Marigold Agrowon
ॲग्रो गाईड

सुधारित तंत्राने झेंडू लागवड

Team Agrowon

डॉ.मोहन शेटे, शिवाजी गायकवाड, डॉ .सुनील लोहाटे

दर्जेदार झेंडू फुलांच्या उत्पादनासाठी उत्तम निचऱ्याची मध्यम जमीन लागवडीसाठी निवडावी. सपाट वाफा, सरी वरंबा आणि रुंद सरी किंवा गादीवाफ्यावर लागवड केली जाते.बाजारपेठेचा अभ्यास करून निवडलेल्या जातीची हंगामनिहाय लागवड करावी.

झेंडू फुलांना बाजारात वर्षभर मागणी असते. खासकरून उन्हाळ्यात लग्नसराईत आणि दसरा, दिवाळी (Divali) सण व गणपती उत्सवावेळी झेंडू फुलांची मागणी वाढते. झेंडू पिकाची लागवड (Marigold Cultivation) वर्षभर सर्व हंगामात करता येते. औद्योगिक क्षेत्रात झेंडू फुलांचा रंगद्रव्ये, सौंदर्य प्रसादने व औषधीद्रव्ये तयार करण्यासाठी उपयोग होतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जमिनीतील सूत्रकृमी नियंत्रणासाठी फळे व भाजीपाला (Vegetable) पिकामध्ये झेंडू पिकाची आंतरपीक अथवा मिश्रपीक म्हणून लागवड केली जाते.

१) झेंडू पीक सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये येत असले तरी उत्तम प्रतीच्या दर्जेदार फुलांच्या उत्पादनासाठी उत्तम निचऱ्याची मध्यम जमीन लागवडीसाठी निवडावी. जमिनीचा सामू ६ ते ७.५ च्या दरम्यान असावा.

२) सकस व भारी जमिनीमध्ये झेंडू पिकाची वाढ चांगली होत असली तरी उत्पादन कमी मिळते. त्यामुळे झेंडू लागवडीसाठी हलक्या ते मध्यम जमिनी पोषक असतात.

३) फुले मध्यम हवामानात चांगली वाढतात. रात्रीचे १५ ते १८ अंश सेल्सिअस तापमान झाडाच्या वाढ व उत्पादनासाठी पोषक असते. जास्त पाऊस या पिकास हानिकारक ठरतो.

४) रोपे तयार करण्यासाठी २ x१ मी. आकाराच्या गादी वाफ्यावर ४ ते ५ सेंमी अंतरावर बी पेरावे. बी जास्त खोल पेरू नये. साधारणतः १ सेंमी खोल बी पेरावे. बी विरळ पेरावे. पेरणीनंतर शेणखत व माती मिश्रणाने बी झाकावे. वाफ्यात झारीने पाणी द्यावे. साधारणतः हेक्टरी १ ते १.५ किलो बी लागते. संकरित जातीचे बी महाग असते. त्यामुळे त्यांची काळजीपूर्वक पेरणी करावी. संकरित बी पेरणीसाठी प्लॅस्टिक ट्रे व कोकोपिटचा वापर करावा.

निर्जंतुक केलेले कोकोपिट ट्रेमध्ये भरून एका पेल्यात एक बी टोकावे व पाणी द्यावे . साधारणत : एक ग्रॅममध्ये ३०० संकरित बिया असतात. या पद्धतीने झेंडूची रोपे तयार केल्यास हेक्टरी २५० ग्रॅम बी लागते. रोपे पेरणीपासून रोपांची पुनर्लागवड करण्यासाठी २५ ते ३० दिवस लागतात.

५) लागवडीसाठी प्रथम जमीन नांगरून कुळवून भुसभुशीत करावी. सपाट वाफा, सरी वरंबा आणि रुंद सरी किंवा गादीवाफ्यावर लागवड करतात. जमीन तयार करताना हेक्टरी ३० ते ४० टन शेणखत मातीत मिसळावे. लागवडीसाठी निरोगी १५ ते २० सेंमी उंचीची त्यांना ५ ते ६ पाने आहेत अशी रोपे निवडावीत.

लागवड ६०सेंमी x ३० सेंमी अंतरावर शक्यतो संध्याकाळच्या वेळी करावी. लागवड करताना रोपांची मुळे कॅप्टन ०.२ टक्के द्रावणात १० मिनिटे बुडवून लावावीत. लागवड जमीन, हवामान आणि जातीनुसार ६०सेंमी x ३० सेंमी, ६० सेंमी x ६० सेंमी, ६० सेंमी x ९० सेंमी आणि ३० सेंमी x ३० सेंमी अंतरावर करतात. अलीकडे ज्या ठिकाणी ठिबक सिंचनाची सोय आहे अशा ठिकाणी झेंडू गादी वाफ्यावर लावतात. गादीवाफ्यावरील लागवडीसाठी ६० सेंमी रुंद व ३० सेंमी उंच आणि जमिनीच्या उतारानुसार लांब गादीवाफे तयार करून दोन गादी वाफ्यात ४५ ते ५० सेंमी अंतर ठेवून त्यावर ४५ x ३० सेंमी अंतरावर झेंडूची लागवड केली जाते.

६) बाजारपेठेचा अभ्यास करून निवडलेल्या जातीची हंगामनिहाय लागवड करावी. पावसाळी हंगामात उंच जातीसाठी ६० सेंमी x ३० सेंमी आणि मध्यम उंच जातीसाठी ६० सेंमी x ४५ सेंमी अंतर ठेवावे. हिवाळ्यात उंच जातीसाठी ६० सेंमी x ४५ सेंमी, मध्यम उंच जातीसाठी ४५ सेंमी x ३० सेंमी तर बुटक्या जातीसाठी ३०सेंमी x ३० सेंमी अंतरावर लागवड करावी. मात्र उन्हाळ्यात उंच जातीसाठी ४५ सेंमी x ४५ सेंमी आणि मध्यम उंच जातीसाठी ४५ सेंमी x ३० सेंमी अंतरावर लागवड करावी.

७) लागवडीसाठी जमीन तयार करताना पुरेसे शेणखत जमिनीत मिसळावे. झेंडूसाठी १०० : ७५ : ७५ किलो नत्र, स्फुरद आणि पालाश या रासायनिक खताची मात्रा शिफारस करण्यात आली आहे. संपूर्ण स्फुरद व पालाश तसेच अर्ध्या नत्राची मात्रा लागवडीच्या सुरवातीला द्यावी. उरलेले अर्धे नत्र पुनर्लागवडीनंतर ३० ते ४० दिवसांनी द्यावे. नत्राची मात्रा जास्त झाल्यास झेंडूची शाकीय वाढ भरपूर होते व फुलांचे कमी उत्पादन मिळते. ठिबक सिंचन पद्धतीमध्ये विद्राव्य खताचा वापर करावा.

८) गरजेनुसार व जमिनीच्या मगदुरानुसार पाणी द्यावे. खरीप हंगामात पाऊस नसेल तर १५ ते २० दिवसांनी हिवाळ्यात १० ते १५ तर उन्हाळ्यात ५ ते ७ दिवसांनी पाणी द्यावे. फुलबहाराच्या काळात पाण्याचा ताण पडू देवू नये.

९) रोपे लावल्यानंतर दोन आठवड्यांनतर खुरपणी करावी. खुरपणी करताना रोपाला मातीची भर द्यावी, म्हणजे रोपे फुलाच्या ओझ्याने कोलमडून पडणार नाहीत.

शेंडा खुडणे :

आफ्रिकन झेंडू हा उंच वाढतो. त्याची वाढ नियंत्रित ठेवून जास्तीतजास्त फुटवे येऊन उत्पादन वाढावे, म्हणून शेंडा वाढ खुडण्याचा प्रघात आहे. शेंडा खुडल्याने उंच वाढणाऱ्या जातींची वाढ खुंटते , बगल फुटी भरपूर येतात व झुडपासारखा झाडाला आकार येतो. साधारणत : लागवडीनंतर ४५ ते ५० दिवसांनी रोपांचा शेंडा खुडावा. शेंडा खुडण्यास उशीर झाला तर वाढ, उत्पादनावर अनिष्ट परिणाम होतो.

झेंडूच्या जाती :

झेंडूच्या आफ्रिकन, फ्रेंच आणि संकरित जाती आहे . साधारणतः आफ्रिकन जाती उंच वाढणाऱ्या तर फ्रेंच व संकरित जाती मध्यम ते कमी उंचीच्या आढळतात. या जातींना नारंगी व पिवळ्या रंगाची फुले लागतात. पुसा नारंगी गेंदा व पुसा बसंती गेंदा या जाती लागवडीसाठी चांगल्या आहेत. आफ्रिकन झेंडूचे १५ ते १८ टन तर फ्रेंच झेंडूचे १० ते १२ टन प्रति हेक्टरी उत्पादन मिळते.

संपर्कः शिवाजी गायकवाड, ९४२२८६२२३२

(अखिल भारतीय समन्वित पुष्प संशोधन प्रकल्प, विभागीय कृषी संशोधन केंद्र, गणेशखिंड, पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Cotton Anudan : २६ सप्टेंबरपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सोयाबीन, कापूस अनुदान जमा होणार; कृषिमंत्री मुंडेंनी दिली माहिती

Agriculture Power Bill : कृषी वीज बिले दुरूस्त करा अन्यथा आंदोलन, इरिगेशन फेडरेशनकडून इशारा

Agriculture Management : पुरातही पिके वाचविणारी ‘एसआरटी’ पद्धत

Agriculture Import Export : आयात-निर्यातीत हवी समयसूचकता

PM Kisan Scheme : पी.एम.किसान योजना; अठराव्या हप्त्यास शेतकरी मुकणार, तेरा हजार खाती आधार लिंकविना

SCROLL FOR NEXT