लिंबूवर्गीय पिकातील आंबिया बहर फळगळ नियंत्रण
लिंबूवर्गीय पिकातील आंबिया बहर फळगळ नियंत्रण 
ॲग्रो गाईड

लिंबूवर्गीय पिकातील आंबिया बहर फळगळ नियंत्रण

डॉ. दिनेश पैठणकर, डॉ. योगेश इंगळे

सद्यःस्थितीत आंबिया बहराची फळे ही विकसनशील अवस्थेत आहेत. साधारणत: झाडाची निरोगी स्थिती, झाडातील संजीवकांचा फळाच्या शेवटच्या टोकापर्यंत होणारा पुरवठा, कर्ब-नत्र यांचे संतुलन, संतुलित पोषण यामुळे फळे झाडावर परिपक्व होईपर्यंत टिकण्यास मदत होते. मात्र किमान आणि कमाल तापमानात फरक झाल्यास, अधिक आर्द्रता, कर्ब-नत्र यांचे असंतुलन, अपुरे पोषण, पाण्याचा अभाव तसेच रोग व कीड या कारणांमुळे फळगळ संभवते. फळगळीचे नेमके कारण जाणून त्याप्रमाणे उपाययोजना करणे गरजेचे आहे. वनस्पती शास्त्रीय आंतरिक फळगळ १) फळांच्या योग्य वाढीसाठी झाडास पुरेशी पालवी असणे गरजेचे आहे. पुरेशी पालवी नसल्यास मर्यादित स्वरूपात अन्नसाठा तयार होतो. आवश्यक अन्नद्रव्य न साठल्यास फळे पोसली जात नाहीत. झाडावरील पालवीनुसार फळे झाडावर ठेवावीत. झाडावर फळांची अधिक संख्या ठेवल्यास अपुरे पोषण आणि संजीवकांचा असमतोलपणा निर्माण होतो. पेशीक्षय होऊन फळगळ होते. २) पाण्याचा अभाव झाल्यास फळांना पाणी उपलब्ध होत नाही. उलट फळांमधून पानाकडे पाणी वाहून जाते. परिणामी, फळे पिवळी होऊन पडून गळतात. या गळीमध्ये संत्रा/मोसंबीचा पिवळेपणा हा देठापासून सुरू होतो. खालपर्यंत पसरून गळ होते. बरेचदा देठाजवळ पिवळ्या छटा दिसतात. उपाययोजना

  •  वनस्पती शास्त्रीय आंतरिक फळगळ नियंत्रणाकरिता, एनएए १ ग्रॅम (१० पीपीएम) किंवा २-४-डी* १.५ ग्रॅम (१५ पीपीएम) किंवा जिबरेलिक ॲसिड* १.५ ग्रॅम (१५ पीपीएम) + युरिया (१ किलो) प्रति १०० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. पुढील फवारणी १५ दिवसांनी मिश्र द्रावणातील संजीवक (एनएए किंवा २-४-डी* किंवा जिबरेलिक ॲसिड*) बदलून करावी.
  • झाडाच्या वाढीच्या अवस्थेनुसार अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन करताना आंबिया बहरातील फळे असणाऱ्या झाडांना जुलै व सप्टेंबर महिन्यात नत्र ९० ग्रॅम अधिक पालाश ७५ ग्रॅम प्रति झाड जमिनीद्वारे द्यावे.
  • संत्रा, मोसंबी, किंवा लिंबू फळांच्या वाढीकरिता जिबरेलिक ॲसिड* १.५ ग्रॅम (१५ पीपीएम) अधिक पोटॅशिअम नायट्रेट (१३:०:४५) १ किलो प्रति १०० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
  • सूक्ष्म अन्नद्रव्ये - झिंक सल्फेट ५ ग्रॅम, फेरस सल्फेट १ ग्रॅम व बोरॉन १ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे आंबिया फळांकरिता जुलै-ऑगस्ट महिन्यात तसेच मृगाच्या फळाकरिता ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये फवारणी करावी.
  • ब) बुरशीजन्य फळगळ संत्रा फळझाडांमध्ये बुरशीजन्य फळगळ प्रामुख्याने कोलेटोट्रिकम, डिप्लोडिआ, फायटोप्थोरा व अल्टरनेरिया या बुरशीमुळे होते. या बुरशींचे संक्रमण फळांच्या देठांस होते. फळांची साल व देठ यांचे जोडावर होऊन काळपट तपकिरी डाग पडतात. तो भाग कुजतो आणि फळांची गळ होते. झाडांवर जुन्या वाळलेल्या फांद्या अधिक असतील तर बुरशींचे बीजाणू मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव करतात, परिणामी आर्थिक नुकसानकारक फळगळ आढळून येते. १) देठ सुकणे किंवा कोलेटोट्रिकम स्टेम एंड रॉट कोलेटोट्रिकम बुरशीमुळे संत्रा फळाच्या देठाजवळ काळी रिंग तयार होऊन तो भाग काळा पडतो. हा काळेपणानंतर वाढत जातो व संपूर्ण फळ सडते. कोवळ्या फांद्यावरील पाने सुकणे व ती वाळणे ही या रोगाची सुरुवातीची लक्षणे आहेत. बरेचदा उशिरा झालेल्या संसर्गामुळे रोगग्रस्त फळे संकुचित होतात, काळी पडतात, वजनाने हलके होऊन कडक होतात आणि दीर्घ काळापर्यंत देठांना लटकत राहतात. सदर रोग मे महिन्याच्या शेवटी ते जून महिन्यात पहिला पाऊस पडल्यानंतर दिसून येतो. २) फायटोप्थोरा फळावरील तपकिरी कुज (ब्रॉउन रॉट) ‘ब्राऊन रॉट’ रोग पावसाची रिमझिम, अपुरा सूर्यप्रकाश, थंड हवा, अधिक आर्द्रता, कमी तापमानात फळांवर उद्‌भवतो. जमिनीलगतची हिरवी असलेली फळे यावर तपकिरी/करड्या डागांची सुरुवात होते. फळे एका बाजूने करपण्यास सुरुवात होते. फळाच्या हिरव्या कातडीस संक्रमण होऊन पूर्ण फळ हे तपकिरी काळ्या रंगामध्ये परावर्तित होते. फळे सडून गळतात. फळे खाली पडल्यानंतर फळांच्या पृष्ठभागावर पांढऱ्या बुरशीची वाढ दिसून येते. बुरशीजन्य रोगापासून होणारी फळगळ व्यवस्थापनाकरिता,

  • सर्वप्रथम खाली पडलेली पाने व फळे यांची विल्हेवाट लावावी. ती शेतात तशीच राहिल्या बुरशीजन्य रोगाची तीव्रता वाढण्यास मदत होते. वाफे स्वच्छ ठेवावेत.
  • बागेच्या उताराच्या बाजूने शेतातील पाणी बाहेर काढावे कारण जिकडे पाणी साठून राहते त्या भागात फायटोफ्थोरा बुरशीची लागण अधिक होते.
  • देठ सुकी किंवा कोलेटोट्रीकम स्टेम एंड रॉटमुळे होणाऱ्या फळगळीसाठी, बोर्डो मिश्रण ०.६ टक्का किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइड (५० डब्ल्यूपी)* २.५ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम* (५० डब्ल्यूपी) १ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
  • ब्राऊन रॉट किंवा फायटोफ्थोरा फळावरील तपकिरी कुजमुळे होणाऱ्या फळगळीसाठी, संपूर्ण झाडावर फोसेटिल एएल* २.५ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइड (५० डब्ल्यूपी)* २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी घेऊन फवारणी करावी.
  • (टीप : * लेबल क्लेम शिफारस नाही, संशोधनावर आधारित ॲग्रेस्को शिफारस आहे.) डॉ. दिनेश पैठणकर, ९८८१०२१२२२

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

    MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

    Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

    Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

    Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

    SCROLL FOR NEXT