Vineyard  Agrowon
ॲग्रो गाईड

Grape Management : सद्यःस्थितीतील द्राक्ष बागेचे व्यवस्थापन

Grape Advisory : या वेळी द्राक्ष बागेत काडी परिपक्वतेची अवस्था, फळछाटणी होऊन प्री ब्लूमची अवस्था, तसेच नव्या बागेत कलम करण्याची अवस्था दिसून येतील. येत्या आठवड्यातील वातावरणाचा विचार करता या अवस्थेतील बागेतील व्यवस्थापनाची माहिती घेऊ.

Team Agrowon

डॉ. आर. जी. सोमकुंवर, डॉ. अजयकुमार उपाध्याय

Grape : गेल्या आठवड्यातील पावसाचा आढावा घेता असे लक्षात येते, की बऱ्याच ठिकाणी अजूनही अपेक्षित पाऊस पडलेला नाही. या वेळी द्राक्ष बागेत काडी परिपक्वतेची अवस्था, फळछाटणी होऊन प्री ब्लूमची अवस्था, तसेच नव्या बागेत कलम करण्याची अवस्था दिसून येतील. येत्या आठवड्यातील वातावरणाचा विचार करता या अवस्थेतील बागेतील व्यवस्थापनाची माहिती घेऊ.


काडी परिपक्वतेची समस्या ः
सध्याच्या कालावधीमध्ये बागा काडी परिपक्वतेच्या शेवटच्या टप्प्यात असतील. एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात खरडछाटणी झालेल्या बागेत या वेळी काडी परिपक्व होऊन वेलीचा या शेवटच्या टप्प्यातील विश्रांतीचा कालावधी मानला जातो. या बागेत ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात फळछाटणी सुरुवात होणे अपेक्षित आहे. यासाठी काडी परिपक्वता पूर्ण झालेली असावी. सध्याच्या परिस्थितीत प्रत्येक द्राक्षविभागामध्ये या वर्षी काडी परिपक्वतेची समस्या येत असल्याचे बोलले जाते.

सूक्ष्मघड निर्मितीनंतर द्राक्ष बागेत काडी परिपक्वतेचा कालावधी सुरू होतो. या वेळी वेलीला वळण देणे, (म्हणजे फुटी तारेवर बांधून घेणे), पोटॅशचा वापर आणि पाण्यावर नियंत्रण या वर भर दिला जातो. या वर्षीच्या पावसाचा आढावा घेतला असता या काडी परिपक्वतेच्या अवस्थेत काही ठिकाणी एकतर पाऊस जास्त प्रमाणात झाला, तसेच ढगाळ वातावरण अधिक काळ राहिले. काही ठिकाणी थोडाफार पाऊस पडणे आणि ढगाळ वातावरण जास्त काळ टिकून राहणे व थोड्या फार प्रमाणात ऊन अशा वातावरणाच्या परिस्थितीमध्ये वेलीची वाढ जास्त प्रमाणात झाली. वाढ जितकी जास्त झाली असेल, तितका काडी परिपक्वतेला उशीर लागला असावा. सूक्ष्म घडनिर्मिती नुकतीच झालेल्या बागेत काडी परिपक्वतेचा सुरुवातीचा टप्पा म्हणजे काडी तळातून दुधाळ रंगाची होणे व त्यानंतर हळूहळू तपकिरी रंगाची होत जाते. काडी तपकिरी रंगाची होण्यासाठी तिची वाढ नियंत्रणात असणे गरजेचे असते. बऱ्याचदा झालेला पाऊस किंवा जमिनीमध्ये ओलावा सतत टिकून राहिल्यामुळे बागेत आर्द्रतेचे प्रमाण जास्त वाढते. परिणामी, काडीमध्ये पीथ तयार न होता काडी कच्ची राहते. या काडीमध्ये लिग्नीनचे उत्पादन कमी प्रमाणात होत असल्यामुळे अशा फुटी रोगास लवकर बळी पडतात. या वेलीवर एक प्रकारचा शॉक बसतो व त्यामुळे काही दिवसांत काडीवर रिंग आल्यासारखी चिन्हे दिसतील. यालाच ‘बोट्रिडिप्लोडिया’ असेही म्हटले जाते. बऱ्याचशा बागेत बोट्रीडिप्लोडियाचे प्रमाण व काडी परिपक्वतेस उशीर लागणे या दोन समस्या प्रामुख्याने आढळून येतात.

काडी परिपक्वतेकरिता पुढील उपाययोजना महत्त्वाच्या असतील.
- बागेत पाणी पूर्णपणे बंद करणे.
- पालाशयुक्त खतांचा वापर ठिबकद्वारे (एक ते सव्वा किलो प्रति एकर प्रति दिवस) आणि फवारणीद्वारे (४ ते ५ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणे) करणे.
- ठिबकद्वारे पंधरा ते वीस मिनिटांमध्ये खते द्यावीत. ड्रीपर कमीत कमी वेळ चालू राहील, असे पाहावे.
- शेंडा पिंचिंग करणे महत्त्वाचे असेल.
- बगलफुटी निघालेल्या असल्यास त्या त्वरित काढून घ्याव्यात. फुटी काडीवर मोकळ्या राहतील, असे नियोजन करावे. असे केल्यास काडीवर पुरेसा सूर्यप्रकाश पडून त्यात लिग्नीन तयार होण्यास मदत होईल.

वेलीची वाढ जोमात होणे ः
काडी परिपक्वतेच्या समस्येसोबतच काही ठिकाणी वेलीवर वाढ जोमात होत असल्याचे समजते. बऱ्याच ठिकाणी मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी वाढीच्या या अवस्थेत पाऊस अपेक्षेप्रमाणे नसला तरी ढगाळ वातावरण सतत राहिले. तसेच कमी झालेल्या तापमानामुळे बागेत ओलावा टिकून राहिला आहे. या परिस्थितीमुळे द्राक्षवेलीमध्ये जिबरेलिन्सचे प्रमाण जास्त वाढते. पाऊस कमी पडला असला, तरी भारी जमिनीत ओलावा टिकून राहत असल्यामुळे ही समस्या जास्त प्रमाणात दिसून येते. तुलनेने हलक्या जमिनीत ही समस्या जास्त पावसाच्या स्थितीत फुटींची वाढ जोमात होताना दिसते. नवीन फुटीवर थोडा जरी पाऊस झाला, तरी करपा व जिवाणूजन्य करपा आणि डाऊनी मिल्ड्यूसारख्या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येईल. फुटीची वाढ जोमात होत असल्यामुळे काडी परिपक्वता लांबत जाते. इतकेच नाही तर या फुटीवर रोगाचा प्रादुर्भावही तितकाच वाढतो. यामुळे पुन्हा काडीमध्ये पीथ तयार होण्यास अडचणी येतात.

या वेळी वातावरणात आर्द्रता भरपूर असल्यामुळे जैविक नियंत्रणाचा वापर मोलाचा ठरेल. रोग नियंत्रणासाठी नवीन फुटी काढून टाकणे महत्त्वाचे आहे. त्यानंतर मांजरी वाइनगार्ड २ मिलि प्रति लिटर किंवा बाजारात उपलब्ध अन्य ट्रायकोडर्मा ५ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणे तीन ते चार दिवसांच्या अंतराने तीन ते चार फवारण्या केल्यास रोगनियंत्रण सोपे होईल. पालाशची फवारणी आणि पाणीनियंत्रण यामुळे फुटींची वाढ नियंत्रणात राहील.
बऱ्याचशा बागेत पाने पिवळी पडणे, पानाच्या वाट्या होणे व त्यानंतर पाने जळून जाणे ही समस्या दिसून येते. खरडछाटणीच्या वेळी आपण बोदामध्ये शिफारशीप्रमाणे बेसल डोस दिला होता. त्यानंतर ठिबकद्वारे विद्राव्य खते दिली गेली असली, तरी या वेळी पानांवर ही लक्षणे दिसून येत आहेत. यामागे मुख्य कारण म्हणजे जमिनीत कमी अधिक प्रमाणात उपलब्ध असलेली चुनखडी जबाबदार असू शकते. जमिनीमध्ये असलेल्या चुनखडीच्या अधिक प्रमाणामुळे पालाश, फेरस, मॅग्नेशिअम आणि स्फुरद यांसारख्या महत्त्वाच्या अन्नद्रव्याचा पुरवठा होत नाही.

या वेळी जमिनीतून सल्फर व्यवस्थितरीत्या मिसळून घेतल्यास पाऊस पडल्यानंतर त्याचे विघटन होऊन आवश्यक ते परिणाम मिळू शकतात. तेव्हा जमिनीत उपलब्ध चुनखडीच्या प्रमाणानुसार सल्फर वापरावे. ५ ते ८ टक्के चुनखडी असल्यास ५० ते ६० किलो सल्फर प्रति एकर, ८ ते १५ टक्के चुनखडी असल्यास १०० किलो सल्फर प्रति एकर जमिनीत मिसळून घ्यावे.

लवकर छाटणी झालेल्या बागेतील व्यवस्थापन ः
या बागेत सध्या प्री ब्लूम अवस्थेत द्राक्षघड दिसून येतील. सध्याच्या वातावरणाचा विचार करता प्री ब्लूम अवस्थेतील द्राक्ष घडाच्या पाकळ्यांची लांबी वाढून दोन पाकळ्यातील अंतर वाढण्यासाठी हे वातावरण पोषक दिसते. असे असले तरी जीएचा वापर व जीएच्या द्रावणाचा सामू या दोन गोष्टी महत्त्वाच्या असतील. प्री ब्लूम अवस्थेतील पोपटी रंग आलेल्या घडास १० पीपीएम जीए ३ ची फवारणी फायद्याची राहील. द्रावणाचे चांगले परिणाम मिळण्यासाठी वापरात येणाऱ्या पाण्याचा सामू ६.५ ते ७ असावा. तर द्रावणाचा सामू हा ५.५ ते ६ इतका असावी. असे नियोजन केल्यास दोन पाकळ्यांतील अंतर व पाकळीची लांबी वाढण्यास मदत होईल. हा सामू मिळण्यासाठी द्रावणामध्ये युरिया फॉस्फेट किंवा सायट्रिक अॅसिड वापरता येईल. या वेळी जीएचे विशेष कार्य म्हणजे पेशींची संख्या व आकार वाढवणे होय. जीएची दुसरी फवारणी करायची झाल्यास १५ पीपीएम जीए पहिल्या फवारणीच्या पाच दिवसांनंतर करावी. फवारणीचे चांगले परिणाम मिळण्यामध्ये तापमान आणि आर्द्रता यांची भूमिका महत्त्वाची असते. सायंकाळी चार वाजल्यानंतर फवारणी केल्यास आर्द्रता योग्य असल्यामुळे जीएचे शोषण करण्याची पानांची क्षमता वाढते. जीएची फवारणी करण्याआधी एक दिवस आधी झिंक आणि बोरॉन प्रत्येकी अर्धा ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी केल्यास पानांची जीए शोषण्याची क्षमता वाढते. या वेळी वातावरण कोरडे असल्यामुळे रोग व कीड नियंत्रणासाठी उपलब्ध असलेले बुरशीनाशक व कीडनाशक संजीवकासोबत मिसळणे टाळावे.

डॉ. आर. जी. सोमकुंवर, ९४२२०३२९८८
(राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election 2024 Update : भाजप पहिल्या स्थानावर; तर कॉँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर, पहिले कल काय सांगतात?

Agro Vision Krishi Exhibition : विकसनशील भाग म्हणून विदर्भ कृषी क्षेत्रात नावारूपास येणार

Maharashtra Election 2024 : सत्तास्थापनेसाठी दोन्हींकडून तयारी; मतदानात ०.९४ टक्क्यांची वाढ

Orange Growers Compensation : संत्रा बागायतदारांना भरपाईसाठी ‘तारीख पे तारीख’

Maharashtra Assembly Election Counting : पोस्टल मतमोजणीत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

SCROLL FOR NEXT