Land Dispute Agrowon
ॲग्रो विशेष

Land Dispute : जमीन कुणाची, भांडतंय कोण?

Shekhar Gaikwad Article : आयुष्यभर जमीन बागायत करण्यासाठी खस्ता खाल्लेल्या शंभुरावला दोन्ही मुलांचे समाधान होईल असे वाटप करता आले नाही. उतार वयात वडील एका भावाकडे आणि आई एका भावाकडे असे विचित्र वाटप झाले तेव्हा साधे गावकरी हळहळले होते.

Team Agrowon

- शेखर गायकवाड
Land Value : एका गावात पाटबंधारे विभागाचा एक मध्यम प्रकल्प होता. गावातील सुमारे चारशे एकर जमीन या प्रकल्पात बुडाली होती. धरणातील पाण्याचा उपयोग खालच्या दोन-तीन गावांना होत असे. धरणामध्ये तीस-चाळीस शेतकऱ्यांच्या सर्व जमिनी बुडाल्या होत्या. गावात वीस-पंचवीस शेतकरी असे होते, ज्यांची थोडी जमीन पाण्याखाली गेली होती व थोडी जमीन पाण्याच्या वर राहिली होती. त्यापैकीच एकनाथ नावाचा शेतकरी कष्ट करून त्याची धरणात न बुडालेली जमीन कसत होता.

धरणाची पाण्याची पातळी कमी झाली, की आणखी काही गाळपेर जमीन दरवर्षी उघडी पडत असे. सात महिने पाण्याखाली राहिलेली व उन्हाळ्यात चार-पाच महिने उघडी पडणारी ही गाळपेर जमीन अतिशय सुपीक होती. अशी जमीन उघडी पडली की एकनाथ या जमिनीमध्ये कधी कलिंगड, तर कधी मका यांसारखी पिके घेत होता. सुरुवातीची काही वर्षे एकनाथ हा फक्त स्वतःच्या मालकीच्या गाळपेर जमिनीत पीक घेत होता. कायद्याने सरकारने बुडालेल्या सर्व जमिनींचा कायदेशीर मोबदला संबंधित शेतकऱ्यांना दिला होता. त्यामुळे सरकार जमिनीचे मालक झाले होते.

हळूहळू काही वर्षे उलटल्यानंतर एकनाथ स्वतःच्या मालकीबरोबरच इतरांच्या पूर्वी मालकीच्या असलेल्या गाळपेर जमिनीवरती पिके घेऊ लागला. जमीन सरकारच्या मालकीची असल्यामुळे गावातले लोक काही बोलू शकत नव्हते व ज्यांच्या मालकीची जमीन होती ते पुनर्वसन झाल्यामुळे दुसऱ्या गावात निघून गेले होते.

गावातील काही लोकांनी स्थलांतरित झालेल्या या लोकांनी कागाळी करून तुमची जमीन सरकारच्या मालकीची होऊन सुद्धा एकनाथ कसत आहे अशी तक्रार केली. आता एकनाथ विरुद्ध इतर मूळचे जमीन मालक असा जमिनीचा नवाच खटला सुरू झाला आणि विशेष म्हणजे ज्या जमिनीमुळे भांडण सुरू झाले ती जमीन यांपैकी कोणाच्याच मालकीची नव्हती, तर सरकारच्या मालकीची होती. सरकारच्या मालकीच्या जमिनीबद्दल शेतकरी भांडत असल्यामुळे सरकारी अधिकाऱ्यांना आश्‍चर्य वाटत होते.

आई-वडिलांचे वाटप
शंभुराव नावाचा एक बागायतदार होता. त्याला रघू व नीरज नावाची दोन मुले होती. रघू थोरला होता आणि घरचा कारभार तोच करत असे. नीरज धाकटा शिकलेला व नोकरी करणारा होता. कमावता झाल्यावर दोघा भावांमध्ये पटेनासे झाले आणि दोघांनी पण जमिनीत वाटण्या करण्याचा सारखा तगादा वडिलांच्या मागे लावला होता. जोपर्यंत शरीर थकत नाही तोपर्यंत मी वाटण्या करणार नाही असे शंभुरावचे म्हणणे होते.

शंभुराव म्हातारा झाल्यावर त्याने एकदाचे जमिनीचे वाटप करायचे ठरवले. जमिनीच्या वाटपासाठी दोन्ही मुलांना बोलावून वाटपासाठी दोन-चार बैठका झाल्या. शंभुरावच्या मनात सरस रीतसर दोघांना समान व सारखे वाटप करायचा विचार होता. कारभारीपणा करत असल्यामुळे थोरला रघूच्या मनात मात्र काहीतरी सबब सांगून थोडीफार जास्त जमीन वाटपात घ्यायचा विचार होता.

तर धाकटा नीरज हा शिकलेला असल्यामुळे आपण फसू नये म्हणून मि‍निटा-मिनिटाला आपल्या वकील मित्राचा सल्ला घेत होता. वाटप करताना कोणत्याही परिस्थितीत दोघा भावांपैकी कोणीही कच खाणार नाही व जास्त जमीन दुसऱ्या भावाला जाणार नाही, याची दक्षता दोन्ही भावांच्या बायका घेत होत्या.

प्रत्यक्ष शेतात राहत असल्यामुळे घर थोरल्या रघूला द्यावे व त्या बदल्यात धाकट्या नीरजला विहीर असलेली जमीन द्यावी, असा वडील शंभुरावचा विचार होता. त्यावर थोरला रघू म्हणाला, आयुष्यभर आम्ही जुन्या घरात राहिलो आता आमची इच्छा नवीन बंगला
बांधायचा आहे.

त्यामुळे जुने घर घेतले तर त्या बदल्यात मला दहा गुंठे जमीन जास्त दिली पाहिजे अशी त्याने मागणी केली. बागायत जमीन मिळून सुद्धा विहिरीमध्ये दोन गुंठे व विहिरीच्या कडेने दोन गुंठे रान पडीक राहिल्यामुळे आपल्या वाट्याला जमीन कमी येते असे नीरजचे म्हणणे होते. त्या नंतर आपल्या हिश्‍शाच्या जमिनीत जायला दहा फुटांचा रस्ता रघूच्या जमिनीतून द्यावा असे निरजचे म्हणणे होते. तर आहे त्या जमिनीत रस्ते पाडू नयेत. वहिवाटीचा रस्ता आपल्या वाटणीत आहे तो तसाच राहू द्यावा व नीरजने पायवाटेचा वापर करावा असे रघूचे म्हणणे होते. जर रघू रस्ता देत नसला तर त्याने पिण्यासाठी व वापराच्या पाण्यासाठी नवीन विहीर काढावी. आपल्या हिश्‍शाला येणाऱ्या विहिरीतून पाणी घेण्याचा काही संबंध नाही, असे नीरजचे म्हणणे होते.


कितीही प्रयत्न केला तरी शेवटपर्यंत दोघांचे समाधान होईल असे न्यायाचे वाटप वडील शंभुराव करू शकले नाही. आयुष्यभर जमीन बागायत करण्यासाठी खस्ता खाल्लेल्या शंभुरावला दोन्ही मुलांचे समाधान होईल असे वाटप करता आले नाही. उतार वयात वडील एका भावाकडे आणि आई एका भावाकडे असे विचित्र वाटप झाले तेव्हा साधे गावकरी हळहळले होते.

-------------------------

ई-मेल- shekharsatbara@gmail.com

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT