Pune News : जिल्ह्याच्या काही भागात दमदार पावसाने हजेरी लावल्यानंतर मागील चार ते पाच दिवसापांसून पावसाचा जोर ओसरला आहे. प्रामुख्याने धरणक्षेत्रातही पावसाचा प्रभाव कमी झाला आहे.
धरणांतील पाण्याची आवक काही प्रमाणात कमी झाली आहे. रविवारी (ता. ११) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये ३.४७ टीएमसी एवढ्या पाण्याची आवक झाली आहे. त्यामुळे धरणांतून सोडण्यात आलेला विसर्ग घटवला आहे.
मागील एक महिन्यात धरण क्षेत्रात आणि घाटमाथ्यांवर मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे भात खाचरे भरून वाहू लागली असून, ओढे, नाले खळाळून वाहत आहे. त्यातच धबधबेही ओसंडून वाहू लागले आहे. त्यामुळे मागील एक जूनपासून ते आतापर्यंत या काळात जवळपास तब्बल ३४२.५१ टीएमसी एवढ्या पाण्याची आवक झाली आहे.
त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश धरणे भरली असून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. जिल्ह्यातील धरणांत १९८.३४ टीएमसीपैकी उपयुक्त १८७.६१ टीएमसी म्हणजेच ९४ टक्के पाणीसाठा झाला आहे. सध्या पावसाचा जोर मंदावल्याने मंगळवारपासून धरणांतील पाण्याची आवक काही प्रमाणात कमी झाली आहे.
जिल्ह्याच्या पश्चिमेकडील घाटमाथ्यांवर पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. मुळशी या घाटमाथ्यावर ४२ मिलिमीटर पाऊस पडला. तर वळवण घाटमाथ्यावर ३२, शिरोटा २५, ठोकरवाडी २९, लोणावळा ३१ मिलिमीटर पाऊस पडला.
तर कुंडली घाटमाथ्यांवर पावसाने उघडीप दिली होती. दरम्यान, मुठा खोऱ्यातील टेमघर, वरसगाव, पानशेत, खडकवासला या सर्वच धरण क्षेत्रात ढगाळ वातावरण असून तुरळक सरी बसल्याची नोंद झाली आहे.
नीरा खोऱ्यातील गुंजवणी, नीरा देवघर, नाझरे, वडीवळे, आंध्रा, चासकमान, पवना या धरण क्षेत्रात पावसाचा तुरळक शिडकावा झाला असून कासारसाई, कळमोडी, भामा आसखेड, शेटफळ, भाटघर, वीर धरण क्षेत्रात पावसाने उघडीप दिली होती.
कुकडी खोऱ्यातील पिंपळगाव जोगे, येडगाव, वडज, चिल्हेवाडी, घोड धरण क्षेत्रात हलक्या सरी बरसल्या. तर येडगाव, डिंभे धरण क्षेत्रात ढगाळ वातावरण कायम होते. विसापूर, उजनी धरण क्षेत्रात तुरळक पाऊस झाला आहे. त्यामुळे खरिपातील पिकांना काहीसा दिलासा मिळाला.
रविवारी (ता. ११) सकाळी आठ वाजता जिल्ह्यातील धरणांतून सुरू असलेला विसर्ग, क्युसेकमध्ये : टेमघर ११८६, खडकवासला १५२४, पवना ८००, कासारसाई १३८, कळमोडी ५०१, चासकमान ८५०, आंध्रा ४०५, गुंजवणी २५०, भाटघर १६३१, नीरा देवघर ७५०, वीर ७९३७, येडगाव १४००, वडज ३००, डिंभे २६५०, चिल्हेवाडी ८५५, घोड ४२८२, उजनी १४७९०.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.