Poultry Disease : कोंबड्यांमधील विषाणूजन्य आजारांवर उपचार

Poultry Disease Control : कोंबड्यांमधील विषाणूजन्य आजारांच्यावर परिणामकारक औषधोपचार उपलब्ध नाहीत. त्यामुळे शेडची स्वच्छता, योग्य वेळी लसीकरण आणि जैवसुरक्षेची उपाय योजना महत्त्वाची आहे. विषाणूजन्य आजाराची लक्षणे ओळखून उपाययोजना महत्त्वाच्या आहेत.
Poultry Diseases
Poultry DiseasesAgrowon
Published on
Updated on

डॉ. व्ही. एस. धायगुडे, डॉ. बी. पी. कामडी
Poultry Disease Management : कोंबड्यांमधील विषाणूजन्य आजारांच्यावर परिणामकारक औषधोपचार उपलब्ध नाहीत. त्यामुळे शेडची स्वच्छता, योग्य वेळी लसीकरण आणि जैवसुरक्षेची उपाय योजना महत्त्वाची आहे. विषाणूजन्य आजाराची लक्षणे ओळखून उपाययोजना महत्त्वाच्या आहेत.


कोंबड्यांमधील विषाणूजन्य आजारांना प्रतिबंध घालणे आवश्यक असते कारण या आजारांच्यावर परिणामकारक औषधोपचार उपलब्ध नाहीत. बर्ड फ्लू, मानमोडी, गंबोरो, मरेक्स, देवी, इनफेक्शियश लॅरिंगोट्रकायटीस, इन्फेक्शियस ब्राँकायटीस, चिकन इन्फेक्शियस अ‍ॅनेमिया हे विषाणूजन्य आजार आहेत.

बर्ड फ्लू ः
१) विषाणू आजारी कोंबड्यांचा श्‍वासोच्छ्वास तसेच हगवणीतून बाहेर पडतात. दूषित खाद्य आणि पाण्यामधून तोंडाद्वारे निरोगी कोंबडीच्या शरीरात प्रवेश करतात. हा आजार सर्व वयोगटातील कोंबड्यांना होतो. अतिशय तीव्र स्वरूपात मोठी मरतूक होऊ शकते.
२) आजारी कोंबड्यांना श्‍वासोच्छ्वासास त्रास, घशातून घरघर आवाज, डोळ्यांतून अतिस्राव होतो. डोके तोंड आणि पायावरची त्वचा निळसर काळपट पडते. तुरा आणि गलोल सुजतो, निळसर होतो.
३) लक्षणे दिसताच तातडीने उपचार सुरू करावेत. या आजारावर परिणामकारक औषधोपचार उपलब्ध नाहीत. आजार होऊ न देणे हाच उपाय आहे.

प्रतिबंधात्मक उपाय
१) जैवसुरक्षात्मक उपाय महत्त्वाचे आहेत. पोल्ट्रीफार्म लोकवस्तीपासून दूर असावा. निचऱ्याच्या ठिकाणी बांधावा. जंगली पक्षी आणि इतर प्राण्यांना आत येण्यास अटकाव करावा.
२) शेडच्या भिंती तसेच जमिनीचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण करावे. शेडच्या दरवाजाजवळ चप्पल /बुटांचे निर्जंतुकीकरणासाठी फुटबाथ बांधावेत. मृत कोंबड्यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावावी. भारतात या आजारासाठी लसीकरण केले जात नाही.

Poultry Diseases
Poultry : पक्ष्यांमधील आजारांवर वेळीच करा उपचार

मानमोडी :
१) लहान वयाच्या कोंबड्यांमध्ये तीव्र स्वरूपाची लक्षणे दिसतात, तसेच त्यांच्यामध्ये मरतुकही जास्त प्रमाणात असते.
२) श्‍वासोच्छ्वासास त्रास होतो, तोंड उघडे ठेवून श्‍वास घेतात. मानमोडी आणि लकवा मारणे ही प्रमुख लक्षणे आढळतात. मोठ्या प्रमाणात मरतुक होते.
२) लक्षणे दिसताच पशुवैद्यकांच्या सल्ल्यानुसार फक्त निरोगी कोंबड्यांना लसीकरण करावे.
२) आजारास उपचार उपलब्ध नाहीत. बचाव करण्यासाठी लसीकरण, योग्य व्यवस्थापन, स्वच्छता आणि जैवसुरक्षेचे इतर घटक अतिशय महत्त्वाचे आहेत.
३) मांसल कोंबड्यामध्ये ६ ते ७ व्या दिवशी आणि १८ ते २१ व्या दिवशी असे दोनदा लसीकरण करावे. अंड्यावरील कोंबड्यामध्ये वयाच्या सातव्या आणि तेविसाव्या दिवशी तसेच आठव्या आणि बाराव्या आठवड्यात लासोटा लस द्यावी. तेराव्या आठवड्यात आर.टु.बी. ही लस द्यावी. त्यानंतर प्रत्येक ८ आठवड्यांनंतर लासोटा ही लस द्यावी.

गंबोरो :
हा अतिशय संसर्गजन्य आजार आहे. प्रामुख्याने ३ ते ६ आठवडे वयापर्यंतच्या कोंबडीमध्ये तीव्र स्वरूपाचा पाहावयास मिळतो. यामध्ये मोठ्या प्रमाणात मरतुक होते.
२) बरे झालेल्या कोंबड्यांची रोगप्रतिकारक क्षमता खालावल्याने इतर आजारास बळी पडतात.
३) साथ येऊन गेल्यानंतर हा विषाणू पोल्ट्री शेड तसेच पाणी, खाद्य, विष्ठा इत्यादीमध्ये साधारणत: २ ते ३ महिने जिवंत राहतो.

४) विषाणूचा प्रसार प्रामुख्याने तोंडाद्वारे होतो.आजाराच्या सुरुवातीला काही कोंबड्या गुदद्वारास टोच्या मारतात, पांढरट हगवण होणे, डोळे बंद करणे, खाली पडून राहणे व मोठ्या प्रमाणात मरतुक होणे इत्यादी लक्षणे आढळतात.
५) आजारावर उपचार उपलब्ध नाहीत. प्रतिबंधात्मक उपाय महत्त्वाचे असतात. योग्य वेळेस लसीकरण केल्यास हा आजार टाळता येतो.
६) मांसल कोंबड्यामध्ये १० ते १२ व्या आणि २४ ते ३० व्या दिवशी पशुवैद्यकाच्या सल्ल्याने लसीकरण करावे. अंड्यासाठी पाळलेल्या कोंबड्यामध्ये १४ व्या, २८ ते ३० व्या दिवशी लसीकरण केले जाते.

Poultry Diseases
Animal Infectious Diseases : जनावरांतील संसर्गजन्य आजारांवर उपचार...

मरेक्स :
१) संसर्गजन्य आजार आहे. १२ ते २४ आठवडे वयोगटातील कोंबड्या आजारास जास्त बळी पडतात.
२) प्रसार हवेद्वारे होतो. तीव्र स्वरूपाचा आजारात अचानक मरतुक सुरू होते.
३) कमी तीव्र स्वरूपाच्या आजारात पंख तसेच पायाचा लकवा मारणे ही लक्षणे आढळते.
४) लसीकरणाद्वारे हा आजार टाळता येतो. लसीकरणाबरोबर जैवसुरक्षेचे पालन अतिशय गरजेचे आहे.

देवी ः
१) सर्व वयोगटातील कोंबड्यांना आजार होतो. प्रसार दूषित खाद्य, हवा, त्वचेवरील जखमेद्वारे होतो.
२) आजार झालेल्या कोंबड्यामध्ये पंख नसलेल्या भागावर फोड येतात. हे फोड प्रथम पांढरट असतात नंतर त्यांचा आकार वाढून ते पिवळसर पडतात. पंधरा दिवसांनंतर फोडावर खपल्या पडतात. तसेच ते काळसर दिसतात.
३) आजारी कोंबड्यांना निरोगी कोंबड्यांपासून वेगळे ठेवावे.
४) लसीकरण आणि जैवसुरक्षेचे काटेकोरपणे पालन केल्यास हा आजार टाळता येतो. अंडी देणाऱ्या कोंबड्यामध्ये वयाच्या ४२ व्या दिवशी आणि नंतर १४ व्या आठवड्यात तज्ज्ञांच्या सल्ल्याने लसीकरण करावे.

इनफेक्शियस ब्रोंकायटिस :
१) लहान वयोगटातील कोंबड्या या आजारास जास्त बळी पडतात. आजारात श्‍वसनसंस्था, मूत्रपिंड, प्रजननसंस्था यांना अपाय होतो.
२) आजारी कोंबड्यांना श्‍वासोच्छ्वासादरम्यान त्रास होतो. कोंबड्या तोंड उघडे ठेवून श्‍वास घेतात. घरघर आवाज येणे, खोकला, शिंकणे अशी लक्षणे आढळतात. तसेच अंड्यावरील कोंबड्यांमध्ये उत्पादन कमी होते. अंड्याची गुणवत्ता ढासळते.
३) ज्या भागात आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळतो अशा भागात लसीकरण केले जाते. मांसल कोंबड्यामध्ये वयाच्या पहिल्या दिवशी किंवा तिसऱ्या आठवड्यात लस दिले जाते. अंड्यावरील कोंबड्यांना तिसऱ्या व आठव्या आठवड्यात आणि अंडी घालण्यात सुरवात करण्यापूर्वी म्हणजेच १४ व्या किंवा १५ व्या आठवड्यात लसीकरण केले जाते.

इनफेक्शियस लॅरिंगोट्रकायटीस :
१) आजार सर्व वयोगटांतील कोंबड्यांना होऊ शकतो, परंतु लहान वयोगटातील कोंबड्यांमध्ये जास्त दिसतो.
२) विषाणू आजारी कोंबडीचे नाक, तोंड, तसेच डोळ्यातून येणाऱ्या स्रावात असतात. हवेतून नाकावाटे शरीरात प्रवेश करतात.
३) आजार अतिशय तीव्र आणि कमी तीव्र अशा स्वरूपात आढळतो. अतिशय तीव्र स्वरूपाच्या आजारात कोंबडी कोणतीही लक्षणे न दाखवता अचानक मरण पावतात. असा कोंबड्यांच्या श्‍वसननलिकेत रक्ताच्या गुठळ्या आढळतात.
४) तीव्र स्वरूपाच्या आजारात श्‍वसनास त्रास होतो, कोंबड्या तोंड उघडे ठेवून श्‍वास घेतात. श्‍वासोच्छ्वासादरम्यान आवाज येतो. काही कोंबड्यांच्या नाकातून स्त्राव येतो.
५) आजारात सामान्यत: कमी प्रमाणात मरतूक होते पण अंडी उत्पादनात बऱ्यापैकी घट होते.
६) जैवसुरक्षेचे काटेकोरपणे पालन आणि लसीकरणाद्वारे हा आजार टाळता येतो. या आजारास औषधोपचार उपलब्ध नाहीत.
-----------------------------------------
संपर्क ः डॉ. व्ही. एस. धायगुडे, ९०८२२९२३४१
(क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com