Jalgaon News : ‘‘वित्तीय संकटे, तोटा आदी कारणांमुळे राज्यातील सुमारे ११३ सूतगिरण्या बंद आहेत. १० दिवस हा बंद असणार आहे. कापूस बाजाराची चाल आणि कापड उद्योगात अनुकूल स्थिती राहिल्यास पुढे सूतगिरण्यांचे कामकाज पूर्ववत होईल, अन्यथा यंदा सूतगिरण्या पूर्ण क्षमतेने कार्यरत राहणार नाहीत, अशी स्थिती आहे.
सुताचे दर सध्या प्रतिकिलो २०० रुपये प्रतिकिलो व ३४ काउंटच्या सुताचा दर २२० रुपये प्रतिकिलो, असा आहे. यात नफाच राहत नसल्याची स्थिती आहे. सूतगिरण्या बंद असल्याने कापूस बाजारही थंड आहे. एक सूतगिरणी रोज १० ते १२ हजार किलो सुताचे उत्पादन २४ तासांत करते.
२५ हजार चात्यांच्या सूतगिरणीला रोज ७० ते १०० गाठी (एक गाठ १७० किलो रुई) हव्या असतात. परंतु सूतगिरण्या बंद असल्याने रुईचा उठावही ठप्प असल्याची स्थिती आहे. बँकाही सूतगिरण्यांना वित्तीय मदत करण्यास धजावत नसल्याची स्थिती आहे.
मंदी असून, त्यात कापडाला उठाव कमी आहे. उत्पादन खर्च वाढला आहे. त्यात किलोमागे १५ रुपये तोटा सूतगिरण्यांना येत आहे. २५ हजार चात्यांच्या सूतगिरणीचे रोज एक ते दीड लाख रुपये नुकसान होत आहे.
वित्तीय नुकसान सहन करण्याच्या स्थितीत सूतगिरण्या नाहीत. कामगारांचा बोनस, वेतन व एका महिन्याचे ७० लाख रुपये वीजबिल, असा सुमारे दीड कोटी रुपयांचा बोजा सूतगिरण्यांवर ऑक्टोबरमध्ये आला आहे.
कापूस खरेदीचे भांडवल सूतगिरण्यांकडे नाही. कापूस बाजारात येत आहे. परंतु कापसाच्या तुलनेत सुताला उठाव नाही. राज्यात सहकारी ६२, तर खासगी सूतगिरण्या सुमारे ५१ आहेत. या सर्वच गिरण्या अडचणीत आहेत. तोट्याच्या भीतीने सूतगिरण्या कापूस किंवा रुई खरेदीसाठी धजावत नसल्याची स्थिती आहे. यामुळे वस्त्रोद्योग अडचणीत आहे.
यंत्रमागधारकांनाही अडचण
यंत्रमागधारकांना अडचणी येत आहेत. एक प्रतिपीक १० ते १२ पैसे मजुरी मिळत होती. आता व्यापारी फक्त सात पैसे मजुरी प्रतिपीकसंबंधी देत आहेत. यासंबंधी राज्यात सुमारे १४ लाख साधे (धोट्यायुक्त) यंत्रमागधारक आहेत. त्यात सांगलीमधील विटा, इचलकरंजी, मालेगाव, भिवंडी व नागपुरात हे यंत्रमागधारक आहेत. कापडाला उठाव नसल्याने यंत्रमागही राज्यात बंद आहेत.
केंद्राने वस्त्रोद्योगातील समस्येबाबत कापूस प्रक्रिया उद्योजक, सूतगिरण्या व यंत्रमागधारकांचे प्रतिनिधींची बैठक घेऊन ही विस्कटलेली घडी कशी सुरळीत होईल, यासंबंधी कार्यवाही करायला हवी. आपली कापड निर्यात होत नाही. चीनचे कापड बांगलादेशमार्गे भारतात येत आहे. यामुळेही अडचण आहे.- अशोक स्वामी, अध्यक्ष, वस्त्रोद्योग महासंघ
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.