रघुनाथ खैरनार, कांदा उत्पादक, सायगाव, ता. येवला
पावसामुळे लाल कांदा व लेट कांद्याचे मोठे नुकसान झाले. रोपे पावसाने खराब झाली. त्यामुळे रोपांची उपलब्धता अत्यंत कमी असून ६० टक्के लागवडी कमी आहेत.
- मंगेश कातकाडे, कांदा उत्पादक, नायगाव, ता. सिन्नर
कोळगाव, ता. येवला : मजूरटंचाई, विजेचा लपंडाव त्यातच रोपांची उपलब्धता कमी अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी लेट खरीप कांद्याच्या लागवडी पूर्ण केल्या आहेत. येथील शेतकरी जनार्दन कमोदकर यांच्या शेतात सुरू असलेले लागवडीचे काम.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.