सतीश खाडे
दुष्काळामध्ये कोणत्याही पुढारी किंवा शहरी लोकांचे फारसे काही वाईट होत नाही. उलट त्यातून त्यांच्या राजकारणाच्या पोळ्या भाजल्या जातात. पण ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे, त्यांच्या जनावरांचे प्रचंड हाल होतात. पाण्याच्या एकेका घागरीसाठी दिवसदिवस भटकंती करावी लागणार ती घरातील महिलांना. हजारो लोक आपली वस्ती, गाव, प्रदेश सोडून पाणी, अन्न आणि रोजगाराच्या शोधात वणवण भटकणार! हे वर्षांनुवर्षे असेच घडत आहे.
पाणी व्यवस्थापनाकडे हव्या तेवढ्या गांभीर्याने विचारही केला जात नाही, हे दुर्दैव. गेल्या शंभर सव्वाशे वर्षाची पावसाची आकडेवारी आपल्याकडे उपलब्ध आहे. त्यातून पावसाचा पॅटर्न आणि दुष्काळाची वारंवारता यांचे अनुमान अभ्यासकांकडून काढले जाते. पण त्याचा संदर्भ प्रत्यक्ष योजना किंवा धोरणांची आखणी करताना घेतला जाताना दिसत नाही. पाणी व्यवस्थापन ही बाब केवळ मोठी धरण आणि कॅनॉल यांच्यासंदर्भात नाही, तर गाव आणि शिवाराच्याच नव्हे तर प्रत्येकाच्या वैयक्तिक पातळीवर अभ्यासली जायला हवी. कोणत्याही व्यवस्थापनाचा मूलभूत टप्पा म्हणजे पाण्याचे अंदाजपत्रक मांडणे.
आता हा अंदाजपत्रक हा शब्दही सर्वसामान्यांना घाबरून सोडतो. आपल्याला देशाचे, राज्याचे अंदाजपत्रक मांडले जाते, हे माहीत असते. पण असेच अंदाजपत्रक आपले घर, इमारत, वसाहत, शेत, शिवार, कारखाना, गाव, शहर, पाणलोट क्षेत्र आणि संपूर्ण नदी खोऱ्याचेही करता येते. पण सुरुवात नेहमी स्वतःपासून करायला हवी. त्यात अवघड काही नसते. अंदाजपत्रक म्हणजे पाण्याची आवक आणि जावक मोजणे. त्यानुसार भविष्यातील पाणी वापर ठरवणे.
आज या लेखामध्ये आपण गावच्या पाणी अंदाजपत्रकाविषयी चर्चा करू.
आपल्या गावात किती पाऊस पडणार हे आपल्या हाती नाही. पण आपल्या गावात पडणाऱ्या पावसाची सर्वसाधारण सरासरी माहिती करून घेता येईल. हे पाणी आपल्या गावाला मिळणार आहे, हे गृहित धरून पाणी वापराचे नियोजन करणे मात्र आपल्या हाती नक्कीच आहे.
या सर्व गावाच्या अभ्यासातून आणि अनुभवातून माझ्या एक बाब लक्षात आली आहे. ती म्हणजे अगदी कमीत कमी पाऊस पडणाऱ्या गावांतही माणसे व जनावरे यांना मिळून वर्षासाठी लागणारे पिण्याचे आणि वापराचे एकत्रित पाणी आवश्यकता ही फक्त पावसापासून मिळणाऱ्या एकूण पाण्याच्या तुलनेत फक्त दोन टक्के इतकीच असते. ही सरासरी महाराष्ट्र आणि भारतासाठीही सारखीच आहे. परंतु उपलब्ध पाण्यापैकी सर्वाधिक पाणी हे पिकांसाठी वापरले जाते. बहुतांश ठिकाणी आपल्याला उन्हाळ्यात व काही ठिकाणी तर कायमच पावसाचे हे दोन टक्के पाणीही आपल्याला टिकवता येत नाही. यासाठीच पाण्याचे नियोजन केले पाहिजे.
पिण्याच्या पाण्याइतकेच महत्त्वाचे आहे ते सिंचन. येथे पिकांच्या गरजेइतकेच पाणी द्यायला हवे. आपण घेत असलेल्या पिकांना लागवडीपासून काढणीपर्यंत नेमके किती पाणी लागते, हेच अनेक शेतकऱ्यांना माहिती नाही. आपण पिकाला पाणी द्यायच्या ऐवजी जमिनीला गरजेपेक्षा अधिक पाणी देतो. कृषी शास्त्रज्ञांनी प्रत्येक पीक व फळबागेला कोणत्या काळात किती पाणी लागते, याची सविस्तर आकडेवारी उपलब्ध आहे. कृषी अभ्यासक्रमासोबतच सर्वांसाठी उपलब्ध आहे. त्याचा वापर आपण केला पाहिजे.
वॉटर (WOTR), पाणी फाउंडेशन, बायफ या आणि अशा अन्य काही संस्था राज्यातील अनेक गावांमध्ये पाण्याचे अंदाजपत्रक, पाण्याचे पासबुक अशा योजना राबवत आहेत. त्यातून पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्याचे नियोजन करण्याची सवय लावण्यासाठी यशस्वी प्रयत्न करत आहेत. पोपटराव पवार व त्यांच्या हिवरे बाजारचे उदाहरण फारच बोलके आहे. मात्र या विचारापासून आजही ९५ टक्क्यांपेक्षा अधिक गावे दूर आहेत.
वॉटर बजेटिंग मुळे हे कळते...
आपल्या गावात पावसामुळे उपलब्ध होणारे एकूण पाणी.
आपल्या गावातून किती पाणी वाहून जाते.
आपल्या गावच्या शिवारात किती पाणी साठवणे शक्य आहे.
ओढा, नदी, कालवे, लिफ्ट या माध्यमातून एकूण किती पाणी आपल्या गावात किंवा आपल्या शिवारात येते.
गावातील लोकसंख्या आणि सर्व जनावरांना वर्षभरासाठी किती पाणी लागते.
त्यासाठी किती पाणी राखीव ठेवावे लागेल.
आपल्या गावात शिल्लक पाणी वा पाण्याची तूट किती आहे, हे समजते.
वॉटर बजेटिंग मुळे हे होईल...
पुरेसा पाऊस आणि अपुरा पाऊस यांची मांडणी प्रत्यक्ष आकडेवारीवर आधारित होईल.
गरजेपेक्षा अधिक पाणी साठवून ठेवता येईल.
पीक व सिंचनाच्या पद्धतीत सुधारणा करून पाण्याची तूट कमी करता येईल.
विहिरीतील, शेततळ्यातील, बंधाऱ्यातील पाणी नक्की किती घनमीटर आहे हे समजल्यामुळे त्यानुसार शिवारातील पिकांचे व हंगामांचे नियोजन करता येईल.
पिकाला पाणी मोजून दिल्यास आपण किती वाया घालवतो, ते कळेल. आपोआप सूक्ष्म व काटेकोर सिंचन पद्धतींना चालना मिळते.
कमीत कमी पाण्यात कमाल उत्पादन मिळविण्याची स्पर्धा शेतकऱ्यात लागून त्याचा अंतिम फायदा गावाला होतो.
भूजल शिल्लक राहिल्यास ‘वॉटर बँक’ संकल्पना वाढीस लागेल.
ग्रामीण विकासाचे मॉडेल अधिक वास्तववादी होईल.
गावकऱ्यांना पाण्याची गरज आकडेवारीत मांडता येऊन धरणे, तलाव यातून हक्काचे पाणी मिळवता येईल.
पाणी टंचाईसाठी गाव व गावकरी बऱ्यापैकी सज्ज असल्यामुळे पाणी पुरवठ्यासाठी ऐनवेळी होणारी सर्वांचीच धावपळ कमी होईल.
जलफलक (गावाचे नाव)
तपशील एकक (माप)
तालुका
गावाचे एकूण क्षेत्रफळ हेक्टरमध्ये
गावातील लोकसंख्या
पिण्याच्या व वापराच्या पाण्याची गरज घनमीटरमध्ये
पिकासाठी वापरले जाणारे पाणी घनमीटरमध्ये
पावसाचे येणारे पाणी घनमीटरमध्ये
परिसरात साठवलेले पाणी घनमीटरमध्ये
वाहून जाणारे पाणी घनमीटरमध्ये
गावाची पाण्याची गरज घनमीटरमध्ये
अजून किती पाणी अडवण्याची संधी घनमीटर
अंदाजपत्रक कसे करतात?
जमा पाणी :
गावच्या पूर्ण क्षेत्रात आलेले पावसाचे एकूण पाणी
अन्य गावातील पावसाचे वाहून येणारे पाणी (अपधाव/रनऑफ).
वाहणाऱ्या पाण्यापैकी अडवलेले पाणी आणि
अडवलेल्या पाण्यापैकी गावाला उपलब्ध होणारे पाणी.
पाणी खर्च :
गावातून वाहून जाणारे पाणी. (अपधाव/रनऑफ)
गावातील सर्व लोकांना पिण्यासाठी व वापरासाठी वर्षभर लागणारे पाणी.
गावातील सर्व गुरांसाठी लागणारे पाणी आणि
गाव शिवारातील सर्व पिकांना लागणारे वर्षभराचे पाणी.
यात अवघड काही नाही. साधी बेरीज वजाबाकी असल्यामुळे कोणाही करू शकतो. मात्र ते मार्गदर्शक असून, गावातील सर्वांचे स्थैर्य आणि समृद्धीचे साधन ठरू शकते. या विषयावर मी आजवर शंभरपेक्षा जास्त कार्यशाळा घेतल्या आहे. त्यातून ती गावे स्वतःचे पाणी बजेट तयार करण्यामध्ये प्रशिक्षित झाली आहेत.
पाण्याचे अंदाजपत्रक कागदावर मांडणे खरं तर काहीच अवघड नाही. खरी कसोटी लागते ती त्या अंदाजपत्रकाप्रमाणे नियोजन करताना आणि त्यासाठी आवश्यकता असते ती लोकसहभागाची. विशेषतः पाण्याची तूट भरून काढण्यासाठी सहमतीने निर्णय घ्यावे लागतात. घेतलेला निर्णय शेवटपर्यंत तडीस नेताना कसोटी लागते. यासाठी लोकांची क्षमता विकसित करण्याची आवश्यकता आहे.
पाणी नियोजनातील छोट्या मोठ्या बाबी, संदर्भ आणि चांगले वाईट परिणाम याविषयी प्रबोधन करायला हवे. खरेतर हे काम जलसंपदा विभाग, भूजल विभाग, पाणीपुरवठा विभाग, ग्राम विकास विभाग, कृषी विभाग, समाज कल्याण विभाग, आपत्ती निवारण विभाग (कारण दुष्काळ ही आपत्तीच आहे ) अशा सर्व खात्यांनी समन्वयाने राबवला पाहिजे. जलयुक्त शिवार योजनेमध्ये अशा क्षमता बांधणीच्या प्रशिक्षणावर भर दिलेला होता. पुणे जिल्ह्यातील वॉटर बजेटच्या ७२ पेक्षा अधिक प्रशिक्षणाचा तर मीही साक्षीदार आहे.
दुष्काळ निवारणात गावचे पाण्याचे अंदाजपत्रकावर काम केले पाहिजे. वैयक्तिक पातळीवरही प्रत्येकाने आपले विहीर, कूपनलिका, शेततळे, कॅनॉल वा अन्य स्रोतांतून उपलब्ध होणारे पाणी आणि आपल्या पिकाला लागणारे पाणी यांचा ताळेबंद मांडला पाहिजे. यातूनच आपण पाण्याचे काटेकोर नियोजनाकडे आणि त्यातून कायमची दुष्काळमुक्तीच्या दिशेने जाऊ शकतो.
अवर्षण व दुष्काळामुळे होणारी उपासमार आणि कुपोषणावर हरितक्रांतीच्या माध्यमातून आपल्या शेतकऱ्यांनीच बऱ्यापैकी मात केली आहे. वैयक्तिक व गाव पातळीवरील पाणी दुर्भिक्षता कायमची दूर करण्यासाठी नीलक्रांती करण्यासाठी आपण शेतकऱ्यांनीच कंबर कसली पाहिजे. प्रत्येकाने स्वतःच्या शेताचे, शिवाराचे, गावाच्या पाण्याचे अंदाजपत्रक करायला हवे. गावाच्या पाणी अंदाजपत्रकाची माहिती व अधिक तक्ते पुढील भागात पाहू.
पाणी वापर संस्थांनीही त्यांच्या क्षेत्रासाठी वैयक्तिक आणि सामूहिक पाण्याचे अंदाजपत्रक बनवणे, हे पीक, पाणी पट्टी आणि शेतकरी या सर्वांच्या हिताचे आहे. तरिही पाणी वापर संस्थांच्या सभासदांच्या क्षमता बांधणीसाठी पाण्याचे अंदाजपत्रक उत्तम साधन ठरेल.
- सतीश खाडे, ९८२३०३०२१८
(लेखक पाणी अभ्यासक असून, पाणी तंत्रज्ञावर लिहिलेल्या ‘अभिनव जलनायक’ पुस्तकाचे लेखक आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.