Poultry Diseases Agrowon
ॲग्रो गाईड

Poultry Diseases : कोंबड्यांमधील ‘इन्क्लुजन बॉडी हेप्याटायटिस’

Poultry Farming : सद्यपरिस्थितीत पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात कोंबड्यांमध्ये ‘इन्क्लुजन बॉडी हेप्याटायटिस’ आजाराची साथ दिसून येत आहे. हा आजार लहान ब्रॉयलर कोंबड्यांना होतो.

Team Agrowon

डॉ. भूपेश कामडी, डॉ. विठ्ठल धायगुडे
Poultry : सद्यपरिस्थितीत पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात कोंबड्यांमध्ये ‘इन्क्लुजन बॉडी हेप्याटायटिस’ आजाराची साथ दिसून येत आहे. हा आजार लहान ब्रॉयलर कोंबड्यांना होतो. बाधित कोंबड्यांमध्ये अचानक मरतुक सुरू होते. हे लक्षात घेता तातडीने उपाययोजना करावी.

कोंबड्यांमधील इन्क्लुजन बॉडी हेप्याटायटिस हा अत्यंत महत्त्वाचा आजार आहे. प्रामुख्याने ३ ते ७ आठवडे वयाच्या कोंबड्यांमध्ये हा आजार अधिक प्रमाणत दिसून येतो. हा अत्यंत तीव्र स्वरूपाचा आजार असून, यामध्ये बाधित कोंबडीच्या यकृताला इजा होते

प्रामुख्याने हा आजार लहान ब्रॉयलर कोंबड्यांना होत असला, तरी या आजाराचा प्रादुर्भाव वयाने मोठे असलेल्या कोंबड्या, कबुतर तसेच इतर जंगली पक्ष्यांमध्ये दिसतो. आजाराचे वैशिष्ट्य म्हणजे बाधित कोंबड्यांमध्ये अचानक मरतुक सुरू होते. ही मरतुक जवळपास २५ टक्क्यांपर्यंत जाऊ शकते. हा आजार एवियन एडिनो नावाच्या विषाणूमुळे होतो.

प्रसार :
१) प्रसार अंड्यामार्फत कोंबड्यांकडून पिलांना होतो. आजाराचे विषाणू बाधित कोंबडीच्या विष्ठेवाटे येत असल्यामुळे सभोवतालचे वातावरण तसेच खाद्य, खाद्याची भांडी दूषित होतात. त्याद्वारे इतर कोंबड्यांना या विषाणूचा प्रादुर्भाव होऊन त्या आजार पडतात.
२) प्रादुर्भाव झाल्यानंतर कोंबड्यांमध्ये अचानक मरतुक सुरू होते. मरतुकीचा आलेख पाचव्या दिवसापर्यंत वाढत जातो, त्यानंतर कमी होतो.
३) आजाराच्या सुरुवातीच्या दहा दिवसांत जवळपास २५ टक्यांपर्यंत मरतुक होऊ शकते. या सोबतच कोंबड्यांमध्ये इतर प्रतिकार शक्ती कमी करणाऱ्या आजारांची जसे की गंबोरो किंवा चिकन इन्फेक्शियस अनेमिया यांचा प्रादुर्भाव झाल्यास मरतुकीचे प्रमाण वाढू शकते.

लक्षणे :
१) बाधित झालेल्या कोंबड्या निस्तेज, अशक्त दिसतात. पिसे विस्कटलेली दिसतात.
२) कोंबड्या शेडमध्ये एकाच ठिकाणी डोळे लावून उभ्या असतात. त्यांची विष्ठा पिवळी चिकट स्वरूपाची होते.
३) आजारी कोंबडी खाद्य कमी खाते. अंडी उत्पादनात घट होते. तसेच एफसीआर वाढतो. बाधित कोंबडीमध्ये रक्तल्पता किंवा पिलियासारखी लक्षणे दिसतात.
४) बाधित कोंबडीचे शवविच्छेदन केले असता यकृतामध्ये अधिक प्रमाणत बदल झाल्याचे आढळून येते. यकृतावर सूज येऊन काही यकृत पेशी मृत पावतात, त्यामुळे यकृत नेहमीपेक्षा पांढरट पडते. त्यावर वेगवेगळ्या रंगाच्या छटा दिसतात. सोबतच यकृतावर रक्तस्राव झाल्याचे आढळते.
५) बऱ्याच बाधित कोंबडीच्या हृदयाच्या पिशवीमध्ये पाणी जमा होते. त्यामुळेच या आजाराला हेप्याटायटिस हायड्रोपेरीकार्डियम सिंड्रोम असे म्हणतात.
६) फिक्कट पांढरा अतिसार होतो. सोबतच मूत्रपिंडावर सूज येते. थायमस, स्प्लीन अवयवांना अपाय होतो.

निदान:
१) आजाराचे निदान कोंबडीतील विशिष्ट लक्षणे व शवविच्छेदनात आंतरिक अवयामंध्ये आढळलेले विशिष्ठ बदल यावरून केले जाते.
२) आजाराची पुष्ठी करण्यासाठी यकृताचे उती परीक्षण केले जाते. यामध्ये यकृतपेशीमध्ये विषाणूंचे इन्क्लूजन दिसतात, म्हणूनच या आजाराला इन्क्लुजन बॉडी हेप्याटायटिस असे म्हणतात.

प्रतिबंध आणि उपचार:
१) आजार विषाणूजन्य असल्यामुळे हमखास उपचार नाहीत. सोबतचे जिवाणूजन्य आजार रोखण्यासाठी पशुवैद्यकांच्या सल्ल्याने प्रतिजैवकांचा वापर करावा. सोबतच इतर प्रतिकारशक्ती कमी करणारे आजार होणार नाहीत याची काळजी घ्यावी.
२) लिव्हर टॉनिक आणि इतर औषधे दिल्यास थोड्या प्रमाणात फरक पडतो.
३) मुख्यतः हा आजार अंड्यांवाटे पिलांमध्ये पसरत असल्यामुळे, अंडी देणाऱ्या कोंबड्यांना विषाणूची बाधा होणार नाही याची काळजी घ्यावी. वारंवार या आजाराचा उद्रेक होत असलेल्या भागांमध्ये अंडी देणाऱ्या कोंबड्यांचे लसीकरण करणे गरजेचे आहे.
--------------------------------------------------------
- डॉ. व्ही. एस. धायगुडे, ९८६०५३४४८२
(क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

GM Mustard : जीएमला परवानगी दिली तर तेलबिया उत्पादन वाढेल; जीएमला परवानगी देण्याची उद्योगांची मागणी

MPKV Rahuri : महात्मा फुले कृषी विद्यापीठाला युवक महोत्सवात दोन सुवर्णपदके

Sangli Vote Percentage : मतदानाचा टक्का वाढला; सांगलीत फायदा कोणाला?

Assembly Election Voting : अहिल्यानगर जिल्ह्यात विधानसभेला मतदानात वाढ

Leopard Terror : अजिंठा डोंगर परिसरात बिबट्यांची दहशत

SCROLL FOR NEXT