मत्स्यबीज निर्मिती
महाराष्ट्रात मत्स्यबीज विक्रीसाठी मोठी बाजारपेठ आहे. परराज्यांतून येणाऱ्या मत्स्यबीजांच्या गुणवत्तेच्या अपुऱ्या माहितीमुळे शेतकऱ्यांची फसवणूक मोठ्या प्रमाणात दिसते. यासाठी गुणवत्तापूर्ण मत्स्यबीज निर्मितीमध्ये संधी आहे.
यातून आपण मत्स्यबीजांच्या बाबतीत स्वावलंबी होऊ शकतो.
१) प्रजननक्षम मासे (Fish) वापरून ठरावीक संरचनेमध्ये मत्स्यबीज निर्मिती केली जाते. (उदा. चायनिज/सरक्युलर कार्प हॅचरी)
२) मत्स्यबीज निर्मिती केंद्रामध्ये निर्मित झालेले मत्स्यजिरे आणून आपल्या संवर्धन तलावांत त्यापासून मत्स्यबोटुकली निर्मिती व विक्री.
मत्स्यखाद्य निर्मिती आणि पुरवठा
भारतात विविध कंपनीचे मत्स्यखाद्य उपलब्ध आहे. या कंपनीचे रिटेल व होलसेल आउटलेट घेऊन मत्स्य खाद्य विक्रीतून स्वयंरोजगार निर्मिती होते.
शासकीय योजनेतून किंवा स्वखर्चाने स्वत:चे मत्स्यखाद्य निर्मिती प्रकल्प उभारता येतात.
मत्स्यपालनातील साहित्य पुरवठा
विविध तंत्रज्ञानाद्वारे करण्यात येणाऱ्या मत्स्यपालनात वस्तू आणि साहित्य जसे नायलॉन सूत, जाळे, लाकडी नौका, इलेक्ट्रिक मोटार्स-एरेटर, पंप इत्यादीची आवश्यकता असते.
मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था, लहान मोठे मत्स्य शेतकरी आणि व्यावसायिकांना मोठया प्रमाणात या बाबींची आवश्यकता असते. रिटेल व होलसेल व्यवसायातून मोठ्या प्रमाणात स्वयंरोजगारासह इतर रोजगारनिर्मिती होते.
मासे विक्री आणि व्यापार
मासे खरेदी करताना नागरिक स्वच्छ दुकानातून ताजे, स्वच्छ किंवा जिवंत मासळी घेणे पसंत करतात. हे लक्षात घेऊन आपल्या शहरात, गावात स्वच्छ मत्स्यविक्री केंद्र उभारून विक्री किंवा ऑनलाइन पद्धतीने घरपोच मासळी विक्रीद्वारे चांगले उत्पन्न मिळवू शकतो.
आपल्या प्रकल्पात तयार मासळी किंवा इतरांची मासळी खरेदी करून स्वच्छता असलेल्या मत्स्यविक्री केंद्राव्यतिरिक्त मोठ्या मार्केटमध्ये विक्री किंवा इतर देशांत निर्यात करणे शक्य आहे.
मत्स्यप्रक्रिया आणि विक्री
बाजारात मोठ्या प्रमाणात पॅक बंद कॅन/रीटॉर्ट पाऊच मधील रेडी टू फ्रॉय, रेडी टू सर्व्ह, रेडी टू कुक, रेडी टू इट इत्यादी पदार्थांची मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे.
फिश फिलेट, फिश सॉसेज, फिश फिंगर, फिश वडा, फिश कटलेट, मत्स्य चकली इ. पदार्थ बनवून स्थानिक बाजारपेठेत विक्री करू शकतो किंवा ब्रँड बनवून ऑनलाइन तसेच ऑफलाइन पद्धतीने मोठी बाजारपेठ मिळविता येते.
मत्स्य पर्यटन
मत्स्य पर्यटन हे जगातील सर्वांत वेगाने वाढणाऱ्या पर्यटन क्षेत्रांपैकी एक आहे. अँग्लिंग, हूक आणि लाइनद्वारे मनोरंजक मासे पकडण्याचा खेळ लोकप्रिय होत आहे. यामध्ये विविध मासेमारी खेळ, बोटिंग, स्वीमिंग, फिश स्पा, फिश बाथ अशा उद्योगांना संधी आहे.
ग्राहकांसाठी मत्स्य खाद्य पदार्थांचे हॉटेल हा व्यवसाय देखील चांगले उत्पन्न देतो.
तांत्रिक मार्गदर्शन केंद्र
मत्स्यपालन करू इच्छिणाऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन आणि इतर बाबींची आवश्यकता असते. मत्स्य व्यवसायात शिक्षण घेतलेली किंवा त्या क्षेत्रातील पारंगत व्यक्ती तांत्रिक मार्गदर्शन केंद्र उभारून रोजगार निर्मिती करू शकते.
शोभिवंत मासे व मत्स्य टाकी निर्मिती
मत्स्यालयांसाठी रंगीबेरंगी माशांची मागणी वाढत आहे. रंगीबेरंगी मासे जसे की गोल्ड फिश, गप्पी, कॉरी कॅटफिश आणि बेटा फिश (सियामीज फायटिंग फिश) यांना मागणी आहे.
शहरात लहान किंवा मोठे मत्स्यालय तयार करून त्यात विविध प्रजातीची रंगीबेरंगी मासळी सोडून नियोजन करावे. मत्स्यालय पाहण्यास येणाऱ्या नागरीकांना ठरावीक तिकीट दर आकारून व्यवसाय सुरू करू करता येतो. त्यासोबत नागरिकांच्या मागणी प्रमाणे लहान मोठे काचेची मत्स्यपेटी (ॲक्वारीयम) बनवून विक्री करू शकतो.
परसबागेत टाक्या ठेवून रंगीबेरंगी मत्स्यबीज निर्मिती सुद्धा करू शकतो. यापासून कमी गुंतवणुकीत व्यवसाय सुरू करता येतो.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.