Compost Agrowon
ॲग्रो गाईड

Compost : कंपोस्ट बदनाम का झाले ?

आजवर कोणाच्याही हे लक्षात आलेले दिसत नाही, की कोणत्याही सर्वसामान्य शेतजमिनीत याहून अधिक प्रमाणात नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशिअम असतात. शिवाय कोणताच शेतकरी एवढ्या मोठ्या प्रमाणात कंपोस्ट वापरत नाही.

Team Agrowon

डॉ. आनंद कर्वे

सुमारे शंभर वर्षांपूर्वी आल्बर्ट हॉवर्ड (Albert Howard) नामक एक ब्रिटिश अधिकारी इंदूर संस्थानच्या नोकरीत होता. इंदूर शहरातून निघणाऱ्या विघटनक्षम शहरी कचऱ्यापासून कंपोस्ट (Compost) नावाचे सेंद्रिय खत (Organic Fertilizer) तयार करण्याची रीत त्याने शोधून काढली.

या पद्धतीत कचरा आणि माती (Soil) यांचे एकावर एक असे काही थर दिले जातात. मातीतल्या सूक्ष्मजंतूंना या थरांमधला कचरा पूर्णपणे कुजवायला साधारणपणे तीन महिने लागतात.

ही क्रिया पूर्ण झाल्यावर मागे उरणाऱ्या कंपोस्ट नामक पदार्थाचा शेतात सेंद्रिय खत म्हणून उपयोग होऊ शकतो. हीच प्रक्रिया वापरून त्याज्य शेतमालापासूनही कंपोस्ट करता येते, हेही हॉवर्डने दाखविले.

हॉवर्डने हे काम केले त्या वेळी वनस्पती आपल्याला लागणारा कार्बन हवेतून घेतात, हायड्रोजन व ऑक्सिजन पाण्यातून घेतात, तर नायट्रोजन आणि खनिज मूलद्रव्ये मातीतून घेतात हे माहिती झाले होते.

रासायनिक खतांचा शोधही लागलेला होता; पण जगात कोठेच मोठ्या प्रमाणावर रासायनिक खते वापरली जात नव्हती. त्यामुळे त्या काळात भारतासकट जगातले बहुतेक सर्व शेतकरी सेंद्रिय पद्धतीनेच आपापली शेती करीत असत.

या पार्श्‍वभूमीवर स्थानिक पातळीवर उपलब्घ असणारा विघटनक्षम कचरा किंवा आपल्याच शेतातला त्याज्य शेतमाल आणि स्थानिक माती वापरून वनस्पतींना लागणारे सर्व पोषक घटक उपलब्ध करून देण्याची एक सोपी आणि स्वस्त पद्धती विकसित केल्याबद्दल ब्रिटिश सरकारने आल्बर्ट हॉवर्ड यास ‘सर’ ही पदवी बहाल केली. पुढे ‘इंदूरची कंपोस्ट पद्धती’ या नावाने ही पद्धती सर्वत्र वापरली जाऊ लागली.

कंपोस्ट कसे निर्माण होते याबद्दल कृषिशास्त्राच्या पाठ्यपुस्तकांमध्ये उपलब्ध असणारी माहिती अशी आहे ः कंपोस्ट करण्यासाठी वापरलेल्या मातीतले सूक्ष्मजंतू प्रकाशसंश्‍लेषण करू शकत नाहीत म्हणून ते आपल्याला लागणारा कार्बन मातीत मिसळलेल्या सेंद्रिय पदार्थांमधून काढून घेतात.

त्यांनी कार्बन काढून घेतला की सेंद्रिय पदार्थांतले नायट्रोजन आणि खनिज घटक मुक्त होऊन ते मातीत मिसळले जातात. सेंद्रिय पदार्थ पूर्णपणे कुजून नष्ट होईपर्यंत ही प्रक्रिया चालू राहते आणि मागे शिल्लक उरते ते कंपोस्ट.

या कंपोस्टमध्ये मूळच्या सेंद्रिय पदार्थांमधील नायट्रोजन आणि खनिज मूलद्रव्ये मिसळली गेल्याने त्याचे पोषणमूल्य वाढलेले असते. त्यामुळेच वनस्पतींना कंपोस्ट दिल्यास त्यातून त्यांना आवश्यक असणारे सर्व पोषकपदार्थ मिळतात आणि त्यांची वाढ चांगली होते.

थोडक्यात म्हणजे माती आणि सेंद्रिय पदार्थ एकत्र कुजविल्याने मातीची सुपीकता वाढते. यातील ‘मातीची सुपीकता वाढते’ हे विधान जरी सत्य असले, तरी त्यासाठी पाठ्यपुस्तकांमध्ये दिलेले स्पष्टीकरण मात्र चुकीचे आहे.

कारण मातीतले जंतू सेंद्रिय पदार्थांमधून केवळ कार्बन काढून घेतात हाच मुळात एक चुकीचा समज आहे. मातीतले सूक्ष्मजंतू जेव्हा सेंद्रिय पदार्थांचे विघटन करतात, तेव्हा त्या जंतूंची संख्या वाढते.

या प्रक्रियेत जे नवे सूक्ष्मजंतू जन्माला येतात त्यांना केवळ कार्बनच नव्हे तर खनिज घटकही लागतात. कारण बॅक्टेरियांच्या पेशिकांमध्ये त्यांच्या शुष्कभाराच्या १५ ते २० टक्के खनिज घटक असतात.

त्यामुळे सूक्ष्मजंतू जेव्हा सेंद्रिय पदार्थ कुजवतात तेव्हा ते त्यातला केवळ कार्बनच घेतात, हे म्हणणे चुकीचे आहे. सत्य परिस्थिती अशी आहे, की सूक्ष्मजंतू सेंद्रिय पदार्थांमधील कार्बन तर घेतातच, पण ते त्यातील नायट्रोजनसकट इतर खनिज घटकही घेतात.

कंपोस्ट तयार करण्याच्या कृतीत त्यात घातलेले सेंद्रिय पदार्थ कुजून गेले की मागे उरते ती मुख्यतः मातीच असते.

या मातीचे विश्‍लेषण केल्यावर असे दिसते की तिच्यात सुमारे १ टक्का नायट्रोजन आणि त्याहूनही कमी प्रमाणात फॉस्फरस आणि पोटॅशिअम हे घटक असतात.

कंपोस्टमधली पोषकद्रव्ये इतकी कमी असल्याने शेतात प्रति हेक्टर सुमारे १० ते २० टन कंपोस्ट घालावे असा सल्ला सर्व कृषितज्ज्ञ देतात.

आजवर कोणाच्याही हे लक्षात आलेले दिसत नाही की कोणत्याही सर्वसामान्य शेतजमिनीत याहून अधिक प्रमाणात नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशिअम असतात.

शिवाय कोणताच शेतकरी एवढ्या मोठ्या प्रमाणात कंपोस्ट वापरत नाही. कमी पोषणमूल्य असूनही कंपोस्ट घातल्यावर पीक चांगले का वाढते याचे कारण मात्र कोणत्याच पाठ्यपुस्तकात सापडत नाही. ते मी माझ्या स्वतःच्या संशोधनाने शोधून काढले.

‘नास्ति मूलम् अनौषधम्‌’ हे संस्कृत वचन आहे. आयुर्वेदातील सुमारे ६० टक्के औषधे वनस्पतींच्या मुळांवर आधारित आहेत. यावरून मुळांमध्ये औषधी गुण असतात हे आपल्या आयुर्वेदाचार्यांना फार पूर्वीच समजले असावे असे वाटते.

अलेक्झांडर फ्लेमिंग याने १९२६ मध्ये पेनिसिलीनचा शोध लावला तेव्हापासून वनस्पतींपासून जंतुनाशक प्रतिजैविके मिळू शकतात हे पाश्‍चात्त्यांच्याही लक्षात आले. त्यांनी आधुनिक विज्ञानाचा वापर करून वनस्पतींमधली प्रतिजैविके शोधण्यास सुरुवात केली.

सन १९५० पर्यंत हे सर्वांना माहिती झाले, की जगातल्या सर्व वनस्पती आपल्या मुळांद्वारे प्रतिजैविके निर्माण करून ती मातीत सोडतात. परंतु या प्रतिजैवकांचा खरा उद्देश कोणालाच समजला नव्हता.

आजही सर्व पाठ्यपुस्तकांमध्ये असेच लिहिलेले आढळते, की मुळांमधून स्रवणाऱ्या प्रतिजैविकांमुळे वनस्पतींचे मातीतल्या रोगकारक बुरशी, सूक्ष्मजंतू आणि सूक्ष्मकृमींपासून संरक्षण होते.

फिनलॅंडमधील शास्त्रज्ञांना २०१० मध्ये असा शोध लागला, की मुळांमधून प्रतिजैविकांबरोबरच पाचक विकरही स्रवतात.

तोच धागा पकडून मी गेली काही वर्षे प्रयोग करून हे दाखवून दिले, की वनस्पती आपल्याला लागणारा नायट्रोजन आणि खनिज मूलद्रव्ये मिळवण्यासाठी मातीतल्या सूक्ष्मजंतूंना मारून खातात.

आणि याच शोधातून पोषक घटकांचे प्रमाण अत्यल्प असूनही कंपोस्टमुळे वनस्पतींची वाढ चांगली का होते, या प्रश्‍नाचे उत्तर मिळाले. कारण कंपोस्टमध्ये प्रति ग्रॅम १० कोटी बॅक्टेरिया असतात.

वनस्पती आपल्याला लागणारे खनिज घटक मातीतून घेतात हे जरी खरे असले, तरी ते पाण्यात पूर्णपणे विरघळलेल्या स्वरूपात असतील तरच ते वनस्पतींना घेता येतात.

त्यामुळे जेव्हा शेतीच्या दृष्टिकोनातून मातीपरीक्षण केले जाते, तेव्हा मातीतल्या फक्त पाण्यात विरघळू शकणाऱ्या घटकांचाच विचार केला जातो. बॅक्टेरिया पाण्यात विरघळत नसल्याने माती परीक्षणातून ते वगळले जातात.

त्यामुळे वनस्पतींना लागणारी पोषकद्रव्ये कंपोस्टमध्ये भरपूर प्रमाणात उपलब्ध असूनही केवळ माती परीक्षणात ती दिसत नाहीत या कारणाने कंपोस्टची बदनामी करण्यात आली.

जनावरांच्या शेणात त्याच्या शुष्कभाराच्या जवळ जवळ ५० टक्के वजन बॅक्टेरियांचे असते आणि उरलेले ५० टक्के हे मुख्यतः न पचलेल्या लिग्नीनचे असते.

बॅक्टेरिया हेच वनस्पतींचे अन्न आहे, हा जरी मी लावलेला नवा शोध असला, तरी शेणामुळे पिकाची वाढ चांगली होते हे शेतकऱ्यांचे परंपरागत ज्ञान असले पाहिजे.

कारण त्यामुळेच शेणावर आधारित जिवामृत आणि पंचगव्य हे सेंद्रिय खतांचे प्रकार भारतात लोकप्रिय झाले.

जर्मनीत गुरे चारण्यासाठी राखून ठेवलेल्या कुरणांनाही महागडी रासायनिक खते न देता रेन गन वापरून थेट शेणकालाच दिला जातो, हे मी स्वतः पाहिले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Vidhansabha 2024 Live Result : राज्यातील पहिला निकाल जाहीर; वडाळा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कोळंबकर विजयी

Satara Assembly Election 2024 : साताऱ्यातील जनतेचा महायुतीकडे कल, सर्वच मतदारसंघात भाजप महायुतीची आघाडी

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 : आदिती तटकरेंचा विजय निश्चित; कोकणातील पहिला निकाल स्पष्ट

Eknath Shinde On Maharashtra Assembly Election 2024 : लाडकी बहीण, लाडके भाऊ, लाडके शेतकरी यांच्यामुळे आमचा विजय, एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

Poultry Processing Product : अबब! कडकनाथच्या अंड्यांपासून एवढी उत्पादने?

SCROLL FOR NEXT