Top 5 News: …तर कापूस आयात करावा लागेल : कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया

कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया, अर्थात 'सिएआय'चे अध्यक्ष अतुल गणात्रा यांनी केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या बैठकीत कापसाच्या एमएसपीबाबत केंद्राला काय सल्ला दिलाय, वाचा सविस्तर...
Cotton Import News
Cotton Import News
Published on
Updated on

1. गेल्या चार ते पाच दिवसांपासून राज्यातल्या दहापेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी थंडीची लाट आली होती. आज सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) अंदाजाप्रमाणे थंडीची लाट कायम राहिली. विदर्भातल्या काही ठिकाणच्या कमाल आणि किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत पाच अंश सेल्सिअसपेक्षाही जास्त घसरण झाली होती. पण आता विदर्भासहित मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही थंडीची लाट (cold wave) ओसरलीये. परिणामी, थंडीचा जोर कमी होत असून येत्या पाच दिवसांमध्ये हवामान मुख्यतः कोरडं (dry weather) राहण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवलाय.

Daily Weather Video Hindi 29.01.2022 Youtube Link: https://t.co/P6JSoOe2Oh Facebook Link: https://t.co/jXeHcfcKMJ

— India Meteorological Department (@Indiametdept)

2. यंदाच्या रब्बीत देशात एक नवीन पॅटर्न दिसतोय. नुसतंच अन्नधान्य पिकवण्याऐवजी शेतकऱ्यांनी इतर पर्यायांना पसंती दिल्याचं सरकारी आकडेवारी (government data) सांगते. देशात सुरू असलेल्या एका नव्या ट्रेंडची ही सुरुवात असू शकते. कारण गहू, भात, कडधान्य, अन् भरडधान्यांचा (coarse cereals) पेरा यंदाच्या रब्बीत जवळपास 2 टक्क्यांनी घटलाय. यंदा 587.1 लाख हेक्टरवर या पिकांचा पेरा असून गेल्या वर्षीच्या या काळात हाच आकडा 597.58 लाख हेक्टर इतका होता. असं असलं तरी कडधान्यांचा पेरा (pulses area) गेल्या वर्षीपेक्षा जरा जास्तंय. त्याला कारण आहे हरभऱ्याच्या पेऱ्यात झालेल्या वाढीचं.

3. बेदाणा (raisins) तयार करण्यासाठी लागणाऱ्या डिपिंग ऑइल, कार्बोनेट, गंधक (sulphur), आणि पृष्ठाच्या डब्यासाठी (corrugated box) लागणाऱ्या कच्च्या मालाची आयात सध्या बंद आहे. त्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या दरात सुमारे १५ ते २० टक्क्यांनी वाढ झालीये. डिझेलच्या दरात (diesel rate) वाढ झाल्यानं वाहतूक खर्चातही वाढ झालीये. पॅकिंगला लागणाऱ्या साहित्यातही वाढ झालीये. या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणून बेदाणा उत्पादन खर्चात २५ टक्‍क्यांनी वाढ होण्याची शक्यता असल्याचं चित्र सध्या सांगली जिल्ह्यात दिसतंय.

4. मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यांतल्या ५७ कारखान्यांनी (sugar factories) यंदाच्या गाळप हंगामात सहभाग नोंदवलाय. या सर्व कारखान्यांनी २७ जानेवारी अखेरपर्यंत १ कोटी ४२ लाख ७३ हजार ३३२ टन उसाचं गाळप करत १ कोटी ३८ लाख १६ हजार ८५५ क्‍विंटल साखरेचं उत्पादन केलंय. परभणी आणि लातूर जिल्ह्यांतल्या कारखान्यांचा सरासरी साखर उतारा १० टक्‍क्‍यांच्या पुढे राहिल्याची माहिती साखर विभागाच्या वतीनं देण्यात आली. यंदाचा उस गाळप हंगाम उशिरानं सुरू झाला. त्यातच काही कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू होईल की नाही या विषयी साशंकता होती. सर्वच अनिश्‍चिततेमुळे काही भागात अतिरिक्‍त उसाचा प्रश्‍‌नही निर्माण होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. माहितीनुसार अजूनही उस्मानाबाद, बीड जिल्ह्यांतील साखर कारखाने आपल्या दैनिक क्षमतेपेक्षा कमी क्षमतेनं उस गाळप करतायत.

हा व्हिडिओ पाहिलात का? :  

5. केंद्रीय कृषी मंत्रालयानं बोलवलेल्या बैठकीत कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया, अर्थात सिएआयचे (CAI) अध्यक्ष अतुल गणात्रा सहभागी झाले होते. यावेळी दिलेल्या माहितीनुसार यंदा 170 किलोच्या 348 लाख कापूस गाठींचं उत्पादन भारतात होण्याचा सिएआयचा (CAI) अंदाज आहे. तर गेल्या वर्षीचा 125 लाख गाठींचा शिल्लक साठा बाजारात होता. यंदा हा साठा 75 लाख गाठींचा होता. तर ताज्या आकडेवारीनुसार 30 सप्टेंबरपर्यंत 40 ते 45 लाख गाठी कापूस साठा शिल्लक होता. सध्या देशातल्या प्रमुख बाजारांमध्ये कापसाचा भाव 9000 ते 10000 च्या दरम्यान आहेत. या भावांच्या परिणामी येत्या हंगामात सोयाबीन, भुईमूग, आणि मिरचीसारख्या पिकांखालचं क्षेत्र कापसाखाली वळतं होऊ शकतं, असं सिएआयनं (CAI) म्हटलंय. देशभरातल्या कापूस बिजोत्पादकांकडून सिएआयला (CAI) मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे बियाण्यांची मागणी 50 ते 60 टक्क्यांनी वाढलीय. येत्या काही महिन्यांमध्ये ही मागणी वाढत जाण्याचा अंदाज आहे. त्यामुळे कापूस बिजोत्पादनाची गती वाढवण्यात आली असल्याचंही गणात्रा यांनी मंत्रालयाला सांगितलंय. त्यामुळे येत्या खरिपात कापसाच्या क्षेत्रात 20 ते 25 टक्क्यांची वाढ होऊ शकते, असा सिएआयचा (CAI) होरा आहे. शेतकऱ्यांचं हित जोपासण्यासाठी कापसाची किमान आधारभूत किंमत येत्या हंगामात वाढवली जावी, असं सिएआयचं (CAI) मत आहे. पण एकगठ्ठा किमान आधारभूत किंमत (MSP) वाढवल्यानं उद्योग क्षेत्र प्रभावीत होऊ शकतं. त्यामुळे कापसाची किमान आधारभूत किंमत (MSP) 3 ते 5 टक्क्यांनी वाढवावी, अशी शिफारसही सिएआयनं (CAI) केलीय. तर एक्स्ट्रा लाँग कापसाचं (Extra Long Staple) देशांतर्गत उत्पादन वाढवण्यासाठी त्याची किमान आधारभूत किंमत (MSP) 25 ते 30 टक्क्यांनी वाढवावी, अशी शिफारस सिएआय नं केलीय. सध्या या कापसाची भारतात आयात केली जाते. तर कापूस बियाण्यांच्या किमतींवरचे निर्बंध उठवावेत. जास्त भाव मिळणार असल्यास बियाणे कंपन्या शेतकऱ्यांना चांगलं तंत्रज्ञान देऊ शकतात, असंही सिएआय म्हणतंय. देशात सध्या कापसाची उत्पादकता वाढण्यास मदत होईल. गेल्या पाच वर्षांपासून देशात दरवर्षी 350 लाख गाठींच्या आसपास उत्पादन होतंय. तर याऊलट आपला वार्षीक कापूस वापर 310 लाख गाठींवरून 345 लाख गाठींवर जाऊन पोहोचलंय. आपण आपलं कापूस उत्पादन वेळीच वाढवलं नाही, तर कापसाची आयात करण्याची वेळ भारतावर येईल, असा इशारा सिएआय नं दिलाय.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com