
New Delhi News: देशाच्या विविध भागांत पावसाचे थैमान सुरू असून, काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. उत्तर प्रदेश, मेघालय, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगालसह केरळ आणि दक्षिणेच्या काही राज्यांतही पावसाने हजेरी लावली आहे.
केरळमध्ये मुसळधार पाऊस
तिरुअनंतपुरम : केरळच्या विविध भागांत सोमवारी (ता. ४) आणि मंगळवारी (ता. ५) झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांतील रस्ते आणि सखल भाग जलमय झाले असून, नद्या व धरणांतील पाणीपातळी वाढली आहे. राज्यात पावसाचा जोर कायम राहिल्यामुळे भारतीय हवामान विभागाने अर्नाकुलम, इडुक्की आणि त्रिशूर जिल्ह्यांसाठी ‘रेड अॅलर्ट’ जारी केला आहे. याशिवाय, पाच इतर जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज ॲलर्ट’ आणि उर्वरित सहा जिल्ह्यांसाठी यलो अॅलर्ट’ जारी करण्यात आले आहेत.
पूरग्रस्त भागाला ममतांची भेट
कामारपूकर (पश्चिम बंगाल) : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी (ता. ५) हुगळी जिल्ह्यातील पूरग्रस्त कामारपूकर येथे भेट दिली. बॅनर्जी यांच्याकडून मदत केंद्रात आश्रय घेतलेल्या नागरिकांना अन्नपदार्थांचे वाटप करण्यात आले. दक्षिण पश्चिम बंगालमधील पश्चिम मेदिनीपूर, हुगळी आणि हावडा येथे पुराचा फटका सर्वाधिक बसला असून, मुसळधार पावसामुळे आणि नद्यांच्या पाणीपातळीमध्ये वाढ झाली आहे. दामोदर व्हॅली कॉर्पोरेशनवर (डीव्हीसी) ममता बॅनर्जी यांनी टीका केली होती. केंद्र सरकारच्या अखत्यारीतील या संस्थेने त्यांच्या जलाशयांमधून सन २०२३ च्या तुलनेमध्ये ३० पट अधिक पाण्याचा विसर्ग केल्याने पूरस्थिती निर्माण झाल्याचा आरोप ममतांनी केला आहे.
वाराणसीमध्ये शाळा बंद
वाराणसी : मुसळधार पावसाने वाराणसीमध्ये ५ आणि ६ ऑगस्ट रोजी सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नमो घाटासह विविध घाटांवरील पाण्याची पातळी वाढली असून, नागरिकांना गुडघाभर पाण्यातून चालत जावे लागले, असे स्थानिकांनी सांगितले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पूरग्रस्त १२ जिल्ह्यांमधील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी ११ सदस्यांच्या मंत्र्यांची टीम तैनात केली आहे. त्यांनी मंत्र्यांना आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना नागरिकांना आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आदेश दिले आहेत.
हिमाचलमध्ये तीन जणांचा मृत्यू
सिमला : हिमाचल प्रदेशात जोरदार पाऊस सुरू असून, पावसामुळे अपघातही होत आहेत. हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यात मोटार दरीत कोसळल्यामुळे तीन जण ठार झाले, तर दोघे गंभीर जखमी झाले. मग्रुगला आणि माजवाल दरम्यान सैनी नाल्याजवळ निसरड्या रस्त्यावर हा अपघात झाला. या अपघातात तीन जण ठार झाले आणि चालकासह दोन जण जखमी झाले. माहितीप्रमाणे, हे पाचही जण शंकरदेहरा येथे सफरचंद विक्रीसाठी गेले होते आणि घरी परतत होते. गेले दोन दिवस येथे जोरदार पाऊस सुरू आहे.
मेघालयात पावसाचा इशारा
शिलाँग : मेघालयामध्ये सध्या पाऊस पडत असून, पुढील पाच दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून, नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. खासी हिल्स, इस्ट खासी हिल्स येथे जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाला अॅलर्टवर राहण्यास सांगितले असून, आवश्यकता भासल्यास नागरिकांचे स्थलांतर करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.