Solapur News : चिकमहूद (ता. सांगोला) येथील सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरीतील पाण्याची पातळी झपाट्याने कमी झाल्याने चिकमहूद येथे भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सांगोला तालुका युवासेना प्रमुख सुभाष भोसले यांनी स्वखर्चाने तर चिकमहूद ग्रामपंचायतीने चिकमहूदकरांना टँकरने मोफत पाणीपुरवठा सुरू केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून चिकमहूदला भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे. याची सामाजिक जाणीव ठेवून सांगोला तालुका युवासेना प्रमुख भोसले यांच्यामार्फत तसेच ग्रामपंचायतीच्या वतीनेही ग्रामस्थांना टॅंकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.
चिकमहूद येथील जलजीवन योजनेचे काम गेल्या काही महिन्यांपूर्वी पूर्ण झाले आहे, असे सांगितले जाते; परंतु अद्याप ही योजना कार्यान्वित झाली नाही. पाणीपुरवठ्यावर कोट्यवधींचा निधी खर्च करूनही अद्याप चिकमहूदकरांचा पाणीप्रश्न सुटू शकला नाही. त्यामुळे अनेक वर्षांपासून उन्हाळ्यामध्ये ग्रामस्थांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. यंदा मात्र ही परिस्थिती अधिकच भयावह बनली आहे.
गावातील हातपंप, विहिरी, बोअरवेलने तळ गाठला आहे. ग्रामपंचायतीकडून दोन ते तीन दिवसांतून एकदा पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, हे पाणी गढूळ व मातकट येत आहे. येथील महिला व आबालवृद्धांना परिसरातील विहिरीवरून पिण्याचे घागरभर पाणी आणण्यासाठी भर उन्हात पायपीट करावी लागत आहे.
चिकमहूद येथील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने उपाययोजना राबविण्यात येत आहेत. प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेकडून पाण्याची मागणी करण्यात आली आहे. गावात ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा करण्यासाठी टँकर सुरू केला आहे. तसेच तीन ठिकाणी नवीन विंधन विहिरी घेतल्या असून, तेथून पाणीपुरवठा केला जात आहे. एका खासगी मालकीच्या विहिरीतूनही पाणी घेऊन त्याचा पुरवठा गावाला केला जात आहे.आत्माराम कोळी, ग्रामविकास अधिकारी, चिकमहूद
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.