ॲग्रो विशेष

CDSL Commodity Repository Limited : ‘सीडीएसएल कमोडिटी रिपॉजिटरी लिमिटेड'चे कामकाज

Agri-Commodity Trading : सीसीआरएल केवळ कृषी-वस्तूंच्या व्यापारासाठी मल्टी कमोडिटी एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड, बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज लिमिटेड आणि इंडियन कमोडिटी एक्स्चेंज लिमिटेड या तीन एक्स्चेंज यांना सेवा देत आहे.

Team Agrowon

मिलिंद आकरे, हेमंत जगताप

Agriculture Market : सीसीआरएल केवळ कृषी-वस्तूंच्या व्यापारासाठी मल्टी कमोडिटी एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड, बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज लिमिटेड आणि इंडियन कमोडिटी एक्स्चेंज लिमिटेड या तीन एक्स्चेंज यांना सेवा देत आहे. ही संस्था कमोडिटी-एक्स्चेंजच्या पलीकडे जाऊन शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि इतरांसह व्यापक बाजारपेठेत देखील सेवा देते.

गोदाम उभारणी करणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपन्या व सहकारी संस्थानी ऑनलाइन प्लॅटफॉर्मची माहिती घ्यावी. गोदाम पुरवठा साखळीत आपले अस्तित्व निर्माण करून व्यवसाय उभारणी करावी या अनुषंगाने एनसीडीईएक्स, एनईआरएल, एनसीएमएल, एमसीएक्स, एनईएमएल यासारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मबाबत आपण माहिती घेतली आहे. या माहितीचा क्षेत्रीय स्तरावर उपयोग करून गोदाम पुरवठा साखळी व खरेदी विक्री विषयक व्यवहार शेतकरी उत्पादक कंपन्या व सहकारी संस्थांनी सुरू करणे अत्यंत आवश्यक आहे. परंतु अशा संस्थांचे प्रमाण अत्यंत नगण्य आहे. आज आपण सीडीएसएल कमोडिटी रिपॉजिटरी लिमिटेड बाबत माहिती घेत आहोत.

‘सीडीएसएल कमोडिटी रिपॉजिटरी लिमिटेड'चे कार्य ः
१) सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (५२%), बीएसई इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड (२४%) आणि मल्टी कमोडिटी एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड(२४%) यांनी २०१७ मध्ये त्यांच्या इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्म विषयक सेवा आणि कमोडिटीशी संबंधित मालमत्ताच्या हस्तांतरणाबाबतच्या विस्तारासाठी सीडीएसएल कमोडिटी रिपॉजिटरी लिमिटेडची स्थापना केली.
२) सीसीआरएल केवळ कृषी-वस्तूंच्या व्यापारासाठी मल्टी कमोडिटी एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड, बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज लिमिटेड आणि इंडियन कमोडिटी एक्स्चेंज लिमिटेड या तीन एक्स्चेंज यांना सेवा देत आहे. ही संस्था कमोडिटी-एक्स्चेंजच्या पलीकडे जाऊन शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि इतरांसह व्यापक बाजारपेठेत देखील सेवा देते.

३) सीसीआरएल हे वखार विकास आणि नियामक प्राधिकरणच्या नियामक रचनेनुसार कार्य करते. २६ सप्टेंबर २०१७ रोजी वखार विकास आणि नियामक प्राधिकरणाकडून नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त केल्यानंतर, सीसीआरएलने ३० सप्टेंबर २०१७ रोजी आपले व्यावसायिक कार्य सुरू केले. यामुळे वखार विकास आणि नियामक प्राधिकरणामार्फत प्रमाणित व नोंदणीकृत गोदामात शेतमालधारक ग्राहक शेतीमाल इलेक्ट्रॉनिक निगोशिएबल वेअरहाऊस पावती स्वरूपात डिमॅट खात्यात ठेऊ शकतो.
४) सीसीआरएल बाजारातील सर्व घटकांना परवडणाऱ्या किमतीत सोईस्कर, विश्वासार्ह आणि सुरक्षित गोदाम सेवा देण्याच्या उद्देशाने कार्य करते. सिक्युरिटीज मार्केटमधील प्रमुख डिपॉझिटरी म्हणून सीसीआरएलला सीडीएसएल संस्थेने मान्यता दिली आहे. सीसीआरएलने रिपॉझिटरी सेवांसाठी एक मजबूत इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्म आणि उच्च अनुभवी तज्ञांच्या टीमची नेमणूक केली आहे.

रेपॉजिटरी सहभागी ः
१) रेपॉजिटरी सहभागी हे सीसीआरएलद्वारे नियुक्त केले जातात. त्यांच्या ग्राहकांना रिपॉझिटरी मार्गदर्शक तत्त्वांनुसार सेवा देण्यासाठी रेपॉजिटरी सहभागीना प्रशिक्षित केले जाते.
२) सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया किंवा वखार विकास आणि नियामक प्राधिकरणामध्ये नोंदणीकृत कोणतीही संस्था (व्यक्ती आणि मालकी संस्थांव्यतिरिक्त) रेपॉजिटरी सहभागी होण्यासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.
३) अर्ज करताना सीसीआरएल सर्व अधिकारांसह किंवा मर्यादित अधिकारांसह रेपॉजिटरी सहभागीदाराची (RP) ची निवड करू शकते. निवड झालेल्या आरपीने ग्राहकांच्या कागदपत्रांची काळजीपूर्वक तपासणी करणे, खात्याची देखभाल आणि व्यवहार विषयक सेवा देणे अपेक्षित आहे.
४) रिपॉझिटरी खाते उघडू पाहत असलेल्या ग्राहकांना
सीसीआरएलद्वारे रेपॉजिटरी सहभागीदारांचे पॅनेल तयार करण्यात आले असून त्याची यादी ग्राहकांना उपलब्ध करून दिली जाते. बँका आणि बिगर वित्तीय कंपन्या रेपॉजिटरी सहभागी बनण्यासाठी अर्ज करू शकतात.

ग्राहक ः
१) इलेक्ट्रॉनिक- हस्तांतरणीय वखार पावतीमध्ये व्यवहार करू इच्छित असलेली व्यक्ती किंवा संस्था सीसीआरएलच्या पॅनेलमध्ये असलेल्या रेपॉजिटरी सहभागीकडे खाते उघडू शकते.
२) ग्राहक त्यांच्या सोयीनुसार कोणत्याही एक किंवा अधिक आरपीशी संपर्क साधू शकतो. रेपॉजिटरी सहभागी खाते उघडण्यासाठी अर्ज आणि आवश्यक असलेल्या सर्व कागदपत्रांबाबत मार्गदर्शन करतात.
३) रेपॉजिटरी सहभागीद्वारे दस्तऐवजांची यशस्वी पडताळणी केल्यावर, ग्राहकाला एक ग्राहक खाते क्रमांक दिला जातो. हा खाते क्रमांक ग्राहक सर्व नोंदणीकृत गोदाम आणि बँकांमध्ये वापरू शकतो. व्यवहार सुरू करण्यापूर्वी ग्राहकांना त्यांच्या रेपॉजिटरी सहभागीसोबत दर निश्चित करण्याची विनंती केली जाते.


नोंदणीकृत गोदाम ः
१) निगोशिएबल अथवा हस्तांतरणीय वेअरहाऊस पावत्या देणाऱ्या गोदाम व्यवसायाची सुरवात करण्यास इच्छुक व्यक्ति किंवा संस्था,सहकारी संस्था,शेतकरी उत्पादक कंपनी वखार विकास आणि नियामक प्राधिकरणाकडे त्यांच्या मालकीच्या किंवा ताब्यात असलेल्या एक किंवा अधिक गोदामांकरीता नोंदणीसाठी अर्ज सादर करू शकतात.
२) नोंदणीसाठीचा प्रत्येक अर्ज वखार विकास आणि नियामक प्राधिकरणाद्वारे विहित केलेल्या शुल्कासह सादर करणे अपेक्षित आहे. गोदामधारकाने नोंदणीसाठी, वखार विकास आणि नियामक प्राधिकरणाच्या https://www.wdra.gov.in पोर्टलवर अर्ज करावा. याकरिता नोंदणीचे मार्गदर्शन(https://wdra.gov.in/web/wdra/procedure-for-registration) या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
३) नोंदणीनंतर, गोदामधारक सीसीआरएलद्वारे इलेक्ट्रॉनिक निगोशिएबल वेअरहाऊस पावती ग्राहकांना देऊ शकतात. वखार विकास आणि नियामक प्राधिकरणाकडे नोंदणीकृत गोदामामध्ये गोदामाच्या सेवा/कार्ये करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा, ज्ञान, अनुभव आणि कौशल्य असलेले मनुष्यबळ असणे आवश्यक आहे.

शेतकरी कंपन्यांसाठी फायदेशीर ः
१) सीसीआरएल शेतमालाचे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने हस्तांतरण करण्याच्या सुविधा उपलब्ध करून देते. या दिशेने गोदाम पावती व्यवसाय करण्याच्या अनुषंगाने विविध ग्राहक गट जसे की शेतकरी, शेतकरी उत्पादक संस्था, प्रोसेसर, उत्पादक, व्यापारी इत्यादींसाठी इलेक्ट्रॉनिक निगोशिएबल वेअरहाऊस पावत्या किंवा इलेक्ट्रॉनिक नॉन-निगोशिएबल वेअरहाऊस पावत्या मिळविण्यासाठी डीमॅट खाती उघडण्यास सहकार्य केले जाते.
२) गोदाम व्यवसाय ऑनलाइन पद्धतीने व भौतिक अशा दोन प्रकारे करता येतो. पहिल्या टप्प्यात ज्या सहकारी संस्था अथवा शेतकरी उत्पादक कंपन्या कामकाज सुरू करतील त्यांना ऑनलाइन प्रक्रियेत काम सुरू करण्यात अडचण येणार नाही.
३) सीसीआरएलशी निगडित रिपॉझिटरीजद्वारे इलेक्ट्रॉनिक निगोशिएबल वेअरहाऊस पावत्या किंवा इलेक्ट्रॉनिक नॉन-निगोशिएबल वेअरहाऊस पावत्या देणे ही एक नियमन केलेली प्रक्रिया असून ग्राहकांचे किंवा शेतकऱ्यांचे पारंपारिक भौतिक वेअरहाऊस पावतींशी संबंधित अनेक जोखमींपासून संरक्षण करते.
४) मालाची पावती न देता वेअरहाऊस पावत्या फसव्या पद्धतीने देणे, किंवा वस्तूंच्या मूल्यांचा किंवा गुणवत्तेचा चुकीचा तपशील देणे, फसवणूक, डुप्लिकेट गोदामाच्या पावत्या देणे, तोटा, विकृतीकरण, गोदामाच्या पावत्यांमधील माहितीची छेडछाड इत्यादी जोखीम विषयक बाबींचा समावेश होतो.

५) डिपॉझिटरी म्हणून सिक्युरिटीज मार्केटला साहाय्य करण्यासाठी उच्च विकसित इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्म चालवण्याचा अनुभव असलेल्या त्याच्या मूळ सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड या भागीदाराच्या कौशल्याचा सीसीआरएलला महत्त्वपूर्ण फायदा होतो. या प्लॅटफॉर्मवरील सर्व व्यवहार इलेक्ट्रॉनिक असून ‘ऑथोरायझेशन कोड’ सह सुरक्षित आहेत.
६) सहकारी संस्था,शेतकरी उत्पादक कंपन्या आणि महिला बचत गटाचे फेडरेशन या सर्व घटकांना गोदामाशी निगडित सर्व प्रक्रिया अवघड वाटू शकेल परंतु याविषयात काम सुरू केल्यास हळूहळू त्यातील ज्ञान वाढत जाऊन त्या विषयातील कौशल्य वाढेल आणि खासगी कंपन्यांप्रमाणे सर्व समूह आधारित संस्था सुद्धा सक्षम होतील. परंतु सुरवातच केली नाही तर आजच्या या डिजीटायझेशनच्या युगात प्राथमिक कृषी सहकारी संस्थांप्रमाणे शेतकरी कंपन्यांची स्थिती होऊ शकते.

७) प्राथमिक कृषी सहकारी संस्थांनी आधुनिक युगाची पावले ओळखून कामकाज केले नसल्याने या संस्थांची परिस्थिती दयनीय आहे. या संस्थांच्या यशोगाथा शोधायच्या म्हटले तरी बऱ्याच वर्षापासून तीच उदाहरणे दिली जातात. या परिस्थितीसाठी संपूर्णपणे प्रथमत: संस्थांचे संचालक मंडळ, त्यानंतर संचालक मंडळाचा राजकारणविषयातील रस जबाबदार आहे. या परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी केंद्र शासन मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करीत असले तरी राज्यस्तरावर स्वतंत्र उपाययोजना करणे आवश्यक आहे. शेतकरी कंपनीच्या धर्तीवर कृषी, सहकार, पणन, पशुसंवर्धन व इतर विभागाच्या योजनांची सांगड घालून सहकारी संस्थांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. या संस्थांच्या निवडणूका झाल्यानंतर नवीन तरुण संचालक मंडळी काहीतरी घडविण्यास इच्छुक आहेत, परंतु सहकारी संस्थांसाठी पूरक योजना नाहीत तसेच ज्या योजना आहेत त्यामध्ये अनुदान टक्केवारी संस्थांच्या परिस्थितीच्या तुलनेत नगण्य आहे. त्यामुळे गोदामाशी संबंधित व्यवसाय उभारणीसाठी कितीही सामाजिक परिस्थिती अनुकूल असली तरी आर्थिक विवंचनेमुळे सहकारी संस्था व्यवसायात उतरण्यास धजावत नाहीत. त्यामुळे सीसीआरएल सारख्या प्लॅटफॉर्मवर येऊन व्यवसाय करण्यास आणखी किती दिवस या सहकारी संस्था घेतील हा संशोधनाचा विषय आहे. परंतु शेतकरी उत्पादक कंपन्या गोदाम व्यवसायात आघाडीवर असून सीसीआरएल सारख्या प्लॅटफॉर्मवर त्यांच्यामार्फत पुढील १ते २ वर्षात कामकाज सुरू झाल्याचे दिसून येईल.
-----------------------------------------------------------
संपर्क ः प्रशांत चासकर,९९७०३६४१३०
( शेतमाल तारण व्यवस्थापन सेवा तज्ञ,प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, एमसीडीसी, स्मार्ट महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्या.पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Export : निर्यातीचा पकडा ‘धागा’

Rabi Crop Demonstration : तेलबिया उत्पादनाचे रब्बीत १७,८०० हेक्टरवर पीक प्रात्यक्षिके

Distillery Project : आसवनी प्रकल्पांच्या पाण्याचे वर्गीकरण वादात

Malegaon Sugar Factory : ‘माळेगाव’चे १५ लाख टन ऊस गळिताचे उद्दिष्ट

Quality Control Department Issue : ‘गुणनियंत्रण’च्या बदल्यांसाठी समुपदेशन हाच एकमेव पर्याय

SCROLL FOR NEXT