लिंबूवर्गीय फळपिकातील कीड रोग नियंत्रण
लिंबूवर्गीय फळपिकातील कीड रोग नियंत्रण 
ॲग्रो गाईड

लिंबूवर्गीय फळपिकातील कीड रोग नियंत्रण

डॉ. एम. बी. पाटील

लिंबूवर्गीय फळबागेमध्ये फळगळ ही समस्या प्रामुख्याने जाणवते. या काळात बुरशीजन्य रोग, फळमाशी, रसशोषक पतंगाचाही प्रादुर्भाव जाणवू शकतो.

  झाडाचा निरोगीपणा वाढवण्यासाठी

 फळाच्या योग्य वाढीसाठी झाडावर पुरेसे पालवी असणे गरजेचे असते. एका फळाच्या पूर्ण वाढीसाठी चाळीस पानांची गरज असते. - फळ तोडणीनंतर वाळलेल्या फांद्या काढून टाकाव्यात. त्यामुळे फांद्यावरील सुप्तावस्थेतील रोगकारक घटक कमी होतात.  पुढील टप्प्यामध्ये फळवाढीसाठी कार्बन नत्राचे संतूलन असणे गरजेचे असते. पेशीक्षय क्रिया कमी करणे व ऑक्झिनच्या वाढीसाठी नत्राची गरज असते. ही मात्रा कृत्रिमरित्या युरियाची फवारणी करून वाढवता येते.

  रोग

  • सध्या लिंबूवर्गीय बागेमध्ये फळगळ दिसून येत आहे. पावसाची झड तीन चार दिवस संततधार असल्यामुळे बुरशीचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यात कोलेटोट्रीकम बुरशीमुळे देठ पिवळे पडणे आणि देठाजवळ काळा डाग दिसत आहे. नियंत्रण - फवारणी- कार्बेन्डाझीम १५ ग्रॅम प्रति १० लीटर पाणी
  • फळावर फायटोप्थोरा बुरशीचा प्रादुर्भाव होऊनही गळ होते. यामध्ये मोसंबीच्या खालील बाजूची फळे अगोदर सडण्यास सुरवात  होते. नियंत्रण - फवारणी मेटॅलॅक्झिल (४ टक्के) अधिक मॅन्कोझेब (६४ टक्के) संयुक्त बुरशीनाशक २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी. पुढील फवारणी पंधरा दिवसांच्या अंतराने दोन वेळा करावी.
  •  लिंबूवर्गीय झाडावरील फळगळ प्रामूख्याने बोट्रिडीप्लोडिया थियोब्राेमी, कोलेक्टोट्रिकम ग्लोईओस्पोरिऑइडस व काही अंशी आल्टरनेरिया सिद्री या बुरशीमुळे होते. या बुरशी फळाच्या देठाद्वारे फळामध्ये प्रवेश करून पूर्ण वाढलेल्या फळाचे नुकसान करतात. या बुरशीच्या प्रसारासाठी किडीही मदत करतात. (उदा. काळीमाशी, मावा) त्यांचे वेळीच नियंत्रण करावे.  
  •  फळगळ रोखण्यासठी कृत्रिम जैवसंजीवकांचा वापर करावा. उदा. २,४ डी , नॅप्थॅलीन अॅसीसिटीक अॅसीड (एन.ए.ए), जिबरेलिक अॅसिड (जी.ए.३) हे वनस्पतीतील ऑक्झीनचे प्रमाण वाढवून पेशीक्षय कमी करण्याचे कार्य करतात. वातावरणामुळे होणारी फळगळ पूर्ण थांबवण्यासाठी अंबिया बहाराची फळधारणा झाल्यानंतर (साधारणतः मे आणि जून महिन्यात) २,४ डी (१५ पीपीएम) किंवा जिबरेलिक अॅसिड (१५ पीपीएम) १५ मिलीग्रॅम अधिक कार्बेन्डाझीम १ ग्रॅम अधिक युरिया १०० ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. ही फवारणी झालेली असेल. याच मिश्रणाच्या दोन फवारण्या एक महिन्यांच्या अंतराने सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात फळे तोडणीपूर्व कराव्यात.
  •  किडीचा प्रादुर्भाव

    रस शोषण करणारे पतंग - सुमारे २० प्रकार असले तरी त्यातील अॅाफिडेरिस मॅटर्ना हा पतंग आपल्याकडे नियमितपणे नुकसानकारक (२५ ते ४० टक्के फळगळ) ठरला आहे. या किडीचा प्रादुर्भाव ऑगस्ट- सप्टेबरमध्ये जास्त दिसून येतो. मृगबहारातील फळगळी पेक्षा अंबिया बहाराच्या झाडावरील प्रादुर्भावीत फळांची गळ जास्त आढळते.      नियंत्रण व्यवस्थापन

  •  प्रसार रोखण्यासाठी बाग स्वच्छ असावी. बागेतील गळालेली फळे गोळा करुन जमिनीत दाबून नष्ट करावीत.
  •  पतंगाना पकडण्याकरिता रात्री प्रकाश सापळयाचा वापर करावा.
  •  सायंकाळी ६ ते ८ च्या दरम्यान बागेत धूर करून पतंगाना पिटाळून लावावे.
  •  बागेभोवतीच्या अन्य पर्यायी वनस्पती उदा. गुळवेल, वासण वेल उपटून नष्ट कराव्यात. किंवा त्यावर कीडनाशकाची फवारणी करावी. त्यावर या किडीच्या अंडी अळी आणि कोष अवस्था पूर्ण होतात.
  •  पतंगाना आकर्षित करून मारण्यासाठी विषारी आमिष तयार करावे. प्रमाण मॅलॅथिऑन २० मिलि अधिक गुळ २०० ग्रॅम अधिक फळाचा रस प्रति दोन लीटर पाणी.  हे अमिष रुंद तोडांच्या बाटलीत भरुन दोन बाटल्या प्रति पंचवीस ते तीस झाडासाठी या प्रमाणे बागेत ठेवाव्यात.
  •   फळमाशी  (फ्रूट फ्लाय)

         किडीची ओळख : प्रौढ माशा मजबूत असून, रंगाने भुरकट पारदर्शक पंख आणि पिवळे पाय, गडद लाल आणि गळ्यावर काळे पटटे असतात.

      नियंत्रण व्यवस्थापन

     गळालेली फळे गोळा करून जमिनीत पुरावीत.  झाडाखाली हिरवी फळे ठेवून त्यावर छिद्र केल्यास त्याकडे माशा आकर्षित होऊन अंडी देतात. अशी अंडीग्रस्त फळे ठराविक काळानंतर नष्ट करावीत.  फळे पिकण्याच्या दोन महिन्यांपूर्वी १० दिवसांच्या अंतराने फवारणी  मॅलॅथिऑन अर्धा मिलि अधिक १०० ग्रॅम गूळ प्रति लिटर  नर माशांना आकर्षित करण्यासाठी मिथाईल यूजिनाॅल १ मि.लि. अधिक मॅलेथिऑन अर्धा मि.लि. हे रुंद तोडांच्या बाटलीत भरून बागेत ठेवावे. फळ तोडणीच्या ६० दिवस आधीपासून २५ बाटल्या प्रति हेक्टरी बागेत ठेवाव्यात. या मिश्रण दर सात दिवसांनी बदलावे.

    संपर्क : डॉ. एम. बी. पाटील, ७५८८५९८२४२ (लेखक मोसंबी संशोधन केंद्र, बदनापूर, जि. जालना येथे प्रभारी अधिकारी आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

    Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

    Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

    Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

    Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

    SCROLL FOR NEXT