वाळा म्हटले की उन्हाळ्याच्या दिवस आठवतात. माठ किंवा पिंपातील पाण्यात वाळा टाकला जातो. ते सुगंधी पाणी प्यायल्यास तहान भागते आणि थंडावा मिळतो. वाळ्याची मुळांमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात.
वाळा थंड गुणात्मक असल्यामुळे पित्तशामक विशेषतः ‘आग’ कमी करतो. उन्हाळ्यात खूप घाम येणे सामान्य आहे. मात्र काहींना पित्तामुळे जास्त प्रमाणात येतो. अशावेळी वाळा पावडर उटण्याप्रमाणे अंगास लावावी.त्वचेवर काही कारणांनी लालसरपणा येतो. कीटक चावल्यामुळे आग होते. त्यावेळी चंदन आणि वाळा यांचा लेप लावावा. आग कमी होण्यास मदत होते.तिखट जेवण, पित्तप्रकृती यामुळे शौचास पातळ होऊन आग होते. अशावेळी वाळा, धने, नागरमोथा, बेल यांचा काढा घ्यावा. घशात कोरड पडणे, ओठ कोरडे पडणे ही लक्षणे तीव्र तापामध्ये जाणवतात. अशावेळी वाळा, चंदन, नागरमोथा, सुंठ यांचे मिश्रण करावे. ते मिश्रण अर्धा चमचा प्रमाणात पाण्यात उकळून घ्यावे. थंड झाल्यावर थोडे थोडे सेवन करावे.पाण्यामध्ये वाळा, चंदन, काळ्या मनुका, ज्येष्ठमध उकळून काढा करावा. हा काढा आग, उष्णता कमी करण्यास मदत करतो. काढा साखर किंवा मधातून सेवन करावा.उन्हाळ्यात किंवा मुत्रमार्गात जंतूसंसर्ग झाल्यामुळे लघवी कमी प्रमाणात होऊन आग होते. अशावेळी वाळा पावडर खडीसाखर, तांदळाच्या धुवणासह वापरावी. पित्ताचा त्रास असलेल्या लोकांना फक्त उन्हाळ्यात नाही तर इतर ऋतूतही त्वचेवर घामोळे येतात. विशेषतः दमट हवामानाच्या प्रदेशात जास्त येतात. अशावेळी वाळा, धने, नागरमोथा आणि चंदन यांची पावडर लावावी. थंडावा मिळतो. घामोळे कमी होतात. पथ्य अति मसालेदार, तळलेले पदार्थ, मेथी, सिमला मिरची, ठेचा असे पदार्थ उष्णता वाढवतात. यांचे सेवन कमी करावे.
पाणी भरपूर प्यावे. मुत्रविसर्जनावेळी आग आणि जोडीला ताप येत असल्यास, मूत्र तपासणी करावी. पोटदुखी, लघवीला साफ होत नसेल तर, सोनोग्राफी करून घ्यावी. त्यामुळे मूतखडा आहे किंवा नाही याचे निदान होऊ शकते.त्वचा विकारात पोटात औषधे घेऊन चिकित्सा करावी. बाह्यलेप फक्त बाहेरून आग कमी करतो. संपर्क ः डॉ. विनीता कुलकर्णी, ९४२२३१०३७७