Water Level Dropped Kolhapur : कोल्हापूर जिल्हा हा पाणीदार जिल्हा म्हणून ओळखला जातो परंतु मागच्या वर्षी कमी झालेल्या पावसाने जिल्ह्यातील अनेक तालुक्यात पाणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान हातकणंगले आणि गडहिग्लंज तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये हातकणंगले तालुक्यातील काही गावांत पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. तसेच करवीर तालुक्यातही पाणी टंचाई जाणवू लागली आहे.
करवीर तालुक्यातील १६ गावांत व सहा वाडी वस्त्यांवर पाणीटंचाई भासत आहे. गतवर्षी जिल्ह्यासह अनेक तालुक्यात फक्त ५० टक्के पाऊस झाला. यामुळे सुरुवातीपासून शेतीच्या पाण्यासह पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होत आहे. यापूर्वी एप्रिल, मेमध्ये पाणीटंचाई भासत होती. यावर्षी फेब्रुवारी, मार्चमध्येच टंचाई भासत आहे.
सादळे मादळेत भूजल पातळीत ७० टक्के घट झाल्याने तीन कूपनलिकांचे पाणी बंद झाले असून, टंचाई निर्माण झाली आहे. आज नंबरात घागर ठेवून उद्या पाणी पदरात पडत आहे. दरम्यान, एप्रिल, मेमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. सादळे मादळे करवीर तालुक्यातील उंच डोंगरातील शेवटची वस्ती आहे.
सादळेची ९००, तर मादळे १३०० लोकसंख्येची वस्ती आहे. ही वस्ती उंच डोंगरात असल्याने येथे विहिरीला ५० फुटांपर्यंत पाणी लागत नाही. ग्रामपंचायतीने पिण्याच्या पाण्यासाठी कूपनलिका खोदल्या आहेत. काही दिवसांपासून सादळेत एका कूपनलिकेचे पाणी बंद झाले. मादळेत दोन कूपनलिकांचे पाणी बंद झाले आहे. दलीत वस्तीत ग्रामपंचायतीने टंचाई काळासाठी कूपनलिका खोदली आहे. त्याचेही पाणी फक्त एक तास मिळते.
स्मशानशेडजवळ कूपनलिका आहे. मात्र, येथून पाईपचे काम पूर्ण झाले नसल्यामुळे पाणी घेता येत नाही. काही शेतकऱ्यांनी शेतात कूपनलिका खोदल्या आहेत. त्यांचे पाणी जनावरांना मिळते. ग्रामपंचायतीने विहीर खोदली मात्र, पाणी लागले नसल्याने विनावापर विहीर पडून आहे.
पाणीटंचाई निवारणासाठी दहा हजार लिटरच्या चार टाक्या बांधल्या आहेत. या टाक्यांना चावी फिटिंगचे काम सुरू आहे. पाण्याच्या पातळीत ७० टक्के घट झाली आहे. एप्रिल-मेमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई भासेल. पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन आणून कायमस्वरूपी प्रश्न सोडवावा. - छाया पोवार, उपसरपंच, सादळे-मादळे
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.