Cashew Rate
Cashew Rate  Agrowon
ॲग्रो विशेष

Cashew MSP : काजू बीला हमीभावाची मागणी शेतकरी का करतायत?

Dhananjay Sanap

Cashew Update : कोकणातील प्रमुख नगदी पीक अशी काजू पिकाची (Cashew Crop) ओळख आहे. परंतु मागील दोन महिन्यापासून राज्यात होणाऱ्या वादळी पावसाने काजू उत्पादकांना मोठा तडाखा बसतोय. फेब्रुवारी ते एप्रिल काजू काढणीचा हंगाम असतो.

परंतु यंदा वाढत्या उष्णतेचेही काजू पिकाला झळ बसली. परिणामी उत्पादनात घट आली. आधीच निसर्गाच्या फेऱ्यात अडकलेल्या काजू उत्पादकांना (Cashew Production) आता काजू बी दर कमी झाल्याने तोटा सहन करावा लागतोय. त्यामुळे राज्य सरकारने काजू बीची हमीभावाने खरेदी करावी, अशी मागणी काजू उत्पादकांनी केलीय.

काजू बीवर प्रक्रिया करून काजू तयार केले जातात. सध्या राज्यात काजू बीचे दर प्रतिकिलो ११० ते ११२ रुपयेपर्यंत खाली आले आहेत. या दरात काजू बीची विक्री केल्यास उत्पादन खर्चही वसूल होत नाही. त्यामुळे राज्यातील काजू उत्पादकांनी नाराजी व्यक्त करत काजू बीची हमीभावाने खरेदी करण्याची मागणी केली.

मागील दोन महिन्यांपासून राज्यात वादळी पाऊस, तीव्र उष्णता यामुळे काजू पिकाला फटका बसला. तर दुसरीकडे व्यापारी आणि कारखानदारांनी काजू बीचे दर पाडून शेतकऱ्यांना गोत्यात आणल्याचे शेतकरी सांगतात.

"काजू बीचे दर सध्या प्रतिकिलो १०० ते ११० रुपयांच्या दरम्यान आहेत. एक किलो काजू बीसाठी १२५ रुपयांच्या दरम्यान खर्च येतो. त्यामुळे सध्याच्या दरात काजू बी विकणे शेतकऱ्यांना परवडत नाही. सरकारने कमीत कमी १५० ते १६० रुपये प्रतिकिलो हमीभाव जाहीर करावा.

अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना किफायतशीर दर मिळण्यासाठी केंद्र सरकारने आयातशुल्क वाढवावं किंवा काजू बी हमीभाव खरेदी करावं जेणेकरून शेतकरी तोट्यात जाणार नाही." असं रत्नागिरी ता. लांजा येथील शेतकरी दीपक जठार यांनी सांगितले.

अलीकडेच काजू प्रक्रिया उद्योगाने केंद्र सरकारला काजू आयातशुल्क कमी करण्यासाठी विनंती केली होती. त्यानुसार केंद्र सरकारने उद्योगाला अभय देत काजू आयातशुल्क ५ टक्क्यावरून २ टक्के केलं. त्याचाही बाजारावर दबाव आल्याचे जाणकार सांगतात.

काजूच्या जागतिक उत्पादनापैकी २३ टक्के उत्पादन भारतात घेतलं जातं. देशात प्रामुख्याने गोवा, केरळ, ओडीसा, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, आणि आंध्रप्रदेशमध्ये काजू पीक घेतलं जातं. काजूचं देशात सर्वाधिक उत्पादन महाराष्ट्र राज्यात होतं.

कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि कोल्हापूर जिल्ह्यातील काही भागात काजूची पिकांची लागवड केली जाते. तसेच कोकणातील काजूला भौगोलिक मानांकन (जीआय टॅग) देखील मिळालेला आहे. त्यामुळे कोकणातील काजूला बाजारात मोठी मागणी असते.

परंतु मागील काही दिवसांपासून सरकारच्या धोरणामुळे कोकणातील काजू बीचे दर पडले आहेत.

राज्य सरकारने काजू बीची किंमत निश्चित करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. दुसरीकडे उद्योग आणि कारखानदार काजू उत्पादक शेतकऱ्यांची आडवणूक करत असल्याचा आरोपही शेतकरी करतात. परंतु उद्योगाला सरकारचा उदासीन धोरणाचा फटका बसत असल्याने प्रक्रिया उद्योग खिळखिळ झाल्याचा दावा काजू प्रक्रिया उद्योगाचे माजी अध्यक्ष विवेक बारगिरे यांनी केला आहे.

"२०१७ मध्ये काजू बी खरेदी दर १७० ते १८० रुपये प्रतिकिलो होते. त्यानंतर सरकारने काजू आयात करून दर दबावात आणले. आयात केलेल्या काजूचे दर कमी ठेवले गेले. त्यामुळे उद्योगाला मोठा फटका बसला. खरेदी केलेल्या काजुगर कोविड लॉकडाउनमुळे खराब झाला.

बदलत्या वातावरणामुळे सध्या उद्योगाकडे येणाऱ्या मालात ४० ते ५० टक्के खराब माल येतो. त्याचा दणका उद्योगाला सहन करावा लागतो आहे." अशी प्रतिक्रिया बारगिरे यांनी दिली.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून काजू बीची हमीभावाची मागणी केली होती. तसेच राज्य अर्थसंकल्प अधिवेशनात काजू बीचा मुद्दा उपस्थित केला होता. राज्यातील काजू बीचे दर पडल्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्र लिहून काजू बी हमीभावाने खरेदी करण्याची विनंती केली.

"दापोली विद्यापीठाने १२२ रुपये ५० पैसे उत्पादन खर्च काढला आहे. कोकणात काजू बीला मात्र प्रतिकिलो ११० रुपये दर मिळतो. शेजारच्या गोवा राज्याने काजू बीला १५० रुपये किलो हमीभाव जाहीर केला आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्रात शासनाकडूनही चांगला हमीभाव मिळाल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आहे." अशी मागणी पत्रात केली आहे.

द कॅश्यू एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार देशात २०१९-२० साली ७ लाख हजार टन काजू उत्पादन झाले होते. तर २०२१-२०२२ मध्ये त्यामध्ये वाढ होऊन उत्पादन ७ लाख ७० हजार टनावर पोहचले होते.

मागील २५ वर्षात देशातील काजू उत्पादनात वाढ झाली. नाजेरिया आणि व्हिएतनाम नंतर सर्वात मोठा काजू निर्यातदार देश अशी भारताची ओळख आहे. जगभरातील जवळपास ६० देशांमध्ये काजूची निर्यात होत असते. जागतिक निर्यातीमध्ये भारताचा १५ टक्के वाटा आहे.

दरम्यान, यंदा हवामानातील उष्णतेची झळ काजू उत्पादकांना सोसावी लागत आहे. ऐन बहाराच्या कालावधीत उष्णतेमुळे काजूगराचा आकार आणि वजन घटलं. त्यामुळे काजू बीची गुणवत्ता खालावली. परिणामी कमी गुणवत्तेच्या मालामुळे बाजारातील दरावर दबाव आला आहे, असं अभ्यासकांनी सांगितलं.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT