भरत पवार, डॉ. गणेश कोटगिरे
Sugarcane Disease Control : ऊस पिकावरील तपकिरी तांबेरा आणि ठिपके हे बुरशीजन्य रोग आहेत. हवेतील वाढलेली आर्द्रता आणि तापमान या दोन बाबी रोकारक बुरशीच्या वाढीस आणि प्रसारासाठी पोषक ठरतात. रोगाचा प्रादुर्भाव प्रामुख्याने पानांवर दिसून येतो. पानांवरील रोगाची योग्य लक्षणे ओळखून नियंत्रणासाठी वेळीच उपाय करावेत.
तपकिरी तांबेरा ः
- या बुरशीजन्य रोगाचा प्रसार हवेद्वारे होतो.
- रोगाच्या प्रादुर्भावामुळे पिकाचे ४० टक्क्यांपर्यंत नुकसान होण्याची शक्यता असते.
- पावसाळ्यात हवेतील वाढणारी आर्द्रता आणि तापमान या दोन बाबी रोगकारक बुरशीच्या वाढ आणि प्रसाराकरिता पोषक ठरतात.
- को ४१९, कोसी ६७१, कोव्हीएसआय ९८०५, को ९२००५, एमएस १०००१, व्हीएसआय ४३४ आणि कोएम ०२६५ या जाती जास्त बळी पडतात. अलीकडेच को ८६०३२ या जातीवर देखील रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला आहे.
- स्फुरद व पालाश जास्त असणाऱ्या जमिनीतील लागवडीमध्ये रोगाची तीव्रता अधिक दिसून येते.
लक्षणे ः
- सुरुवातीस पानांच्या खालील बाजूस लहान व लांबट पिवळे ठिपके दिसून येतात. कालांतराने ठिपक्यांची लांबी वाढते आणि त्यांचा रंग लालसर तपकिरी किंवा तपकिरी दिसून येतो.
- ठिपक्यांचा भाग बुरशी आणि बीजाणूंच्या वाढीमुळे फुगीर होतो. त्यानंतर पानांच्या ठिपक्यालगतचा भाग फुटून त्यातून नारिंगी किंवा तांबूस-तपकिरी रंगाचे बीजाणू बाहेर पडतात.
- रोगग्रस्त पानाच्या पाठीमागील पृष्ठभागावरून बोट फिरविल्यास बीजाणूची पावडर सहजपणे बोटास चिकटते.
- पावसाळ्यानंतर ढगाळ वातावरण, जास्त आर्द्रता व थंड हवा या हवामान स्थितीमध्ये जास्त प्रादुर्भाव दिसून येतो.
रोगप्रसार ः
हवा, पाणी, पाऊस व कीटकांद्वारे होतो.
नियंत्रणाचे उपाय :
- जास्त प्रादुर्भाव असलेल्या ठिकाणी कोव्हीएसआय ०३१०२, व्हीएसआय ०८००५ या मध्यम रोग प्रतिकारक जातींची लागण करावी.
- माती परीक्षणानुसार रासायनिक खतांच्या मात्रा योग्य वेळी द्याव्यात. नत्रयुक्त खतांचा आणि इतर खतांच्या मात्रा उशिरा देणे टाळावे.
- शेतातील अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.
- रासायनिक फवारणीपूर्वी रोगग्रस्त आणि वाळलेली पाने शेताबाहेर काढावीत.
रासायनिक नियंत्रण (फवारणी ः प्रतिलिटर पाणी)
- प्रॉपिनेब (०.२५ टक्का) २.५ ग्रॅम किंवा
- मॅन्कोझेब (०.३ टक्का) ३ ग्रॅम
स्टिकरसह मिसळून १० दिवसांच्या अंतराने आवश्यकतेनुसार २ ते ३ फवारण्या कराव्यात.
तपकिरी ठिपके ः
- रोगाचा प्रादुर्भाव वर्षभर आढळून येत असला तरी, पावसाळ्यात अतिवृष्टीनंतर रोगाची तीव्रता वाढते.
- जास्त आर्द्रता आणि २५ ते ३० अंश सेल्सिअस दरम्यानचे तापमान या बाबी रोगाचा प्रादुर्भाव आणि प्रसारास अनुकूल आहेत.
- कोएम ०२६५ आणि को ८६०३२ या जाती जास्त बळी पडतात.
लक्षणे ः
- पानांवर लाल-तपकिरी रंगाचे ठिपके दिसून येतात. ठिपक्यांचा आकार टाचणीच्या टोकापासून ते ३ ते १५ मिमी इतका आढळतो.
- ठिपक्यांचा आकार अंडाकृती किंवा लंबगोलाकार असून सभोवतालचा भाग पिवळा दिसतो.
- कोवळ्या पानांपेक्षा जुन्या पानांवर जास्त ठिपके आढळून येतात.
- पानाच्या दोन्ही बाजूंस ठिपके सारखेच दिसतात. ठिपके पानांवर सर्वत्र सारख्या प्रमाणात विखुरलेले आढळतात.
- रोगाच्या अति तीव्रतेमध्ये ठिपके संपूर्ण पानावर पसरून पूर्ण पान करपते.
- पानांची पूर्ण वाढ होण्याआधीच पाने पिवळी पडतात. पानांद्वारे होणारे प्रकाश संश्लेषण आणि साखर निर्मितीचे कार्य मंदावते किंवा थांबते.
नियंत्रण ः
- माती परीक्षणानुसार सेंद्रिय, रासायनिक आणि जैविक खताच्या मात्रा वेळेवर द्याव्यात.
- पावसाळ्यात पावसाचे पाणी शेतात साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी. पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करावी.
रासायनिक नियंत्रण (फवारणी ः प्रतिलिटर पाणी)
- कॉपर ऑक्झिक्लोराइड (०.२ टक्का) २ ग्रॅम किंवा मॅन्कोझेब (०.३ टक्का) ३ ग्रॅम.
याप्रमाणे १५ दिवसांच्या अंतराने २ ते ३ फवारण्या घ्याव्यात.
प्रतिबंधात्मक उपाय ः
- ऊस लागवडीकरिता निचरायुक्त जमिनीची निवड करावी.
- ऊस पिकाचा कालावधी मोठा असल्याने जमिनीच्या समस्या टाळण्यासाठी योग्य पद्धतीने पूर्वमशागत करून घ्यावी.
- लागवडीकरिता रुंद सरी किंवा पट्टा पद्धतीने रानबांधणी करावी.
- हंगामनिहाय व जातनिहाय लागवडीचे नियोजन करावे. शिफारशीत ऊस जातींची लागण करावी.
- लागणीसाठी बेणे मळ्यातील बेण्याचा वापर करावा. बेणे मळ्यातील बेणे उपलब्ध नसल्यास, १० ते ११ महिने वयाचे कीड-रोगमुक्त बेणे वापरावे.
- ऊस बेण्यास लागणीपूर्वी,
कार्बेन्डाझिम (०.१ टक्का) १ ग्रॅम अधिक इमिडाक्लोप्रिड (७० टक्के) ०.३ प्रतिलिटर पाणी (टॅंक मिक्स) याप्रमाणे द्रावण तयार करून त्यात १० ते १५ मिनिटे बेणेप्रक्रिया करावी.
- खोल काळ्या जमिनीत उसाची लागण कोरड्या पद्धतीने करावी. जेणेकरून लागण खोलवर होणार नाही. अशा ठिकाणी रोपांचा वापर करावा.
- सेंद्रिय, रासायनिक व जैविक खतांचा वापर माती परीक्षण अहवालानुसार व वेळेवर करावा.
- तणनियंत्रण, बाळबांधणी व मोठी बांधणी ही आंतरमशागतीची कामे वेळेवर करावी.
- रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी किडींचे नियंत्रण वेळीच करावे. जेणेकरून रोगाच्या प्रसारास आळा बसेल.
- ऊसपिकात कणखरपणा वाढण्यासाठी सल्फर, कायटोसन आणि सिलिकॉनयुक्त उत्पादनांचा वापर फायदेशीर आहे. (* ॲग्रेस्को शिफारस)
- ०२०-२६०९०२२६८
- भरत पवार, ९८९०४२२२७५
- डॉ. गणेश कोटगिरे, ८७८८१५३३३२
(वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी (बु.), पुणे)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.