Chana Disease Management : राहुल वडघुले
हरभरा पिकात बुरशी, जिवाणू, विषाणू, सूत्रकृमी, मोल्ड यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे सुमारे ३५ ते ४० रोग दिसून येतात. मात्र महाराष्ट्रामध्ये हरभरा पिकावर सर्वांत मोठ्या प्रमाणावर दिसून येणारा रोग म्हणजे मर रोग.
ही मर बुरशी, जिवाणू, मोल्ड, सूत्रकृमी या वेगवेगळ्या घटकांमुळे येऊ शकतो. म्हणूनच नेमक्या रोगकारक घटकाची ओळख पटविण्याची आवश्यकता असते. योग्य निदान केले तरच पुढील योग्य उपाययोजना करणे शक्य होते. मागील हंगामात हरभरा पिकामध्ये आम्हाला बुरशीमुळे आलेला मर रोग आढळला होता. त्या विषयी माहिती घेऊ.
रोगाचे नाव : मर रोग
रोगकारक घटक : बुरशी
बुरशीचे शास्त्रीय नाव :
फ्युजारिअम स्पे. (Fusarium Sp.)
किंगडम : फंगाय (Fungi)
वर्ग (Division) :
अस्कोमायकोटा (Ascomycota)
परजीवी प्रकार : वैक्लपिक परजीवी (Facultative Parasite)
प्रादुर्भाव होण्याचा अवधी : मुख्य शेतात उगवणीनंतर १५ ते २० दिवसांत हा रोग दिसून येतो.
अन्य यजमान पिके : १२० प्रकारच्या वनस्पतींवर ही बुरशी रोग निर्माण करते. आपल्याकडील मुख्य पिके म्हणजे कांदा, आंबा, लसूण, मिरची, वांगी, टोमॅटो, बटाटा, कोबी, फ्लॉवर, टरबूज, केळी, ऊस इ. पिके त्याला बळी पडतात.
नुकसान : सामान्यतः १० ते २० टक्के नुकसान होऊ शकते. अति प्रमाणात प्रादुर्भाव असल्यास ८० ते १०० टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते.
लक्षणे : शेतामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये मर रोगाची लक्षणे दिसून येतात. हा रोग प्रामुख्याने उगवणीनंतर १५ ते २० दिवसानंतर दिसून येत असला तरी त्यानंतर कधीही दिसून येऊ शकतो. झाडाची पाने सुकायला लागणे हे मुख्य लक्षण आहे. पाने सुकून पिवळी होतात. यामुळे पाने, फुले, घाटे गळून पडतात. झाड जमिनीवर आडवे होते. सुरुवातीला झाडाच्या मुख्यत्वे एका बाजूला व खालच्या बाजूने रोगाची लक्षणे दिसू लागतात.
झाडाचा मुळाचा भाग शुष्क, कोमेजलेला दिसतो. मुळाच्या आतील भाग काळसर पडतो. रोगग्रस्त मुळावर, निरोगी मुळासारखे उपमुळे व त्यावर असलेल्या उपयुक्त जिवाणूंच्या गाठी दिसत नाही. रोगग्रस्त मुळे लवकर तुटून जातात. बऱ्याच वेळा त्यावर पांढरी बुरशी वाढलेली दिसते.
पोषक वातावरण : या रोगाच्या वाढीसाठी २३ ते २७ अंश सेल्सिअस तापमान व ८० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त आर्द्रता आवश्यक असते. तापमान ३४ अंशांच्या वर किंवा १७ अंशांच्या खाली तापमान असताना या रोगाची वाढ होत नाही. मुळाजवळील तापमान पण २५ अंश सेल्सिअस असणे गरजेचे असते. आम्लता असलेल्या जमिनीत (सामू ५ ते ५.९) हा रोग चांगला वाढतो.
काय काळजी घ्यावी?
वारंवार पिकाचे निरीक्षण करून रोगग्रस्त रोपे दिसतात की नाही, याची नोंद घ्यावी.
नियंत्रणाचे उपाय
शेताची खोल नांगरट करावी.
रोगविरहित बियाणे निवडावे.
पेरणीपूर्वी जैविक किंवा रासायनिक बीज प्रक्रिया करावी. विशेषतः ज्या भागात हा रोगाचे प्रमाण कमी असते, अशा ठिकाणी ट्रायकोडर्मा व्हिरीडीसारख्या जैविक बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी. तर जिथे रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळतो, अशा ठिकाणी रासायनिक बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी.
पीक लागवडी पूर्वी संपूर्ण शेतात जैविक बुरशीनाशक उदा. ट्रायकोडर्मा व्हिरिडीचा वापर फवारणी किंवा धुरळणी स्वरूपात करावा.
शेणखतात जैविक बुरशीनाशकाचा वापर अधिक प्रभावी ठरतो.
शेतात दाट पेरणी करू नये.
लसूण, मिरची, टोमॅटो, कांदा यांसारखी अन्य यजमान पिके शेतात घेतली असल्यास त्याच शेतात हरभरा घेऊ नये.
जमिनीतून मुळांना इजा करणाऱ्या किडी उदा. हुमणी, वायर वर्म यांचे नियंत्रण करावे.
रोग कसा निर्माण होतो?
मर रोगाचा प्रसार बियाणे आणि जमिनीतून होत असतो. ही बुरशी मागील वर्षीच्या पिकांचे अवशेष, अन्य सेंद्रिय पदार्थ किंवा जमिनीमध्ये क्लामॅडोस्पोरच्या रूपात किंवा तंतूंच्या रूपात जिवंत राहते. पोषक वातावरण आणि यजमान उपलब्ध झाल्यावर क्लामॅडोस्पोरचे अंकुरण होते. तयार होणारी ‘जर्म टूब’ मुळामध्ये जाऊन झायलम पेशीमध्ये वाढते.
त्यानंतर ती संपूर्ण झाडामध्ये वाढते. याला प्राथमिक प्रादुर्भाव (Primary Infection) म्हणतात. त्यानंतर बुरशी अलैंगिकपणे दोन प्रकारचे (मॅक्रो आणि मायक्रो कोनिडिया) बीजाणू तयार करते. ही प्रक्रिया जमिनीतील नायट्रोजन आणि कार्बन यांच्या उपलब्धतेवर अवलंबून असते. या बीजाणूपासून पुढील प्रादुर्भाव होतो. रोगाचा प्रसार दुसऱ्या झाडांवर होतो.
मायक्रोस्कोप खाली काय दिसते?
मायक्रोस्कोप खाली मर रोगाचे मॅक्रो बीजाणू स्पष्टपणे पाहता येतात. हे बीजाणू विळ्याच्या आकाराचे मोठे व रंगहीन असतात. या आकाराला आपण विळ्याचा आकार किंवा चंद्राकृती म्हणू शकतो. या बीजाणूमध्ये ३ ते ४ पेशीभित्तिका असतात. हे अनेकपेशीय असतात.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.