Animal Market Agrowon
ॲग्रो गाईड

Animal Care : पशुधनाची आधी तपासणी मगच खरेदी

पशुसंवर्धन विभागातील मनुष्यबळाची कमतरता विचारात घेतली, तर स्वतः पशुपालकांनी परराज्यातील जनावर खरेदी करताना जागरूक राहायला हवे. अशा जनावरांची घातक संसर्गजन्य आजारांची तपासणी करूनच ते खरेदी करावे.

डॉ. व्यंकटराव घोरपडे  

Livestock Health Checkup : कोल्हापूर जिल्ह्यातील विशेषतः वारणा व गोकुळ दूध संघाने वासरांच्या संगोपनाबाबत जनजागृती व प्रोत्साहनपर अनुदान जाहीर केल्यामुळे, आरोग्यदायी स्पर्धा निर्माण झाली आहे.

त्यामुळे अनेक सभासदांनी त्यांनी दिलेल्या सवलतींचा फायदा घेतला व आपल्या गोठ्यात जन्मलेल्या वासरांना व रेडकांना चांगल्या प्रकारचे व्यवस्थापन पुरविले, सोबत रेडकं-वासरांसाठीचे पशुखाद्य दिल्याने मोठ्या प्रमाणामध्ये मुऱ्हा, मेहसाणा, सुरती जातीच्या रेडकांचा मृत्युदर कमी होऊन संख्या वाढली.

अलीकडे त्या पट्ट्यात बाहेरून जनावरे आणण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. या बाबतीत देखील आपल्याला वेगवेगळ्या मार्गाने पुढाकार घेता येऊ शकेल.

आताच कुठेतरी आपण लम्पी स्कीन रोगाच्या साथीतून बाहेर पडत आहोत. या रोगाचा प्रादुर्भाव हा गुजरात सीमेवरील जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावल या तालुक्यांतील स्थानिक जनावरांच्या बाजारातून झाला.

नजीकच्या राज्यातून जी जनावरे विक्रीसाठी आपल्या राज्यात सीमा भागातील बाजारातून येतात तिथूनच त्याचा प्रसार हा झालेला आहे. अनेक वेळा लाळ्या खुरकूत रोगाचा प्रसार देखील अशाच प्रकारे स्थानिक जनावरांच्या बाजारातून होताना दिसतो.

कोल्हापूरच्या सीमा भागातून निपाणी, संकेश्‍वर, बेळगाव या बाजारातून आपल्याकडे मोठ्या प्रमाणात पशुधनाची खरेदी-विक्री होत असते. त्यामुळे आपण मोठ्या प्रमाणात लसीकरण कार्यक्रम राबवला असला तरी अशा खरेदी-विक्रीमुळे विषाणूजन्य रोगांचा प्रसार होतो व पशुपालकांचे प्रचंड आर्थिक नुकसान होताना दिसते.

त्यामुळे त्याच कारणासाठी ‘संक्रमक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९’ (The prevention and control of infectious and contagious disease in animals act 2009) न्वये व सोबत शासन अधिसूचना काढून अशावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत स्थानिक बाजार हे काही कालावधीसाठी बंद ठेवले जातात.

खरेदी-विक्रीवर बंदी आणली जाते. तथापि, अशा वेळी देखील अनेक वेळा चोरीछुपे बेकायदेशीर खरेदी-विक्री पशुपालक करताना दिसतात.

अशामुळे लम्पी स्कीन रोगाच्या प्रसारास कारणीभूत ठरल्याचे राज्यातील अनेक पशुवैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांनी प्रशासनाच्या निदर्शनास देखील आणले होते. त्यामुळे या संक्रमण काळात सर्वांनी काळजी घेणे आवश्यक ठरते.

परराज्यांतून जनावरं खरेदी करताना कमीत कमी त्यांची त्या ठिकाणी असणाऱ्या शासन मान्यता प्राप्त प्रयोगशाळांमधून ब्रुसेलोसिस, टीबी आणि थायलेरिओसिस या रोगाची चाचणी करून घेणे आवश्यक आहे. अनेक राज्यांत मोठ्या प्रमाणात ब्रुसेलोसिस या रोगाचा प्रादुर्भाव आहे.

जागतिक पशुआरोग्य संघटनेच्या जुलै २१ च्या अहवालानुसार अनुक्रमे पंजाब, कर्नाटक, गुजरात या राज्यांत ब्रुसेलोसिस या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे.

या अशा रोगामुळे दूध उत्पादनातील घट, गर्भपातामुळे उत्पादित वासरांची संख्या घटणे, बैलांची ओढकाम शक्ती घटणे यासह देशाचे एकूण आर्थिक नुकसान ९२०० कोटी रुपयांचे होते असे ‘आव्हीआरआय’च्या एका अहवालात नमूद केले आहे.

त्यामुळे अशी जनावरे खरेदी केल्यास या रोगाचा प्रादुर्भाव आपल्या राज्यात होऊ शकतो. राज्यात अनेक जिल्ह्यातील पशुपालकांच्या गोठ्यात अशा प्रकारे परराज्यांतून आणलेल्या जनावरांमुळे ब्रुसेलोसिस या रोगाचा प्रादुर्भाव होऊन त्या गोठ्यातील सर्व जनावरांची विल्हेवाट लावावी लागली आहे.

या रोगात एक, दोन वेळा गर्भपात होतो नंतर पुन्हा प्रतिकारशक्ती निर्माण होऊन गर्भपात थांबतो. पण ते जनावर त्या रोगाचा प्रसारक बनते व मालकासह गोठ्यातील इतर जनावरांना धोकादायक ठरू शकते. तोच प्रकार जनावराच्या टीबी (क्षय) या आजारांबाबतीत आहे.

क्षयबाधित जनावरांच्या श्‍वासात, थुंकीत, तसेच शेणात व दुधात हे जिवाणू आढळतात. त्यामुळे बाधित जनावराच्या सान्निध्यात राहणाऱ्या सर्वांना या रोगाची बाधा होऊ शकते. त्यामुळे अशा रोगांची खरेदीपूर्वी खात्रीशीर तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे.

महाराष्ट्रात प्रति लाख १८८ क्षयरोगी आहेत असा इंडिया टीबी रिपोर्ट २०२२ च्या अहवालात नमूद केले आहे. सोबतच २०२० च्या तुलनेत २०२१ मध्ये क्षयरोग बाधितांची संख्या १९ टक्क्यांनी वाढल्याचे निदर्शनास आणून देशातील क्षयरोग हे पाचवे मृत्यूचे कारण ठरताना दिसत आहे.

‘सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९’ न्वये अशा खरेदी प्रक्रियेवर बंधनं आणणे आवश्यक ठरणार आहे. त्यानुसार अशा जनावरांची वाहतूक, राज्यातील प्रवेश, त्या वेळी त्याची तपासणी, विलगीकरण, रक्तजल नमुने घेणे आदी प्रकार करणे आवश्यक ठरेल.

पशुसंवर्धन विभागाकडे अशा प्रकारची यंत्रणा होती आणि आहे. सीमा भागातील ११ ठिकाणी ‘चेक पोस्ट’ (दक्षता पथक) नावाने राज्यात या संस्था याच कारणासाठी होत्या. त्यामध्ये अक्कलकुआ (नंदुरबार), वणी (नाशिक), पळासनेर (धुळे), पंढरपूर (सोलापूर) लिंगनूर कापशी (कोल्हापूर), निलंगा (लातूर), धारणी, परतवाडा (अमरावती), सावनेर (नागपूर), साकोली (भंडारा), कुरखेडा (गडचिरोली) या संस्था येतात.

त्या काळात बुळकांडी रोगप्रतिबंधक योजनेसाठी त्या ठिकाणी कार्यवाही सुरू होती. त्यामध्ये परप्रांतातून येणाऱ्या जनावरांची तपासणी, हाय रिस्क रूट, नाके या ठिकाणी भेटी देणे, बुळकांडी रोग शोध कार्य करणे अशा जबाबदाऱ्या पार पाडल्या जात असत.

त्यानंतर सध्या बुळकांडी रोगनिर्मूलन हे १०० टक्के झाल्यामुळे या संस्थांचे कार्य आणि जबाबदाऱ्या यामध्ये आनुषंगिक बदल करणे आवश्यक आहे. परंतु अजूनही याकडे लक्ष दिल्याचे दिसत नाही. सोबत जी सहा अशी तपासणी नाके पुनर्रचनेत बंद केली आहेत ती देखील सुरू करणे आवश्यक ठरेल.

त्यामध्ये जव्हार, किनवट, उदगीर, रावेर, मिरज व चंद्रपूर यांचा समावेश आहे. पशुसंवर्धन विभागात सुरू असलेल्या पुनर्रचनेत या ठिकाणच्या संस्था सर्व बाजूंनी पुनरुज्जीवित करणं शहाणपणाचं ठरेल. सद्यपरिस्थितीत राज्य तसेच केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन विषयक धोरणांचा विचार केला तर हे अत्यावश्यक ठरते.

एकूणच पशुसंवर्धन विभागातील मनुष्यबळाची कमतरता विचारात घेतली, तर स्वतः पशुपालकांनी याबाबतीत जागरूक राहणं आणि कमीत कमी अशा प्राणिजन्य आजाराची तपासणी करूनच असे जनावर खरेदी करावं.

जेणेकरून आपल्या कुटुंबासह इतरांचा त्याचा फटका बसणार नाही. सोबत असे प्राणिजन्य आजार जे मानवाला होऊ शकतात अशा रोगांचे निदान शासकीय मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी केल्यानंतर सकारात्मक चाचण्या आलेल्या जनावरांची विल्हेवाट लावण्याबाबत कायदा किंवा कायदा दुरुस्ती केल्यास निश्‍चितपणे अशा बाबींना बळकटी मिळेल व सर्वजण त्याबाबतीत सजग राहून निर्णय घेऊ शकतील.

सोबत रोगपश्‍चात होणाऱ्या खर्चावर, मनुष्यबळाच्या वापरावर, नुकसानीवर नियंत्रण देखील ठेवता येईल, यात शंका नाही.

लेखक- डॅा. व्यंकटराव घोरपडे vyankatrao.ghorpade@gmail.com

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT