Nagar News : जिल्ह्यातील दक्षिण भागात गेल्या काही दिवसांपासून समाधानकारक पाऊस पडत असल्यामुळे मुळा धरणात ८६ टक्के पाणीसाठा झाला. कोरडवाहू भागाला फायदेशीर असलेल्या सीना धरणातही ५२ टक्के पाणीसाठा झाला आहे. गुरुवारी (ता. २८) सायंकाळी गणेश विसर्जनाला पावसाने हजेरी लावली.
नगर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून समाधानकारक पाऊस पडत आहे. अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात मागील काळात झालेल्या पावसाने भंडारदरा व निळवंडे धरणात आणि पाणीसाठा झाला. भंडारदरा धरण १५ ऑगस्टच्या दरम्यान भरलेले असून निळवंडे धरणातही आतापर्यंत ९८ टक्के पाणीसाठा झाला आहे.
या धरणातील पाणीसाठ्यामुळे उत्तरेतील बहुतांश भागाचा पाण्याचा प्रश्न सुटला असला तरी दक्षिणेत मात्र अजूनही पुरेसा पाऊस नसल्याने धरणे व कोरडीठाक आहेत. मुळा धरणाच्या पाणलोटातील अकोले तालुक्यात पाऊस थांबल्याने पाण्याची आवक थांबली होती. मात्र राहुरी, पारनेर व नगर तालुक्यांतील काही भागात झालेल्या पावसामुळे मुळातही पाण्याची आवक होत आहे. सध्या मुळा धरणाचा पाणीसाठा ८६ टक्के आहे.
अडीच टीएमसी क्षमतेचे सीना धरण कर्जत तालुक्यातील दुष्काळी भागासाठी फायदेशीर आहे. या धरणात अद्यापपर्यंत पाणीसाठा नव्हता, मात्र दोन दिवसांत झालेल्या पावसाने धरणात ५२ टक्के पाणीसाठा झाला आहे.
गणेश विसर्जनाच्या दिवशीही नगर, राहुरी, पारनेर, शेवगाव, पाथर्डी, जामखेड, श्रीगोंदा आदी भागांत पावसाने हजेरी लावली. आठ दिवसापासून पाऊस पडत असल्याने शेतकरी काही अंशी समाधानी आहेत. मात्र अजूनही अनेक धरणात पाणीसाठा होण्याएवढा पाऊस नाही. पाऊस सुरू असला तरी दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी असल्याचे आकडेवारीतून दिसून येत आहे.
गणेश विसर्जनालाही पावसाची हजेरी
वरुण राजाच्या साक्षीने गुरुवारी (ता.२८) सर्वत्र शांततेत गणेश विसर्जन करण्यात आले. अहमदनगर शहरातील मानाचा असलेल्या विशाल गणपतीची जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पूजा व महाआरती करून मिरवणूक निघाली. श्रीरामपूर, कोपरगाव, अकोले, शिर्डी, राहता, राहुरी, संगमनेर, पाथर्डी, जामखेड, श्रीगोंदा, पारनेर येथेही शांततेत विसर्जन झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.