द्राक्ष बागेमध्ये द्राक्ष पक्वतेच्या वेळी फळमाशीचा प्रादुर्भाव वाढतो. साधारणत: पक्वतेच्या कालावधीत मण्यांना तडा जाणे, यांत्रिक नुकसान, सूक्ष्म तडा, दुसऱ्या किडीने पाडलेले छिद्र इत्यादी कारणांमुळे द्राक्षमणी खराब होतात. त्यावर फळमाशीच्या प्रादुर्भाव वाढल्यामुळे द्राक्षातील रस व गरामध्ये सूक्ष्मजीवांची वाढ होते. परिणामी किण्वन प्रक्रिया होऊन, त्यातून मुळे किण्व पावतात, परिणामी दुर्गंधी असलेला रस बाहेर पडतो. या फळांची गुणवत्ता ढासळते. द्राक्ष निर्यातक्षम राहत नाही. तसेच त्यांना बाजारभावही चांगला मिळत नाही. साधारणत: पक्वतेवेळी मादी अंडनलिकेच्या साहाय्याने द्राक्षमण्यांना इजा झालेल्या ठिकाणी अंडी घालते. निरोगी द्राक्ष मण्यांवर ही फळमाशी अंडी घालत नाही. काही वेळा अतिपक्व झालेल्या मण्यांवर अंडी घातलेली आढळतात. मादी फळमाशी साधारण ५०० अंडी ठरावीक कालांतराने घालू शकते. अंड्यातून अळी बाहेर पडते. या इजा झालेल्या भागामध्ये अन्य अनेक सूक्ष्मजीवांची वाढ होते. पर्यायाने द्राक्ष मणी सडू लागतात. अंडी उबवण झाल्यानंतर बाहेर आलेली द्राक्ष फळमाशीची अळी (मॅगोट/Maggot) दुधी रंगाची असून, दोन्ही भागाकडे निमुळती असते. या अळ्या द्राक्ष मण्याच्या रसावर आणि गरावर उदरनिर्वाह करतात. फळ पक्वतेच्या वेळी यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळतो. नुकसान पातळीदेखील जास्त असते. शेवटी इजा झालेल्या ठिकाणी बुरशीकारकांचा प्रादुर्भाव वाढतो. कालांतराने सडते. काहीवेळा प्रादुर्भावित मण्यांजवळच्या निरोगी मण्यांवरही ही अळी उदरनिर्वाह करू शकते. संपूर्ण वाढ झालेली अळी द्राक्षमण्यांतून बाहेर येते. कोषावस्थेसाठी कोरडी जागा शोधते. कोषावस्था प्रामुख्याने मातीमध्ये असते. या कोषातून प्रौढ फळमाशी बाहेर येते. कोषावस्थेतून आल्यांनतर प्रौढ फळमाश्या सुमारे दोन दिवसांत पुनरुत्पादित करण्यासाठी लैंगिकदृष्ट्या सक्षम होतात. फळमाशीचा एकूण जीवनक्रम साधारणतः तापमानावर अवलंबून असतो. फळमाशी मण्यांच्या अंतर्गत भागात राहते. त्यामुळे त्यावर कोणत्याही कीटनाशकाचा फारसा परिणाम दिसत नाही. त्याचप्रमाणे फळमाशीचा प्रादुर्भाव साधारणत: फळ पक्वतेच्या काळात होतो. तोडणी जवळ असलेल्या फळावर कीटकनाशकाची फवारणी करणे शक्य होत नाही. तसे केल्यास कीटकनाशकांचे उर्वरित अंश फळामध्ये राहण्याची शक्यता असते. अशी द्राक्षे खाण्यासाठी व निर्यातीसाठी योग्य राहत नाहीत. एकात्मिक कीड नियंत्रण : १. द्राक्ष घडातील खराब झालेले सगळे मणी कात्रीच्या साह्याने काढून टाकावेत. २. द्राक्ष पक्वतेच्या वेळी प्रादुर्भाव वाढल्यामुळे मणीगळ वाढते. अशा गळलेल्या मण्यांमध्ये फळमाशीची जीवनक्रिया चालूच राहते. असे मणी गोळा करून द्राक्ष बागेपासून दूर आणि कमीत कमी २ फूट खोल गाडून नष्ट करावेत. ३. केळीचा सापळा हा फळमाशीसाठी आकर्षक सापळा आहे. फळमाशीसाठी आमिष तयार करण्यासाठी प्लॅस्टिकचा डबा घेऊन त्यामध्ये तळाला पिकलेली केळी ठेवावी. त्यावर स्पिनोसॅड (४५ एससी) या कीटकनाशकांचे २-३ थेंब टाकावेत. त्या डब्यावर शंकूच्या आकाराचा पेपर ठेवावा. त्याच्या बुडाला छोटे छिद्र पाडावे. त्याद्वारे फळमाशी आत जाऊन अंडी घालते. बागेमध्ये एकरी पाच असे केळीचे सापळे लावावेत. ४. द्राक्षातील मण्यांना तडा जाण्यापासून रोखण्यासाठी योग्य व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा. ई-मेल ः ento.nrcg@gmail.com (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, पुणे)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.