yellowing of soybean leaves 
ॲग्रो गाईड

सोयाबीन पाने पिवळी पडण्याचे कारण जाणून करा उपाययोजना

यंदाच्या खरीप हंगामात सुरवातीला समाधानकारक पाऊस झाला. राज्यात सोयाबीन पिकाची बऱ्यापैकी पेरणी झालेली आहे. कमी पावसामुळे काही भागात दुबार पेरणीचे संकटही ओढवले आहे. सध्या हे पीक वाढीच्या अवस्थेत असून, पीक पिवळे पडत असल्याचे अनेक शेतकऱ्यांकडून समजते.

हरिष फरकाडे

यंदाच्या खरीप हंगामात सुरवातीला समाधानकारक पाऊस झाला. राज्यात सोयाबीन पिकाची बऱ्यापैकी पेरणी झालेली आहे. कमी पावसामुळे काही भागात दुबार पेरणीचे संकटही ओढवले आहे. सध्या हे पीक वाढीच्या अवस्थेत असून, पीक पिवळे पडत असल्याचे अनेक शेतकऱ्यांकडून समजते. पीक पिवळे पडण्याची नेमकी कारणे शोधून त्यावर योग्य त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. सोयाबीनची पाने पिवळी पडण्याची प्रमुख कारणे 

  • अपुऱ्या पावसामुळे जमिनीतील ओलावा नष्ट होतो. परिमाणी पिक वाढीकरिता आवश्यक असणारे पाणी व अन्नद्रव्यांची कमतरता उद्भवल्याने सोयाबीन पिक पिवळे पडते.
  • अधिक पावसामुळे जमिनीमध्ये अधिक ओलावा साचून राहून जमीन संपृक्त होते. अशा स्थितीत हवा खेळती न राहल्याने मुळांना श्वासोच्छवास घेण्यास अडथळा येतो. त्यांना जमिनीतील पोषण द्रव्ये शोषून घेता येत नाही. परिणामी शेंड्याकडील पाने पिवळी पडतात.
  • सततच्या पावसामुळे शेतीत ओलावा कायम असल्यामुळे डवरणी करण्यास अडचण निर्माण होते. अति ओलाव्याने पाने पिवळी पडतात.
  • ज्या जमिनीचा सामू अधिक आम्लधर्मीय असतो, अशा शेतातील पाने जमिनीत अधिक ओलावा असल्यामुळेसुद्धा पाने पिवळी पडत असल्याचे दिसून येते.
  • जमिनीतील अन्नद्रव्ये उदा. नत्र, लोह व पालाश यांची कमतरता भासल्यानेही पाने पिवळी पडतात. मात्र, पानाच्या शिरा ह्या हिरव्याच दिसतात.
  • सतत ढगाळ वातावरण राहिल्यास अपुऱ्या सूर्य प्रकाशामुळे प्रकाशसंश्लेषण क्रिया मंदावते. यामुळे पाने पिवळी पडतात. यामध्ये शिरासुद्धा पिवळ्या होतात.
  • अत्याधिक ओलावा असल्याने नत्राच्या गाठी तयार होत नाहीत. नत्राची कमतरता भासल्यानेही पाने पिवळी पडतात.
  • रोग किडीच्या प्रादुर्भावामुळे पाने पिवळी पडतात.
  • पिवळा मोझॅक या रोगामुळेसुद्धा पाने पिवळी पडतात. मात्र पानावर हिरव्या- पिवळ्या चट्ट्यांचे मिश्रण आढळते. मुळकूज व मर या रोगाच्या प्रादुभार्वाने देखील पाने पिवळी पडतात. मात्र यामध्ये पाने झाडाच्या खालच्या दिशेने झुकतात. असे झाड उपटल्यास सहज हातात येते. खोडमाशीचा प्रादुर्भाव या किडीचा सोयाबीन पिकावर प्रमुख्याने पेरणीनंतर १०-१५ दिवसांनी दिसायला सुरुवात होते. सुरुवातीला शेंड्या कडील तीन पाने पिवळी होवून झाड सुकायला सुरुवात होते. पिवळ्या रंगाची लहानशी २ मि.मी लांब अळी खोडामध्ये पोखरत जाते. त्यामुळे रोपाला अन्नद्रव्ये व जल पुरवठा बंद होतो. झाडे पिवळी पडतात, सुकतात व मरतात. उपाययोजना

  • सोयाबीन पेरणीकरिता मध्यम स्वरुपाची, भुसभुशीत व पाण्याच्या निचरा होणारी, उत्तम सेंद्रीय पदार्थ असलेली जमीन निवडावी. चोपण, क्षारपड व एकदम हलक्या जमिनीमध्ये पेरणी करू नये. जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ पर्यंत असावा.
  • पेरणीपूर्वी बियाण्यास रायझोबियम, पीएसबी व ट्रायकोडर्माची बीजप्रक्रीया केलेली असावी.
  • अत्यल्प पाऊस झालेल्या किंवा पाऊस होवून बराच काळ लोटला असल्यास पिकास सिंचन देण्याची व्यवस्था करावी.
  • अधिक पाऊस झालेल्या प्रदेशांमध्ये शेतात पाणी साचले असल्यास चर खोदून पाणी उताराच्या दिशेने शेताबाहेर काढावे. कॉपर ऑक्सिक्लोराईड २ ग्रॅम प्रती लीटर पाणी या प्रमाणे आळवणी किंवा फवारणी करावी.
  • नत्राची कमतरता असल्यास युरिया ०२ टक्के (२० ग्रॅम प्रती लीटर पाणी) या प्रमाणे फवारणी करावी.
  • चुनखडीयुक्त शेतामध्ये (सामू ८.० पेक्षा जास्त) सोयाबीनचे पिकास फेरस सल्फेट ५ ग्रॅम अधिक २.५ ग्रॅम कळीचा चुना प्रती लीटर पाणी या प्रमाणे दोन वेळा फवारणी करावी. पहिली फवारणी पीक फुलावर येण्यापूर्वी आणि दुसरी शेंगा धरण्याच्या अवस्थेमध्ये केल्यास लोहाची कमतरता पिकास भासणार नाही.
  • पिवळा मोझॅक रोग व्यवस्थापन पिवळा मोझॅक या रोगाचा प्रसार पांढऱ्या माशीमुळे होतो. पेरणीनंतर ७५ दिवसांपर्यंत या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास अधिक नुकसान होते. रोगट झाडे दिसताच उपटून नष्ट करावीत. पांढऱ्या माशीच्या व्यवस्थापनाकरिता शेतात पिवळे चिकट सापळे लावावेत. त्यासोबतच निंबोळी अर्काची (५ टक्के) किंवा कडूनिंबयुक्त किटकनाशक (ॲझाडिरेक्टीन १० हजार पीपीएम) ३ ते ५ मिली प्रती लीटर याप्रमाणे १० दिवसांच्या अंतराने लागवडीनंतर ३० दिवसांनी पहिली फवारणी आणि दुसरी फवारणी त्यानंतर १० दिवसांनी करावी. खोडमाशी नियंत्रण

  • खोडमाशीच्या नियंत्रणाच्या दृष्टीने बीजप्रक्रीया केली नसल्यास पेरणीनंतर १५ दिवसांनी प्रादुर्भाव दिसुन येताच, फवारणी प्रती लीटर पाणी
  • इथिऑन (५० टक्के प्रवाही) ३ मिली किंवा
  • इंडोक्झाकार्ब (१५.८ टक्के इसी) ०.६ ते ०.७ मिली किंवा
  • क्लोरॲन्ट्रानिलीप्रोल (१८.५ टक्के एससी) ०.३ मिली.
  • खोडमाशीच्या चांगल्या नियंत्रणासाठी पुढील फवारणी १५ दिवसाच्या अंतराने कीटकनाशक बदलून कराव्यात.
  • शेतकऱ्यांनी सोयाबीनची पाने कशाप्रकारे पिवळी पडत आहे, याचे निरीक्षण करावे. पाने पिवळी पडण्याचे अचूक कारण समजून घ्यावे. त्यानुसार योग्य त्या उपाययोजना कराव्यात.
  • संपर्क- हरिष फरकाडे, ८९२८३६३६३८ (सहायक प्राध्यापक, वनस्पती रोगशास्त्र विभाग, श्री. शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालय, अमरावती.)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Agrowon Podcast: सोयाबीन दर दबावातच, आले दर टिकून, मेथी भाजी तेजीत, लिंबाचे दर स्थिर तर संत्र्याला उठाव

    Oil Seed Sowing: तेलबिया पेरणी स्थिर राहण्याची शक्यता

    Ativrushti Madat: शेतकऱ्यांना ६४८ कोटी रुपये मिळणार; २३ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी मदत मंजूर 

    Cooperative Bank: जिल्हा बँकेच्या ‘आधार एनेबल्ड पेमेंट सिस्टिम’ सेवेला सुरुवात

    Monsoon Rain Update: ढगाळ हवामानासह पावसाचा अंदाज; राज्यात पावसाचा जोर पुढील ५ दिवस कमीच राहणार

    SCROLL FOR NEXT