Opportunity for medicinal plant cultivation in Konkan
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये औषधी वनस्पती लागवडसंबंधी संशोधन आणि विस्तार कार्य सुरू आहे. बाजारपेठेची मागणी लक्षात घेता बृहत् पंचमूळ, वावडिंग, वेखंड लागवडीला चांगली संधी आहे. औषधी वनस्पतींचा उल्लेख अथर्ववेद, चरकसंहिता, सुश्रुत संहिता, वागभट्ट, चक्रदत्त, भावप्रकाश, शारंगधर इत्यादी ग्रंथामध्ये आढळतो. वनस्पती जैवविविधतेपैकी सुमारे ९५०० वनस्पती विविध आरोग्य शास्त्रामध्ये वापरल्या जातात. प्रामुख्याने आयुर्वेद, युनानी, सिध्दा, होमियोपॅथी आणि आदिवासी औषधी पद्धतीमध्ये वनस्पतींचा प्रामुख्याने वापर केला जातो. उपयुक्त औषधी वनस्पती बृहत् पंचमूळ
बृहत्पंचमुळे (टेटू, शिवण, पाडळ, बेल व अग्निमंथ) यांचा उपयोग दशमुळारिष्टमध्ये होतो.वृक्षतोडीमुळे दशमुळांची उपलब्धता कमी होत आहे. पाडळ व टेटू या प्रजाती दुर्मीळ होत आहेत.वनशास्त्र महाविद्यालयाने संयुक्त प्रकल्पांद्वारे बृहतपंचमुळाची घन लागवड केली आहे. यामध्ये सुधारित तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. वावडिंग पिकास मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. कोकणातील आंबा व काजू बागेच्या जोडीला अतिरिक्त उत्पन्न देणारे पीक म्हणून वावडिंगची लागवड करावी. वावडिंग हे झाडाच्या शेजारी लावले जाते. आधाराला धरून वावडिंग वेल मोठी होते. परंतु त्याचा वृक्षवाढीवर कोणताही परिणाम होत नाही. पिकलेली फळे जुलैमध्ये तयार होतात. त्यांचा रंग जांभळा असतो.लागवडीच्या चार वर्षांनंतर उत्पादन सुरू होते.कोकणातील भातशेती क्षेत्रामध्ये आंतरपीक म्हणून वेखंडाची लागवड करता येते.लागवड जून महिन्यात केली जाते.हे बारामाही पीक आहे. या पिकापासून चांगले उत्पादन मिळते.जंगली प्राण्यांपासून या पिकाचे कोणतेही नुकसान होत नाही.गेल्या २० वर्षांपासून डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत औषधी वनस्पती लागवडीसंबंधी संशोधन व विस्तार कार्य सुरू आहे. चरक संहितेच्या आधारे ५० गणांचे विविध औषधोपचारासाठी लागणाऱ्या प्रजातींचा संग्रह शेतकरी, विद्यार्थी व शास्त्रज्ञांसाठी उपलब्ध करून देण्या आला आहे.कृषी महाविद्यालयांतर्गत शेतकऱ्यांना औषधी वनस्पतींचा पुरवठा होण्यासाठी रोपवाटिका उभारण्यात आली आहे. त्याअंतर्गत चाळीस व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाच्या औषधी वनस्पतींच्या रोपांची विक्री केली जाते. दरवर्षी ६०,००० रोपांची निर्मिती केली जाते.औषधी वनस्पतींच्या लागवडीस प्रोत्साहन देण्यासाठी लागवड तंत्रज्ञानावर अभ्यास सुरू आहे. त्यामध्ये पिंपळी, बृहत् पंचमूळ व वेखंड लागवडीबाबत प्रचार केला जातो.दुर्मीळ औषधी वनस्पती उदा. नागकेशर, वावडिंग, कडू कवठ, पिठवण, सालवण, बृहती, कंठकारी इत्यादी औषधी वनस्पतींच्या अभिवृद्धीसाठी संशोधन प्रकल्प कार्यरत आहे.आयुष मंत्रालयाच्या अर्थसहाय्याने विद्यापीठामध्ये प्रयोगशाळेची उभारणी करण्यात आली आहे. या प्रयोगशाळेचा उपयोग औषधी वनस्पतींतील गुणधर्माच्या प्रमाणीकरणासाठी होतो.विविध खासगी कंपन्यांच्या सहकार्याने विद्यापीठातर्फे औषधी शेतीचा प्रसार सुरू आहे. शेतकऱ्यांना प्रशिक्षण आणि मार्गदर्शन केले आहे.औषधी वनस्पतींच्या पणन व्यवस्थेसाठी आयुषच्या E-Charak अॅप विषयी माहिती शेतकऱ्यांना देण्यात येते. संपर्क : डॉ. विनोद म्हैस्के, ९३२५२९८८६२ (वनशास्त्र महाविद्यालय, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी)