soil water conservation in field
सध्या तूर वाढीच्या टप्यात असून आंतरमशागतीची कामे करणे गरजेचे आहे.तुरीच्या दोन ओळीत सरी काढल्यामुळे जमिनीतील ओलाव्यात १५ ते २० टक्के वाढ होऊन उत्पादनात २५ ते ३० टक्के वाढ झाल्याचे दिसून आले आहे. तूर पीक २० ते २५ दिवसांचे असताना पहिली आणि ३०-३५ दिवसांचे असताना दुसरी कोळपणी करावी.कोळपणी केल्याने जमीन भुसभुशीत होऊन हवा खेळती राहते. त्यायोगे पीक वाढीस पोषक वातावरण तयार होते. बाष्पीभवनाचा वेग कमी होऊन ओलावा अधिक काळ टिकण्यास मदत होते. दोन ओळीतील तण काढले जाऊन रोपांना मातीची भर लागते.कोळपणी शक्यतो, वाफशावर करावी. तूर पीक पहिले ३० ते ४५ दिवस तणविरहित ठेवावे.गरजेनुसार एक किंवा दोन खुरपण्या वेळीच द्याव्यात.
९० सें.मी. अंतरावर तूर लागवड असल्यास वखराद्वारे दोन ओळीतील मशागत करता येते. सलग १५ ते २० दिवस पाऊस असल्याने कुरडू(कोंबडा),कुंजरु,लांडगा ही तणे मोठ्या प्रमाणात वाढलेली आहेत.अशी तणे उपटून काढून घ्यावीत. लष्करी अळीचा प्रादुर्भाव कुंजरु,सेटारीया गवतावर होत असल्याने काढलेली गवते पिकापासून लांब नेऊन खड्ड्यात टाकावीत.गजर गवताचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्यास झायगोग्रामा कीटक (भक्षक)त्यावर सोडावेत.हे कीटक गाजर गवताची पाने व बियांवरती उपजीविका करत असल्याने गजर निर्मूलन सोपे,कमी खर्चीक व कायम स्वरूपी होते.तुरीची पेरणी झाल्यानंतर तिसऱ्या आठवड्यात एक कोळपणी करून चौथ्या आठवड्यात तुरीच्या दोन ओळीत लाकडी नांगराच्या सहायाने ३० सें. मी. खोल सरी काढावी. शक्यतो सऱ्या उताराच्या आडव्या पाडाव्यात. सरी काढल्यामुळे ऑगस्ट, सप्टेंबर मध्ये पडणारा पाऊस सरीत मुरविला जाऊन जमिनीतील ओलावा वाढण्यास मदत होते. हा ओलावा पीक फुलोऱ्यात असताना आणि दाणे भरताना उपयोगी पडून उत्पादनात वाढ होते. कोरडवाहू शेती संशोधन केंद्र ,सोलापूर येथील संशोधनामध्ये तुरीच्या दोन ओळीत सरी काढल्यामुळे जमिनीतील ओलाव्यात १५ ते २० टक्के वाढ होऊन उत्पादनात २५ ते ३० टक्के वाढ झाल्याचे दिसून आले आहे.कोरडवाहू क्षेत्रात पावसाची शक्यता नसेल आणि पाणी देण्याची सोय उपलब्ध असेल तर लवकर येणाऱ्या तुरीच्या पिकास पहिले पाणी फुलकळी लागताना,दुसरे पाणी फुलोऱ्यात असताना व तिसरे शेगांत दाणे भरतांना दयावे किंवा दोन टक्के युरियाची फवारणी करावी.त्यामुळे पीक उत्पादनात अधिक वाढ होते.पाणी देताना पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी.जमिनीच्या खोलीनुसार पाण्याच्या दोन पाळ्यांमध्ये अंतर ठेवावे.पाऊस नसेल तर जमिनीस फार मोठ्या भेगा पडण्याच्या अगोदरच पाणी द्यावे.पावसाळ्यात पाऊस कमी झाला असल्यास आणि जमीन मध्यम उथळ असल्यास ओलावा फार काळ टिकून राहत नाही. जमिनीतील ओलावा खूप कमी झाला आणि फुले लागल्यावर उशिरा पाणी दिल्यास तुरीची मोठ्या प्रमाणात फुलगळ होते. हे टाळण्यासाठी जमिनीतील ओलावा कमी होण्यापूर्वीच आणि फुले येण्याच्या सुरवातीलाच संरक्षित पाणी दयावे.तुरीच्या वाढीसाठी उत्तम निचरा आवश्यक असल्याने शेतातील पाणी सुरक्षितरीत्या बाहेर काढावे.जास्त पावसामुळे शेतातून पाणी जास्त वाहिले असल्यास पाण्याबरोबर नत्र वाहून जाण्याची शक्यता असते. तुरीची खालची पाने पिवळी पडली असल्यास नत्राची कमतरता लक्षात घेऊन दोन टक्के युरियाची किंवा दोन टक्के डीएपी ची (दोन किलो प्रति १०० लिटर पाणी) फवारणी फायदेशीर ठरू शकते. फवारणी शक्य नसल्यास अशा शेतामध्ये निंबोळी पेंड एक पोते व युरिया अर्धा पोते प्रति एकरी कोळपणी देण्यापूर्वी वापरावे.बरेच दिवस रिमझिम पाऊस पडत राहिल्यास तुरीस खोड कुजव्या या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. शेतामध्ये पाणी साचू राहणार नाही याची काळजी घ्यावी.तुरीचा फुटवा वाढविण्यासाठी ३० व ५५ दिवशी शेंडा खुडणी करणे महत्त्वाचे आहे. पिकामध्ये किडीची आर्थिक नुकसानीची पातळी ओळखण्यासाठी कामगंध सापळ्यांचा वापर करावा. - डॉ. आदिनाथ ताकटे,९४०४०३२३८९, (एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्प, महात्मा फुले कृषि विद्यापीठ,राहुरी,जि.नगर)