नांदेड जिल्ह्यातील बेळकोणी (बु) (ता. बिलोली) हे तेलंगण सीमेलगत बिलोली तालुक्यातील सुमारे बाराशे कुटुंब असलेले गाव आहे. गाव परिसरातील प्रयोगशील व समविचारी शेतकरी एकत्र येत २०१३ मध्ये शेतकरी गटाची स्थापना केली.
कृषी विभाग-‘आत्मा’चे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक एस. जी. कांबळे यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. सध्या गावात प्रत्येकी वीस शेतकरी असलेले २२ गट आहेत. यात महिलांच्या स्वतंत्र गटाचा समावेश आहे.
शेतकरी कंपनीची स्थापना
बेळकोणी गावातील माधव सायन्ना तरकंटे यांची तीस एकर शेती आहे. त्यांचे ‘एमसीए’पर्यंत शिक्षण झाले आहे. त्यांनी पुणे येथे एका आघाडीच्या कंपनीत दहा वर्षे नोकरी केली. कोरोना काळात ते गावी परतले. पुढाकार घेत त्यांनी अमृतालयम शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना २०२१ मध्ये केली.
नोकरीत असताना ते गावी जाऊन येऊन असत. गटाद्वारे त्यांचा शेतकऱ्यांशी संपर्कही असायचा. आज ते पूर्णवेळ आपल्या कंपनीसाठी कार्यरत असून, मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. सध्या कंपनीचे ५६० सभासद आहेत. त्यांच्याकडून नोंदणी शुल्क २५० रुपये, तर १००० रुपये समभाग (शेअर्स) जमा करण्यात आले.
सोयाबीन बीजोत्पादन कार्यक्रम
कंपनीच्या कामकाजातील मुख्य भाग म्हणजे सोयाबीन बीजोत्पादन. सगरोळी ‘केव्हीके’तील विषय विशेषज्ञ पील इंगळे आणि कंधारचे कृषी अधिकारी डॉ. शिवाजी राचेवाड यांनी दर्जेदार सोयाबीन बियाण्याचे महत्त्व पटवून दिले. त्यातून ‘अमृतालयम’ ने सोयाबीन बीजोत्पादनाचा मार्ग निश्चित केला.
दोन वर्षांपूर्वी २०० ते ३०० क्विंटल बियाणे उत्पादित केले. दरम्यान घरचेच बियाणे पेरणीसाठी वापरण्याचे आवाहन जिल्हा कृषी विभागाकडून होऊ लागले.
त्यातून मागील वर्षी ५० ते ६० शेतकऱ्यांनी सहभाग घेत किमान शंभर एकर क्षेत्रातून ९०० ते एकहजार क्विंटल बियाणे उत्पादित केले. केडीएस ९९२, ७२६, ७५३, डीएस २२८, जेएस ९३०५, एमएयूएस-१६२, एमएयूएस-६१२ आदी वाणांचा बीजोत्पादनात समावेश राहिला.
खात्रीशीर बियाण्यांसाठी ओळख
ज्या वेळी बाजारपेठेत किलोला १४० रुपये दर बियाण्याला सुरू होता, त्या वेळी कंपनीने हे बियाणे शेतकऱ्यांना १२० रुपये दराने वितरित केले. राहुरी, अकोला व परभणी येथील कृषी विद्यापीठांकडील ‘ब्रीडर सीड’ घेऊन कार्यक्रम राबविला जातो.
परिसरातील शेतकऱ्यांत बियाण्याबाबत खात्रीशीर ओळख निर्माण झाली आहे. जिल्हा बीज प्रमाणीकरण कार्यालयाकडे नोंदणी व विक्री परवानाही मिळवला आहे. सध्या बियाणे प्रक्रियेची सुविधा कंपनीकडे नाही. त्यामुळे नांदेड येथील एका संस्थेकडून ही प्रक्रिया पूर्ण केली जाते.
कृषी निविष्ठा केंद्रे
कंपनीच्या सभासदांना दर्जेदार निविष्ठा उपलब्ध व्हाव्यात यासाठी चार ठिकाणी विक्री सेवा केंद्रे सुरू केली आहेत.
यात तालुक्यातील बेळकोणी बु., बेळकोणी खुर्द, बावलगाव व धर्माबाद तालुक्यांतील नायगाव या गावांचा समावेश आहे. शेतकऱ्यांना गावातच निविष्ठा उपलब्ध होऊ लागल्याने वेळेसह पैशांचीही बचत होऊ लागली.
राजमा बीजोत्पादनाकडे वाटचाल
मागील काही वर्षांपासून हरभऱ्यात मर आदी समस्या उद्भवू लागल्या. यातून राजमा बीजोत्पादनाचा पर्याय निवडण्यात आला. एकरी पाच ते सात क्विंटलपर्यंत उतारा मिळाला. अर्थात, बीजोत्पादनाचा हा पहिलाच प्रयत्न होता.
मात्र काही प्रकिया पर्ण होण्यास अडचणी आल्याने बाजारपेठेत ५८०० रुपये प्रति क्विंटल दराने विक्री करण्यात आली. पुढील वर्षापासून रीतसर पद्धतीने बियाणे निर्मिती करण्यात येईल.
अवजारे बँका
कंपनीने हळदीसाठीची अवजारे व दुसरी अन्य पिकांसाठी अशा दोन अवजारे बॅंका स्थापन केल्या आहेत. बिलोली तालुका मानव विकास कार्यक्रमात असल्याने कंपनीला ७५ टक्के अनुदानाचा लाभ एका बँकेसाठी देण्यात आला.
आज कंपनीकडे ट्रॅक्टरसह मळणीयंत्र, पल्टी नांगर, कल्टिव्हेटर, बीबीएफ पेरणी यंत्र, रोटाव्हेटर, हळद शिजवणी कुकर, पॉलिशर, लागवड व काढणी यंत्र, पॉवर टिलर, मिनी रूटर आदींचा समावेश आहे.
उलाढाल
एकूण सर्व उपक्रमांमधून कंपनीने अलीकडील वर्षांत २५ ते ३० लाख रुपये व अगदी अलीकडे एक कोटीच्या आसपास मजल मारली आहे.
क्षमता बांधणी व प्रशिक्षण
-कंपनीच्या सदस्यांकडून पुणे, जळगाव, नवी दिल्ली आदी ठिकाणची कृषी प्रदर्शने, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी आदी ठिकाणी भेटी.
-ज्ञान- प्रशिक्षण व क्षमता बांधणी यासाठी रिलायन्स फाउंडेशनकडून सहकार्य.
-त्याअंतर्गत भेटी, नवी अवजारे, ड्रोन प्रशिक्षण, ‘सीईओ’, संचालक प्रशिक्षण, व्यवहार प्रशिक्षण.
कंपनीला पाच टोकण यंत्रेही देण्यात आली आहेत.
गुणवत्ता टिकवली
-पायाभूत व प्रमाणित बीजोत्पादन.
-गुणवत्ता टिकवण्यासाठी २५ किलोच्या बॅगांची थप्पी लावली जात नाही.
-एका वाणाची भेसळ दुसऱ्यात होणार नाही यासाठी योग्य विलगीकरण अंतर.
-एका पिकाची मळणी करून आलेले यंत्र असल्यास ते स्वच्छ, साफसूफ करून सोयाबीनसाठी वापर.
-एचपी क्षमतेचे मळणी यंत्र खरेदी केले आहे. त्याचे आरपीएम कमी असल्याने बियाण्यावरील कोटिंग निघून जात नाही.
माधव तरकंटे, ७२७६८७००१८
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.