Crop Advisory
Crop Advisory Agrowon
ॲग्रो गाईड

Crop Advisory : कृषी सल्ला : कोकण विभाग

Team Agrowon

काजू

फुलोरा ते फळधारणा अवस्था

फुलोरा ते फळधारणा अवस्थेतील काजूवर (Cashew) मावा आणि ढेकण्या (टी मॉस्किटो बग) किडीचा प्रादुर्भाव (Cashew Pest) दिसून येण्याची शक्यता आहे. ही कीड मोहोर आणि फळांतील रस शोषून घेते.

किडीचे पिले आणि प्रौढ यांची लाळ ही फायटोटॉक्सिक असल्याने पालवी किंवा मोहोर सुकून जातो. मोहोराच्या दांड्यावर काळे डाग दिसून येतात. फळगळ होते. मावा कीड शरिरावाटे मधासारखा गोड चिकट द्रव स्रवते. त्याकडे मुंग्या आकर्षित होतात.

किडीच्या नियंत्रणासाठी, (फवारणी ः प्रतिलिटर पाणी)

मोहोर फुटण्यावेळी ः प्रोफेनोफोस (५० टक्के प्रवाही) १ मिलि

फळधारणेच्या वेळी ः लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) ०.६ मिलि किंवा ॲसिटामिप्रीड (२० टक्के एसपी) ०.५ ग्रॅम याप्रमाणे फवारणी द्रावण पानांच्या खालील आणि वरील बाजूस व्यवस्थित बसेल अशी करावी. फवारणी शक्यतो सकाळी १० पूर्वी किंवा संध्याकाळी ४ नंतर करावी.

(एकाच कीटकनाशकाची सलग फवारणी घेणे टाळावे.)

काजू पिकाची फळधारणा व उत्पन्न वाढविण्यासाठी सुकविलेल्या माशांचा अर्क ५०० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फुले येताना पहिली फवारणी करावी. त्यानंतर १० दिवसांनी दुसरी फवारणी करावी.

फळधारणा अवस्थेतील काजूवर बोंड आणि बी पोखरणाऱ्या अळीच्या प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता असते. किडीची अळी बी व बोंडावरील भाग खरवडून त्यावर उपजीविका करते.

नियंत्रणासाठी ः फवारणी प्रतिलिटर पाणी

प्रोफेनोफोस १.५ मिलि

कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता असल्याने फळधारणा झालेल्या काजू झाडांना १५० ते २०० लिटर

पाणी प्रति झाडास याप्रमाणे १५ दिवसांच्या अंतराने द्यावे. नवीन लागवड केलेल्या रोपांना पहिली २ ते ३ वर्षे ८ दिवसांच्या अंतराने १५ लिटर पाणी प्रति कलम याप्रमाणे द्यावे. झाडाच्या बुंध्याभोवती गवताचे आच्छादन करावे.

काजू झाडाच्या खोड आणि उघड्या मुळांवर खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता असते. किडीच्या प्रादुर्भावासाठी खोडाचे वेळोवेळी निरीक्षण करावे. खोडकिडीची कीड झाडाची साल पोखरून आतील गाभा खाते. खोडाला पडलेल्या छिद्रातून भुसा बाहेर पडलेला दिसतो. खोडातून भुसा येताना दिसल्यास त्वरित नियंत्रणाचे उपाय करावे.

नियंत्रणासाठी खोडाची प्रादुर्भीत साल काढून तारेच्या हुकाने किडीला बाहेर काढून मारून टाकावे. त्यानंतर

क्लोरपायरिफॉस (२० टक्के प्रवाही) ५ मिलि प्रति लिटर पाणी याप्रमाणे द्रावण करून साल काढलेला भाग चांगला भिजवावा किंवा क्लोरपायरिफॉस (२० टक्के प्रवाही) १० मिलि अधिक रॉकेल ५० मिलि याप्रमाणे द्रावण छिद्रामध्ये ओतावे.

झाडाला कोणत्याही प्रकारे इजा करू नये. इजा झाल्यास बोर्डो पेस्ट लावून जखम झाकावी. झाडाची मुळे उघडी राहणार नाही याची काळजी घ्यावी.

बागेतील गवत काढून नियमित साफसफाई करावी. वाळलेल्या फांद्या कापलेल्या भागावर डांबर लावावे. जेणेकरून किडीचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल.

भाजीपाला पिके

फुलोरा ते फळधारणा

तापमानात वाढ संभवत असल्याने भाजीपाला पिकांना गरजेनुसार हलके सिंचन द्यावे. शक्यतो सकाळी लवकर किंवा संध्याकाळी पाणी द्यावे.

तापमान वाढीमुळे बाष्पीभवनात वाढ होऊन जमिनीतील ओलावा लवकर कमी होतो. यासाठी जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी पेंढा किंवा गवताचे आच्छादन करावे.

भेंडी

उन्हाळी हंगामात भेंडी पिकाची लागवड करण्यासाठी करण्यासाठी जमिनीची नांगरणी करून ढेकळे फोडून घ्यावेत.

चांगले कुजलेले शेणखत १५० किलो प्रति गुंठा प्रमाणे जमिनीत मिसळावे.

लागवड ४५ बाय १५ सेंमी अंतरावर करावी.

पेरणीच्या वेळी युरिया ७०० ग्रॅम, सिंगल सुपर फॉस्फेट ३ किलो आणि म्युरेट ऑफ पोटॅश ४०० ग्रॅम प्रति गुंठा प्रमाणे खतांची मात्रा द्यावी. पेरणीनंतर हलके पाणी द्यावे.

कलिंगड

फळधारणा ते पक्वता

तापमानात वाढ संभवत असल्याने कलिंगडाच्या फळांचे सूर्यप्रकाशापासून बचाव करण्यासाठी फळे भाताच्या पेंढ्याने किंवा गवताने झाकून घ्यावीत.

फळधारणा अवस्थेतील पिकास ताण बसण्याची शक्यता असल्याने पिकाला गरजेनुसार पाणी देण्याची व्यवस्था करावी. फळे काढणीपूर्वी आठवडाभर अगोदर पिकास पाणी देणे बंद करावे.

तयार कलिंगड फळांवर टिचकी मारल्यास टणटण असा आवाज येतो. तसेच तयार फळांचा जमिनीलगतचा रंग पिवळसर आणि देठाजवळील लतातंतू सुकतात. ही कलिंगड फळ पक्वतेची लक्षणे असून अशा फळांची काढणी करावी.

 (०२३५८) २८२३८७, ८१४९४६७४०१

- डॉ. विजय मोरे, ९४२२३७४००१

(ग्रामीण कृषी मौसम सेवा, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT