Land Survey Agrowon
ॲग्रो विशेष

Land Survey : जमीन मोजणीतील अडवणुकीवर उपाय काय?

जमीन मोजणीचे नियम आहेत. कायदे आहेत. तरी लाचखोर, भ्रष्ट मानसिकतेचे काय करणार, हा प्रश्‍न येतोच. आधी शेतीचेच प्रश्‍न काही कमी नाहीत.

ज्ञानेश उगले

Land Survey : जमीन मोजणीचे नियम आहेत. कायदे आहेत. तरी लाचखोर, भ्रष्ट मानसिकतेचे काय करणार, हा प्रश्‍न येतोच. आधी शेतीचेच प्रश्‍न (Agriculture Issue) काही कमी नाहीत.

त्यात वरून जमीन मोजणीच्या (Land Survey) नावाखाली आपणच आपले किती हाल करून घ्यायचे? आणि आपण नुसताच त्रागा आणि चिडचीडही किती करायची हा ही मुद्दा आहेच.

नुसत्या चिडचिडीने ही यंत्रणा तर बदलणार नाही तर, मग किमान आपण काही बदल करावेत का? जेणेकरून आपण या यंत्रणेच्या हातचे बाहुले होत राहणार नाही.

इथे एका माकडाची आणि दोन मांजरींची एक गोष्ट सहज आठवते. दोन मांजरींना लोण्याचा गोळा सापडला. मात्र तो आपापसांत वाटायचा कसा यावरून त्यांच्यात वाद जुंपले. त्यांच्यात एकमतच होईना. कुणीच माघार घेईना. मग त्या गेल्या एका माकडाकडे.

या वादात मध्यस्थी करून दोघांमधील वाद मिटवावा, अशी त्यांनी माकडाला विनंती केली. माकडाला अर्थातच ही संधी सापडली.

आपापसांतील वादात मांजरांच्या वाट्याला फारसे काहीच आले नाही. मात्र त्यांच्या हिश्‍शाचा मोठा वाटा माकडानेच फस्त केला. ही गोष्ट या परिस्थितीत पुरेशी बोलकी आहे.

शेतकरी सहहिस्सेदार म्हणून आपल्यात आपापसांत वाद असतानाच जर आपण पुन्हा जमीन मोजणीसाठी भूमिअभिलेख यंत्रणेच्या ताब्यात गेलो, तर शोषण झाले नाही तरच नवल! हे म्हणजे गायींनी स्वत:हून कसायाच्या तावडीत जाण्यासारखेच आहे.

आधी एकत्र या

अर्थात, आधी सहहिस्सेदार शेतकऱ्यांनी आपले क्षेत्र आपल्या सातबारा उताऱ्यावरील नोंदीप्रमाणे आहे का ते पाहावे? त्यात फरक असेल तर एकत्र येऊन सहमतीने आधी यातील माहीतगार तज्ज्ञ व्यक्तींकडून मोजणी करून खात्री करून घ्यावी.

एका ठरावीक गटातील सर्व सहहिस्सेदार शेतकऱ्यांमध्ये एकमत असेल तर अभिलेख यंत्रणेकडे फक्त जागेवर जी स्थिती आहे त्याप्रमाणे खात्री करून घेणे व त्यानुसार अहवाल देणे व पुढील नोंदीसाठी तहसील यंत्रणेकडे प्रकरण पाठवणे हेच काम राहते.

आधी सर्व हिस्सेदारांची संमती, त्यानंतर मोजणी अशा क्रमाने गेलो, तर सरकारी कर्मचाऱ्याला अडवणुकीसाठी फारशी जागा राहत नाही.

संमती हा पर्याय

योगायोगाने याच दरम्यान भूमिअभिलेख खात्यातील उपअधीक्षक अधिकारी पंकज फेगडे यांची भेट झाली. त्यांच्याशी सविस्तर चर्चा झाली. शेतकऱ्यांची यंत्रणेकडून होणारी अडवणूक ही या यंत्रणेची एक बाजू आहे.

मात्र याच यंत्रणेतील काही अधिकाऱ्यांना ही अडवणूक थांबावी आणि शेतकरी आणि अधिकारी यांच्यात दुतर्फी संवाद व्हावा असेही वाटत राहते. फेगडेंशी झालेल्या चर्चेत ही दुसरी बाजूही समोर येत राहिली.

शेतकऱ्यांमध्ये आपापसात चांगली संमती असेल तर हा प्रश्‍न खूप कमी वेळात मार्गी लागू शकतो, असे फेगडे यांचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांमध्ये परस्पर संमती असेल तर शेतकऱ्यांनी सर्व हिस्सेदारांच्या साह्यानिशी अर्ज करायचा.

परस्पर संमतीने केलेल्या क्षेत्र वाटपा/बदलानुसार कच्चा नकाशा सादर करायचा. त्या आधारे उपअधीक्षक (भूमिअभिलेख) हे सुनावणी घेऊन मोजणीचे प्रकरण निकाली काढतील, अशी योजना आहे.

२०१९ मध्ये तत्कालीन भूमिअभिलेखचे संचालक व जमाबंदी आयुक्त असलेले एस. चोक्कलिंगम या कल्पक अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांतून पुढे आली आहे. त्यांनी या संदर्भातील आदेशच २०१९ मध्ये काढले होते.

‘‘या योजनेसाठी आम्ही भूमिलेख कार्यालयाच्या वतीने शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न करीत असतो. कृषी प्रदर्शनातूनही लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवली जाते. या योजनेमुळे मोजणी संबंधित अडचणींवर तोडगे निघण्यासंदर्भात सकारात्मक परिणाम समोर आले,’’ असे फेगडे यांनी सांगितले.

तंत्रज्ञानाचा वापर

सरकारी यंत्रणेतील भ्रष्टाचार कमी होण्यासाठी तंत्रज्ञानाचीही मोठी मदत होऊ शकते. मोजणीसाठी भूकरमापक यंत्रणेचा लवाजमा शेतकऱ्यांच्या शेतात जातो. तिथे हद्दी व खुणांची नोंद करून पोट हिस्से मोजणी केली जाते.

अनेक टप्प्यांत ही कामे होत असल्याने यात वेळ आणि ऊर्जा खूप जाते. याच काळात अडवणुकीचेही अनुभव येतात. मात्र उपग्रहाच्या माध्यमातून अचूक मोजणी कशी करता येईल, याकडेही लक्ष दिले जाणे गरजेचे आहे.

हे तंत्रज्ञान आता सर्वत्र वापरात आहे आणि सर्वांच्या आवाक्यातीलही आहे. जमीन मोजणीच्या कामातही अशा प्रकारे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढणे ही तर काळाची गरजच आहे.

चुकीचे काम करणाऱ्या काही लोकांमुळे भूमिअभिलेख यंत्रणा बरीच बदनाम झाली आहे. मात्र कार्यकर्त्याची भूमिका घेऊन काही चांगले अधिकारी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावताना दिसत आहेत. या भ्रष्ट वातावरणाचा त्यांनाही उबग येतो.

मात्र त्यामुळे हतबल न होता ते आपले काम करीत आहेत. अशा अधिकाऱ्यांनी अजून पुढे येऊन ही व्यवस्था बदलण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून ‘सोल्यूशन’ आणावे. त्यांना ती संधी नक्कीच आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tractor GST Reduction : ट्रॅक्टरचे दर साठ हजारांपर्यंत घटणार

Lemon Rate : बाजारात लिंबाच्या दरात मोठी घट

IoT Smart Farming : 'छत्रपती'च्या कार्यक्षेत्रात स्मार्ट फार्मिंग

Rain Forecast Maharashtra : पूर्व विदर्भात विजांसह पावसाची शक्यता

Chhattisgarh Urea Supply: छत्तीसगडमध्ये शेतकऱ्यांना दिलासा; केंद्राने ६० हजार मेट्रिक टन यूरिया मंजूर केला

SCROLL FOR NEXT