Compost Making Agrowon
ॲग्रो गाईड

Compost Making : गाजर गवतापासून कंपोस्ट निर्मिती तंत्र

Congress Weed : गाजर गवत शेतामध्ये मुख्य पिकासोबत अन्नद्रव्यांसाठी स्पर्धा करते. त्यामुळे पीक उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता असते. त्यासाठी गाजरगवत शेताबाहेर काढून टाकणे आवश्यक आहे.

Team Agrowon

डॉ. ए. एन. पसलावार, डॉ. व्ही. व्ही. गौड

Congress Grass Compost : गाजर गवत शेतामध्ये मुख्य पिकासोबत अन्नद्रव्यांसाठी स्पर्धा करते. त्यामुळे पीक उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता असते. त्यासाठी गाजरगवत शेताबाहेर काढून टाकणे आवश्यक आहे. याच गाजर गवतापासून उत्तम दर्जाचे कंपोस्ट निर्मिती होऊ शकते. या खताचा वापर शेतामध्ये केल्यास जमिनीच्या सुपीकता वाढीस मदत होईल.

गाजर गवत हे प्रामुख्याने काँग्रेस गवत, पांढरीफुली, चटकचांदणी इत्यादी नावांनी ओळखले जाते. शास्त्रीय भाषेत याला ‘पार्थेनियम हिस्टेरोफोरस’ (Parthenium hysteroforus) असे म्हटले जाते. हे गवत शेतजमीन, मानव, प्राणी, पर्यावरण आणि जैवविविधतेसाठी अत्यंत घातक आहे. दरवर्षी गाजर गवताच्या समूळ निर्मूलनासाठी ‘१६ ते २२ ऑगस्ट’ या कालावधीत ‘गाजर गवत जागरूकता सप्ताह’ आयोजित केला जातो.
हे बाहमाही गवत अतिशय वेगाने वाढते. शेताचे बांध, पडीक जमिनी, कुरणे, औद्योगिक वस्ती, रेल्वेमार्ग, रस्ते यांच्या बाजूने उगवलेले दिसून येते. मागील काही वर्षांमध्ये सर्व प्रकारच्या पिकांमध्ये तसेच फळबागांमध्ये हे गवत झपाट्याने वाढल्याचे दिसून येत आहे. हे गवत शेतामध्ये मुख्य पिकासोबत अन्नद्रव्यांसाठी स्पर्धा करते. त्यामुळे पीक उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता असते.

पीक उत्पादनामध्ये रासायनिक खतांच्या सातत्याने होणाऱ्या अतिवापरामुळे दिवसेंदिवस शेतजमिनीची सुपीकता कमी होत चालली आहे. त्यासाठी रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय खते, कंपोस्ट खतांचा वापर वाढविणे आवश्यक आहे. गाजर गवतापासून चांगल्या दर्जाच्या कंपोस्ट खताची निर्मिती होऊ शकते. त्यामुळे दुहेरी फायदे होतात. शेतातील गाजर गवताचे प्रमाण कमी होईल शिवाय खतनिर्मितीमधून जमिनीची सुपीकता वाढीस चालना मिळेल.

कंपोस्ट बनविण्याची पद्धत ः
नाडेप किंवा खड्डा पद्धतीद्वारे कंपोस्ट तयार करण्यासाठी फुलांवर येण्यापूर्वीची गाजरगवताची झाडे गोळा करण्याची शिफारस आहे. सुमारे १०० किलो हिरव्या गाजर गवतापासून ३७ ते ४५ किलो कंपोस्ट खतनिर्मिती होऊ शकते.

- कंपोस्ट निर्मितीसाठी पाणी साचणार नाही अशी जागा निवडावी. त्याजागी ३ फूट खोल, ६ फूट रुंद आणि १० फूट लांबीचा खड्डा तयार करावा. खड्ड्याचा आकार आवश्यकतेनुसार कमी जास्त करता येतो. परंतु खोली शिफारशीप्रमाणेच (३ फूट) ठेवावी.
- खड्डा भरण्यासाठी गाजरगवत १०० किलो, शेण १०० किलो, युरिया किंवा रॉक फॉस्फेट १० किलो, माती २०० किलो आणि पाणी इत्यादी साहित्य लागते.
- शेतातून किंवा परिसरातून फुलावर येण्यापूर्वीच्या अवस्थेतील गाजर गवताची झाडे गोळा करावीत. ही झाडे तयार केलेल्या खड्ड्याच्या पृष्ठभागावर सुमारे १०० किलो प्रमाणे पसरावीत. त्यावर ५०० ग्रॅम युरिया किंवा ३ किलो रॉक फॉस्फेट शिंपडावे. असे थरांवर थर करावेत.

- सेंद्रिय पिकांमध्ये या खताचा वापर करायचा असल्यास युरियाचा वापर करणे टाळावे. त्याऐवजी ट्रायकोडर्मा व्हिरीडी किंवा ट्रायकोडर्मा हर्जियानम ५० किलो प्रति थर याप्रमाणे वापर करावा.
- पहिला थर टाकल्यानंतर जमिनीच्या पृष्ठभागापासून १ फूट उंचीपर्यंत खड्डा भरून घ्यावा. प्रत्येक थरामध्ये गाजर गवत, युरिया किंवा रॉक फॉस्फेट आणि शेणमाती यांचा एकसमान वापर करावा.
- थर बनविताना प्रत्येक थरानंतर पायांनी दाब द्यावा. त्यामुळे गाजर गवत घट्ट होण्यास मदत होईल.
- थर एकमेकांवर दिल्यानंतर खड्डा घुमट आकारात भरून घ्यावा. वरीलप्रमाणे थरांवर थर देऊन खड्डा भरून घ्यावा. भरलेला खड्डा शेण, माती आणि पीक अवशेष किंवा भुस्सा यांच्या मिश्रणाने झाकून घ्यावा.
- साधारण ४ ते ५ महिन्यांनंतर चांगले विघटित कंपोस्ट खत तयार होते.

तयार कंपोस्टची चाळणी ः
- खड्ड्यातून कंपोस्ट काढून घेतल्यानंतर, त्यात काही देठ दिसून येतील. त्यावरून गाजर गवत वनस्पती अद्याप विघटित झालेली नसल्याचे दिसून येईल. पण प्रत्यक्षात ती चांगले विघटित झालेले असेल. चाळल्यानंतर चाळणीत शिल्लक राहिलेले देठ काढून टाकावेत.
- हे कंपोस्ट सुकण्यासाठी सावलीच्या ठिकाणी पसरून ठेवावे. या कोरड्या कंपोस्टचा ढीग बनवून घ्यावा.
- तयार खताचा वापर विविध पिके, फळबागा आणि परस बागेमध्ये करता येतो.

कंपोस्टमधील पोषक घटक ः
प्रकार---नत्र (टक्के)---स्फुरद (टक्के)---पालाश (टक्के)---कॅल्शिअम (टक्के)---मॅग्नेशिअम (टक्के)
गाजर गवत कंपोस्ट---१.०५---०.८४---१.११---०.९०---०.५५
गांडूळ खत---१.६१---०.६८---१.३१---०.६५---०.४३
शेणखत---०.४५---०.३०---०.५४---०.५९---०.२८
(स्त्रोत ः सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण प्रकल्प, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)

घ्यावयाची काळजी ः
गाजर गवतापासून कंपोस्टनिर्मिती करताना काही दक्षता बाळगणे आवश्यक आहे.
- खड्ड्याची जागा ही उघड्या ठिकाणी आणि सावलीत असावी.
- खड्डा भरून झाल्यानंतर तो माती आणि शेण मिश्रणाने झाकून ठेवावा.
- खड्डा केलेल्या ठिकाणी गाजर गवताची ताजी उगवण दिसून आल्यास त्वरित नष्ट करावी. अन्यथा, ते फुलावर आल्यानंतर संपूर्ण कंपोस्ट दूषित होण्याची शक्यता असते.
- कंपोस्टमधील ओलाव्याची पातळी वेळोवेळी तपासावी. खड्ड्यात कोरडेपणा असल्यास, छिद्र करून त्यातून पाणी घालून नंतर छिद्र बंद करावे.
- कंपोस्ट प्रक्रियेदरम्यान खड्ड्यातील तापमान ६० ते ७० अंश सेल्सिअसपर्यंत वाढते. त्यामुळे गाजर गवत वनस्पतीचे बियाणे नष्ट होण्यास मदत होते.

फायदे ः
- चांगले कुजलेले गाजर गवत कंपोस्टचा पिकांवर, मानवासह जनावरे आणि पर्यावरणावर कोणतेही हानिकारक परिणाम होत नाही.
- गाजर गवतामध्ये असलेले पार्थेनियम हे विषारी रसायन कंपोस्ट निर्मिती दरम्यान पूर्णपणे विघटित होते.
- नत्र, स्फुरद आणि पालाशचे प्रमाण जास्त असते. पिकांस आवश्यक असलेली सूक्ष्म अन्नद्रव्येही उपलब्ध असतात.
- कमी किमतीत उपलब्ध निविष्ठांचा वापर करून दर्जेदार खत तयार होते.

वापर (प्रति हेक्टर मात्रा) ः
भाजीपाला पिकांमध्ये हेक्टरी ४ ते ५ टन आणि इतर पिकांमध्ये पेरणीवेळी २.५ ते ३ टन प्रमाणे वापर करता येईल.

- डॉ. व्ही. व्ही. गौड, ८६३७७०७६४५
(डॉ. पसलावार, हे सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्रामध्ये संचालक म्हणून तर
डॉ. गौड हे अखिल भारतीय समन्वयीत तण व्यवस्थापन संशोधन प्रकल्प,
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे मुख्य अन्वेषक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Garlic Rate : लसणाची आवक घटल्याने दर तेजीतच

Forest Fire : वणवे नियंत्रणासाठी जनजागृती करण्याची गरज

Sugarcane Labor Migration : निवडणूक संपताच ऊसतोड मजुरांचे स्थलांतर

Sugarcane FRP : मंडलिक साखर कारखाना इतरांच्या बरोबरीने दर देणार

Milk Rate : देशातील दूध उत्पादनात ४ टक्के वाढ; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT