Grape Orchard
Grape Orchard Agrowon
ॲग्रो गाईड

Vineyard Management : वाढत्या उष्णतेचे द्राक्ष बागेवर काय परिणाम होतील?

डॉ. आर. जी. सोमकुंवर 

Grape Orchard Heat Wave Effect : सध्याच्या स्थितीमध्ये वातावरणाचा (Climate) विचार करता दिवसाच्या तापमानामध्ये जास्त वाढ होताना दिसते. (३६ अंश सेल्सिअसपर्यंत) त्याच रात्रीच्या तापमानामध्ये तितकीच वाढ झालेली दिसून येते. अशा परिस्थितीमध्ये बागेत वारे जास्त वाहत असल्याचा अनुभव येईल.

आर्द्रता जर ४० टक्क्यांच्या खाली येत असल्यास वेलीच्या बाष्पीभवनाचा (Evaporation) वेग जास्त वाढेल व त्यामुळे वेलीतून पाणी जास्त प्रमाणात निघून जाईल. घडाच्या (Grapes) विकासाठी पाण्याची जास्त गरज या वेळी असेल. या वेळी पाण्याची कमतरता पडल्यास द्राक्ष बागेत खालील समस्या वाढू शकतात.

१) घड लूज पडणे

घडाच्या विकासात पाण्याची जास्त गरज असते. वाढत्या तापमानात (Temperature) मण्यातून (Grape Bead) पाणी निघून जाईल. तसेच जमिनीतूनही बाष्पीभवनाद्वारे पाणी निघून जाईल. घडाच्या विकासासाठी आवश्यक तितक्या पाण्याची पूर्तता झालेली नसल्यास घडाचा मणी देठापासून अलग होण्याची शक्यता वाढते.

बऱ्याच परिस्थितीमध्ये द्राक्ष बागेमध्ये घडाचे देठ काळे पडत असल्याचे दिसून येतात. मण्याचे देठ या वेळी नाजूक झालेले दिसून येतील. मण्याच्या देठाच्या जाडीनुसार पाण्याच्या कमतरतेचे परिणाम दिसून येतील. काही द्राक्ष जातींमध्ये मण्याचे देठ जाड (उदा. तास ए गणेश) असतील, तर काही जातींमध्ये देठ पातळ (उदा. फ्लेम सीडलेस) दिसतील.

संजीवकांचा वापर जर व्यवस्थित झालेला असेल. उदा. घडाचे डीप हाताने केलेले असल्यास मण्याच्या देठाची जाडी व्यवस्थित असेल. अशा प्रकारच्या घडामध्ये मण्याचे देठ लवकर सुकत नाहीत.

बऱ्याच परिस्थितीमध्ये घडांची संख्या जास्त असल्यामुळे पाणी व अन्नद्रव्यांची उपलब्धता आणि गरज यांचा ताळमेळ बसत नाही. त्यामुळे मण्याचे देठ लवकर सुकतात व त्यामध्ये गोडी येण्यास उशीर होतो किंवा अपेक्षेप्रमाणे गोडी मिळत नाही.

यालाच ‘नेक्रॉसिस किंवा घडाचा सुकवा’ असे संबोधले जाते. फळकाढणीला साधारणतः २० ते २५ दिवस असलेल्या बागेमध्ये जर तापमानात जास्त वाढ झाली असेल व पाण्यावर नियंत्रण ठेवले गेले असेल, तर मात्र ही परिस्थिती उद्‍भवण्याची दाट शक्यता असेल.

बऱ्याचदा आपण लवकर गोडी येऊन फळकाढणी लवकर व्हावी, या उद्देशाने बागेत पाणी कमी करतो किंवा पाणी काही दिवसांकरिता बंद करतो. यामुळे वेलीवर वेलीवर अचानक ताण निर्माण होऊन, मणी लूज पडतात. बेदाणे निर्मितीच्या द्राक्षामध्ये अशा परिस्थितीत फळ काढणी करताना बऱ्यापैकी मणीगळ होताना दिसते.

हे नुकसान आपल्याला टाळता येते. आपल्या बागेत पाण्याची किती गरज आहे, हे कदाचित आपल्याला पूर्णपणे समजत नसावे. बाष्पीभवनाच्या गुणोत्तरानुसार वेलीची प्रत्येक वाढीच्या अवस्थेत पाण्याची गरज ठरलेली असते. उदा. एक मि.मी. बाष्पीभवन झाल्यास वेलीला ४२०० लिटर पाणी प्रति हेक्टर प्रति दिवस द्यावे असे सांगितले जाते.

ही सुविधा आपल्याकडे जरी नसली तरी वातावरणात वाढत असलेल्या तापमानाचा विचार करता आपण रोज किती पाणी देत होतो, त्यानुसार पाणी कमी अधिक करावे. परंतु पाणी बंद किंवा खूप कमी करू नये.

बऱ्याच वेळा पाणी जास्त दिल्यामुळे मण्याची गोडी पुन्हा कमी होत असल्याचे बोलले जाते. मात्र जमिनीच्या प्रकारानुसार पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी अधिक असल्यामुळे घडाच्या वाढीची अवस्था व त्या बागेतील तापमान या सर्व गोष्टीवर पाण्याची गरज ठरते. बागेत पाणी कमी असल्यास मात्र काही उपाययोजना करून बागेत व्यवस्थापन करता येईल.

उपाययोजना ः

-मल्चिंगचा वापर करणे.

-संध्याकाळी किंवा सकाळी पाणी देणे.

-ठिबकनळ्या जमिनीजवळ आणणे.

-वारे वाहत असलेल्या दिशेला आडवे शेडनेट बांधावे. यामुळे उष्ण वारे रोखले जाऊन जमिनीचे बाष्पीभवन कमी होईल.

२) रिकटच्या बागेतील व्यवस्थापन ः

नुकताच रिकट झालेल्या बागेत या वाढत्या तापमानात डोळे लवकर फुटायला सुरुवात होईल. या पूर्वी रिकट घेतल्यानंतर चार ते पाच डोळ्यांना पेस्टिंग केले असेल. आता सर्वच फुटी निघालेल्या असतील. या वेळी आपल्याला फक्त दोन फुटींची गरज असेल.

सात ते आठ पानांच्या अवस्थेत निघालेल्या फुटींपैकी वरच्या फुटींला चार पानांवर शेंडा मारून घ्यावा. खालील फूट सुतळीने बांधून घ्यावी. शेंड्याचे प्रभुत्व (अपायकल डॉमिनन्स) या द्राक्ष जातीमध्ये जास्त प्रमाणात कार्य करत असल्यामुळे पहिली फूट जोरात चालत असल्यास दुसऱ्या क्रमांकाची फूट हळूहळू वाढेल.

वरील फुटीमध्ये रिकट घेतल्यानंतर शेंड्याकडील काडीवर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यामुळे पहिल्या फुटीवर शेंडा पिंचिंग करून खालील फूट खोड तयार करण्याकरिता बांबूला सुतळीने बांधून घ्यावी.

वरच्या फुटीचा शेंडा मारल्यामुळे दुसऱ्या क्रमांकाची फूट जोरात चालेल. खोड तयार करण्याकरिता या फुटीची वाढ लवकर होणे व जाडी मिळणे गरजेचे असते. यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन जास्त महत्त्वाचे असेल.

खोड तयार झाल्यानंतर अन्नद्रव्याचा साठा व्यवस्थित व्हावा, यासाठी नत्र आणि स्फुरदयुक्त खतांचा वापर केला जातो. यामध्ये १२-६१-०, युरिया किंवा अमोनिअम सल्फेट याचा वापर करता येईल.

दोन पेऱ्यांतील अंतर वाढण्याकरिता फक्त नत्राचा वापर करून जमणार नाही, तर पाणी व्यवस्थापनही तितकेच महत्त्वाचे आहे. नुकतेच तयार केलेले बोद वाफसा परिस्थितीत असतील. तसेच मुळांच्या कक्षेत पुरेसे पाणी असल्यास अन्नद्रव्याचा पुरवठा शक्य होईल.

खोड तयार करते वेळी ‘स्टॉप ॲण्ड गो’ पद्धतीने गेल्यास खोड जाड होईल. यासाठी रिकट नंतर निघालेली फूट ९ ते १० पानांची झाल्यास ६ ते ७ पानांवर थांबवावी. त्यानंतर निघालेल्या बगलफुटी ३ चे ४ पानांवर पिंचिंग करून थांबवाव्यात.

व पुढील फुटीची पिंचिंग न करता बांबूला पुन्हा बांधून घ्याव्यात. बगलफुटी खुडल्यानंतर शिल्लक राहिलेली तीन ते चार पाने प्रकाश संश्‍लेषणाच्या माध्यमातून अन्नद्रव्य तयार करून काडीमध्ये साठा करतात. त्यामुळे काडी जाड होते.

डॉ. आर. जी. सोमकुंवर, ९४२२०३२९८८ (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : अकोला, सोलापुरात हंगामातील उच्चांकी तापमान

Indian Politics : चीनवरून काँग्रेसचा मोदी सरकारवर पुन्हा हल्लाबोल

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

SCROLL FOR NEXT