पीकसंरक्षण 
ॲग्रो गाईड

सुर्यफुल पीकसंरक्षण

डॉ. अनिल राजगुरू संदीप कदम

सुर्यफूल पीक संरक्षण : 

बीजप्रक्रिया :

  • मर रोग, मूळ कुजव्या, चारकोल रॉट रोगाच्या नियंत्रणासाठी प्रतिकिलो बियाणास २ ग्रॅम कॅप्टन किंवा थायरम किंवा कार्बेन्डाझिमची प्रक्रिया करावी. 
  • केवडा रोग नियंत्रणासाठी ६ ग्रॅम मेटॅलॅक्झील (३५ एसडी) प्रतिकिलो बियाण्यास प्रक्रिया करावी.
  • नेक्रॉसिस रोगाचा प्रसार करणाऱ्या व रस शोषण करणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी इमिडाक्‍लोप्रीड ५ ग्रॅम प्रतिकिलो बियाण्यास प्रक्रिया करावी.
  • रोपांना अन्नद्रव्यांचा पुरवठा लवकर उपलब्ध होण्यासाठी २५ ग्रॅम ॲझोटोबॅक्‍टर व २५ ग्रॅम पीएसबी या जिवाणू संवर्धकाची प्रतिकिलो बियाण्यास प्रक्रिया करावी.
  • बीजप्रक्रिया करताना प्रथमतः बुरशीनाशक, कीटकनाशकाची प्रक्रिया करून त्यानंतर जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी.  
  • रस शोषणाऱ्या किडी  : 

    मावा : 

  • लवकर पेरणी केलेल्या पिकावर माव्याचा प्रादुर्भाव होतो. 
  • पिले व प्रौढ कोवळी पाने, फुले, फांद्या व बोंडातील रस शोषतात. 
  • मावा संपूर्ण झाडावर पसरून, पानांवर चिकट गोड पदार्थ सोडतो. कालांतराने त्यावर बुरशीची वाढ होते. प्रकाशसंश्‍लेषण क्रियेस बाधा आल्यामुळे झाड वाळू लागते.
  • तुडतुडे :

  • प्रादुर्भाव पिकांच्या रोपावस्थेपासून काढणीपर्यंत असतो. 
  • लहान; तसेच पूर्ण वाढलेले तुडतुडे पानांच्या खालील बाजूस रस शोषण करतात. त्यामुळे पानांच्या कडा पिवळ्या पडतात. जास्त प्रादुर्भाव झाल्यास पाने सुकतात. 
  • पिकास नत्राची मात्रा अधिक झाल्यास तुडतुड्यांचा प्रादुर्भाव वाढतो. 
  • फुलकिडे : 

  • पानाच्या पृष्ठभागातून रस शोषण करतात. फूलकिडे हे नेक्रॉसिससारख्या विषाणूजन्य रोगाचा प्रसार करतात.
  • पांढरी माशी : 

  • पूर्णावस्थेतील माश्‍या व त्यांची पिले पाने व इतर भागातील रस शोषतात. त्यामुळे झाडांचा जोम कमी होतो व वाढ चांगली होत नाही. 
  • कमी आर्द्रता व जास्त तापमान झाल्यास प्रादुर्भाव वाढतो. 
  • नत्राची मात्रा अधिक झाल्यास प्रादुर्भाव वाढतो.
  • नियंत्रण : 

  • तुडतुड्यांच्या नियंत्रणासाठी नत्राची मात्रा योग्य प्रमाणात द्यावी. रब्बी सूर्यफुलाची पेरणी नोव्हेंबर महिन्यात केल्यास प्रादुर्भाव कमी होतो.
  • निंबोळी तेल किंवा करंज तेलाची २ ते ४ टक्के याप्रमाणे फवारणी केल्यास रस किडींचा प्रादुर्भाव कमी होतो.
  • फूलकिडे आणि पांढरी माशी यांच्या नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून इमिडाक्‍लोप्रिड (७५ डब्ल्यू.एस.) पाच  ग्रॅम प्रतिकिलो याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी.
  • पेरणीनंतर दर १५ ते २० दिवसांनी इमिडाक्‍लोप्रिड (२०० एसएल)  ३ मि.लि. किंवा क्विनॉलफॉस (३६ ई.सी.) १५ मि.लि.  किंवा थायामेथॉक्‍झाम (२५ टक्के प्रवाही) १५ मि.लि. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • पांढरी माशीच्या नियंत्रणासाठी ॲसिफेट (७५ डब्ल्यूपी) २ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • पाने खाणाऱ्या किडी :  

    तंबाखूवरील पाने खाणारी अळी (स्पोडोप्टेरा लिट्युरा) : 

  • अळ्या समूहाने पानाखाली राहून हिरवा भाग खरवडून खातात; तर पूर्ण वाढ झालेल्या अळ्या एकट्याने पाने खातात. प्रादुर्भाव तीव्र असल्यास फक्त पानाच्या शिरा शिल्लक राहतात. 
  • अळी स्तबकातील दुधाळ बी खाते.
  • उंट अळी : 

  • अळी फिकट हिरव्या रंगाची असते.
  • अळी कोवळी; तसेच मोठी पाने खाते. काही अळ्या पानाच्या खालच्या बाजूने पाने कुरतडून खातात. 
  • केसाळ अळी :  

  • नवजात अळ्या पिवळसर रंगाच्या असतात. पानाचा हिरवा भाग खातात, त्यामुळे पान वाळते. 
  • पूर्ण वाढलेल्या अळ्या ४० ते ५० मिलिमीटर लांब असून, त्यांच्या अंगावर भरपूर प्रमाणात केस असतात. 
  • प्रादुर्भाव अधिक असल्यास संपूर्ण पान जाळीदार होऊन शिरा शिल्लक राहतात.
  • प्रादुर्भाव नोव्हेंबर-डिसेंबर या महिन्यांत अधिक असतो. या किडी त्यांची अंडी पानाच्या मागच्या बाजूवर पुंजक्‍याच्या स्वरूपात घालतात. त्यामुळे अळी अंडी असलेली पाने काढून नष्ट केल्यास कीड नियंत्रणात राहण्यास मदत होते. 
  • तापमान कमी झाल्यास व आर्द्रता वाढल्यास स्पोडोप्टेरा किडीचा प्रादुर्भाव वाढतो.
  • स्वच्छ मशागत केल्यास व बांधावरील तण काढल्यास या किडींचा प्रादुर्भाव कमी आढळतो.
  • या किडींची अंडी असलेली जाळीदार पाने शोधून ती कीटकनाशकाच्या किंवा रॉकेलमिश्रित पाण्याच्या द्रावणात बुडवून किंवा जाळून अथवा पुरून नष्ट करावीत.
  • प्रादुर्भाव वाढल्यास क्विनॉलफॉस (२५ ईसी) २० मि.लि. किंवा प्रोफेनोफॉस २० मि.लि. किंवा डायक्‍लोरव्हॉस २० मि.लि. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • स्पिनोसॅड (४५ ईसी) ४ मि.लि. किंवा इन्डोक्‍झाकार्ब (४५ ईसी) १० मि.लि. किंवा इमामेक्‍टीन बेंझोएट (५ टक्के दाणेदार) ५ ग्रॅम किंवा फ्ल्यूबेंडीअमाईड (२० टक्के दाणेदार) ५  ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • स्तबक पोखरणारी अळी (हेलिकोव्हर्पा आर्मीजेरा) :

  • किडीचा प्रादुर्भाव तापमान कमी झाल्यास वाढतो. ऑगस्ट-सप्टेंबर; तसेच ऑक्‍टोबर-नोव्हेंबर या महिन्यांमध्ये या किडीचा प्रादुर्भाव अधिक आढळतो.
  • किडीची मादी स्तबकाजवळील पानावर किंवा पानाखाली एक-एकटी अंडी घालते. 
  • प्रथम अवस्थेतील अळी फिकट हिरव्या रंगाची व शरीरावर थोडे केस असणारी असते; तर पूर्ण वाढ झालेली अळी फिकट हिरव्या/ पिवळ्या/तपकिरी/ काळसर रंगाची असते.
  • अळी पीक लहान असताना पानांवर उपजीविका करते; तर स्तबक लागताना व भरण्याच्या अवस्थेत असताना आतील बिया खाते.
  • नियंत्रण :

  • फूलकळी अवस्थेमध्ये एचएनपीव्ही (५०० एलई) २० मि.लि. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. दहा दिवसांच्या अंतराने तीन फवारण्या केल्यास ही अळी रोगग्रस्त होऊन मरते. फवारणी संध्याकाळच्या वेळेस करावी.
  • किंवा बॅसिलस थुरीनजेंसीस दोन लिटर प्रतिहेक्‍टरी या प्रमाणात फवारणी करावी.
  • प्रादुर्भाव वाढल्यास क्‍लोरोपायरीफॉस (०.०५ टक्के) २० मि.लि. किंवा प्रोफेनोफॉस (०.०५ टक्के) २० मि.लि. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • क्रायसोपर्ला या परभक्षी किडींची अंडी किंवा अळी ८ ते ९ प्रति २० फुलांपाठीमागे सोडल्यास कीड नियंत्रण होते.
  • कीटकनाशकांचा वापर गरजेनुसार करावा. परागीकरणाच्या कालावधीमध्ये यांचा वापर शक्‍यतो टाळावा. यामुळे मधमाश्‍यांची क्रियाशीलता टिकून राहील.
  • रोग नियंत्रण : 

    शेंडेमर (बडनेक्रॉसिस) : 

  • हा रोग टोबॅको स्ट्रिक व्हायरस विषाणूमुळे होतो. प्रसार फुलकिड्यामार्फत रोगबाधित सूर्यफुलाच्या परागगणाद्वारे होतो.
  • दुधी, जखमजोड, गोखरू, गाजरगवताच्या रोगग्रस्त परागकणाद्वारेही रोग पसरतो.
  • लक्षणे : 

  • रोपावस्थेत रोगबाधित झाडाच्या शेंड्याकडील कोवळी फुट व पाने पिवळी पडतात. पुढे झाडाचा शेंडा काळा पडतो. रोगट झाडाची वाढ खुंटते, दोन पेरांमधील अंतर कमी होते.
  • शेंड्याजवळील पानाच्या मुख्य शिराभोवती असंख्य तपकिरी रंगाचे गोलाकार ठिपके दिसून येतात. ठिपके एकमेकांत मिसळून कालांतराने पाने कळपट पडतात. 
  • फुलोरा अवस्थेत रोगबाधित झाडाच्या पानाचे देठ काळे पडते. काही वेळेस देठापासून ते खोडापर्यंत भाग काळवट पडून अशा झाडांच्या शेंड्याजवळ एक प्रकारचा बाक तयार होतो. 
  • रोगबाधित झाडांच्या फुलांचा आकार नेहमीसारखा गोलाकार न राहता वेडावाकडा होतो.
  • काही झाडांमध्ये फुलांचे तोंड आकाशाकडे वळलेले दिसते. अशा फुलांच्या पाठीमागील भाग काळपट पडतो. फुलामध्ये बीजधारणा कमी प्रमाणात होते. बी वजनात भरत नाही.
  • बांधावरील तण नष्ट करावे. 
  • नेक्रॉसिस रोगाचा प्रादुर्भाव झालेली रोपे नष्ट करावीत.
  • सूर्यफलाच्या भोवती बाजरी किंवा ज्वारीच्या ३ ते ५ सीमा ओळी लावल्यास फुलकिड्यांचा मुख्य पिकावरील प्रादुर्भाव कमी होईल.
  • इमीडाक्‍लोप्रीड (७५ डब्ल्यूएल) पाच ग्रॅम प्रतिकिलो बियाण्यास प्रक्रिया करावी.
  • पेरणीनंतर १५, ३० ४५ दिवसांनी प्रादुर्भाव दिसताच इमीडाक्‍लोप्रीड ३ मि.लि. किंवा थायामेथाक्‍झाम ५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. यामुळे फुलकिडीचे नियंत्रण होऊन नेक्रॉसिस रोग आटोक्‍यात येतो.
  • पानावरील अल्टरनेरिया ठिपके किंवा करपा : 

  • हा रोग अल्टरनेरीया हेलीअंती बुरशीमुळे होता.
  • खरिपातील ढगाळ वातावरण, सतत पडणारा पाऊस, कमी तापमान व जास्तीची आर्द्रता यामुळे हा रोग पसरतो.
  • जमिनीलगतच्या पानांवर पेरणीनंतर सुमारे ३० ते ४० दिवसांनी लहान वर्तुळावर तांबुस ठिपके दिसून येतात. पुढे हे ठिपके एकत्र मिसळून काळसर चट्टे दिसतात. 
  • पोषक वातावरणामध्ये हा रोग झाडाच्या खोडावर, पानावर व फुलाच्या मागच्या पाठीवर चट्याच्या स्वरूपात दिसून येतो. या चट्ट्यामुळे रोगग्रस्त पाने जळून जातात. त्यामुळे पानांच्या अन्न तयार करण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊन उत्पादनात घट येते. पिकाच्या रोप अवस्थेत या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास रोगग्रस्त रोपे जळून जातात.
  • कॅप्टन किंवा थायरम ३ ग्रॅम प्रतिकिलो किंवा कार्बेन्डाझीम २ ग्रॅम प्रतिकिलो याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी.
  • खरीप हंगामात लवकर पेरणी करावी. त्यामुळे पोषक वातावरणात तयार होण्यापूर्वी पीक वाढते, रोगापासून मुक्‍त होते.
  • नत्राबरोबरच शिफारशीत स्फुरद व पालाश खतांची मात्रा दिल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढते.
  • पेरणीनंतर २० ग्रॅम मॅन्कोझेब प्रति १० लिटर पाण्यात मिसळून गरजेनुसार ठराविक दिवसांच्या अंतराने फवारणी करावी. 
  • केवडा रोग किंवा गोसावी रोग (डाऊनी मिल्डयू) : 

  • हा रोग प्लाझोमोपॅराहेलस्टीडी बुरशीमुळे होतो.
  • रोपांची उंची वाढत नाही. झाड खुजट होते. झाडांची पाने पिवळसर पडतात. आर्द्रता जास्त असल्यास पानांच्या पाठीमागे पांढरी बुरशीची वाढ दिसून येते. रोगग्रस्त झाडांची फुले बाजुला न झुकता आकाशाकडे वळलेली दिसतात.
  • रोगग्रस्त झाडांच्या फुलांमध्ये बीजधारणा होत नाही. झाल्यास बी हलके व पोचट रहाते.
  • या रोगाच्या नियंत्रणासाठी सहा ग्रॅम मेटॅलॅक्झील प्रतिकिलो बियाणास प्रक्रिया करावी.
  • उभ्या पिकामध्ये ४ ग्रॅम मेटॅलॅक्झील अधिक मँकोझेब हे संयुक्त बुरशीनाशक प्रतिलीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 
  • रोगग्रस्त भागामध्ये वारंवार सूर्यफुलाचे पीक घेणे टाळावे. दर २ ते ३ वर्षांमधून सूर्यफुलाचे एकदा पीक घ्यावे.
  • स्वच्छ आंतरमशागत करावी; तसेच रोगग्रस्त पाने व झाडाचे भाग गोळा करून नष्ट करावेत.
  • केवडा रोगग्रस्त भागामध्ये या रोगास प्रतिकारक एलएसएफ-१७१ या संकरीत जातीची लागवड करावी.
  • भुरी रोग : 

  • इरीसायफी सायोरेसियोरम या बुरशीमुळे हा रोग होते.
  • पानांच्या दोन्ही बाजूंना असंख्य पांढऱ्या रंगाचे गोलाकार ठिपके दिसतात. पानांवर राखेसाखी भुकटी साचलेली दिसते.
  • जास्त प्रार्दुभाव असलेली पाने करड्या रंगाची दिसतात. पाने वाळून गळून पडतात.
  • ३०० मेश (पोत) गंधकाची भुकटी २० किलो प्रतिहेक्‍टरी याप्रमाणात पिकावर सकाळच्या किंवा संध्याकाळच्या वेळी धुरळावी.
  • पाण्यात मिसळणारे गंधक १२५० ग्रॅम प्रति ५०० लिटर पाण्यात मिसळून प्रतिहेक्‍टरी फवारणी करावी.
  • रायझोफस स्तबककुज : 

  • रायझोफस नावाच्या बुरशीमुळे होतो. 
  • हा रोग पावसाळ्यात पीक उभे असताना होतो. 
  • फुलाचे देठ व फुलाचा पाठीमागच्या भागावर रोगाची सुरवात होते. 
  • रोगट भाग नरम व लिबलिबीत होतो. त्या भागावर बुरशीची वाढ होते.
  • स्तबक सडल्यासारखे होऊन गळून पडते. तीव्रता जास्त आसल्यास बीजावरदेखील या रोगाची बुरशी वाढते, फुले सडतात. अशा स्तबकातील बीजे भरत नाहीत.
  • या रोगाची लागण मुख्यत्वे पक्षी, किडी व आंतरमशागत करतेवेळेस होणाऱ्या इजेमुळे होते. त्यामुळे पक्ष्यांपासून पिकाचे संरक्षण करावे. 
  • प्रादुर्भाव दिसताच कॉपर आक्सिक्लोराईड १२५० ग्रॅम प्रति ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
  • पक्ष्यांपासून संरक्षण : 

  • एकूण शिवाराच्या थोड्याशा भागात न घेता सलग मोठ्या पट्ट्यामध्ये लागवड करावी.
  • पीक पक्वतेच्या काळामध्ये सकाळ व संध्याकाळच्या वेळेस पिकांची राखण करावी. राखण करतेवळी फटाके फोडून आवाज काढल्यास फायदा होतो.
  • पिकाच्या अवतीभोवती चमकणाऱ्या अग्निरेखा पिळून बांधल्यास त्यातून निघणाऱ्या प्रकाश किरणांमुळे पक्षी पिकाजवळ येत नाहीत.  
  • ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Garlic Rate : लसणाची आवक घटल्याने दर तेजीतच

    Forest Fire : वणवे नियंत्रणासाठी जनजागृती करण्याची गरज

    Sugarcane Labor Migration : निवडणूक संपताच ऊसतोड मजुरांचे स्थलांतर

    Sugarcane FRP : मंडलिक साखर कारखाना इतरांच्या बरोबरीने दर देणार

    Milk Rate : देशातील दूध उत्पादनात ४ टक्के वाढ; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

    SCROLL FOR NEXT