Agriculture Warehouse  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Warehouse : गोदामाची रचना आणि सुरक्षितता

Warehouse Management : प्रमाणित गोदाम तयार करण्यासाठी आणि तयार केलेले गोदाम प्रमाणित आहे की नाही याची तपासणी वखार विकास व नियामक प्राधिकरणाने तयार केलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे केली जाते. या सूचनांचे पालन करूनच गोदाम निर्मिती करावी.

Team Agrowon

मंगेश तिटकारे, हेमंत जगताप

Agriculture Warehouse Creation : गोदाम निर्मिती हा गोदाम आधारित पुरवठा साखळीचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घेताना गोदामाची वैज्ञानिक व तांत्रिक पद्धतीने उभारणी आवश्यक असून “वखार विकास व नियामक प्राधिकरणाच्या” नियमांचे सुद्धा पालन करणे तितकेच महत्त्वाचे आहे.

गोदामातील व्हेंटिलेटर्स आणि खिडक्यांची रचना

गोदामाच्या निर्मितीमध्ये गोदामातील अंतर्गत प्रकाश व्यवस्था व हवा खेळती राहण्यासाठी व्हेंटिलेटर्स आणि खिडक्यांची रचना अत्यंत महत्त्वाची असते. प्रकाश व्यवस्था व हवेशीरपणा गोदामातील धान्याचा साठा व त्याची गुणवत्ता उत्तम ठेवण्याच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाचा घटक असून, यात दिरंगाई झाल्यास धान्याला बुरशी आणि कीड लागून आर्थिक नुकसानास तोंड द्यावे लागते. गोदामातील उत्तम प्रकाश व्यवस्थेसाठी रोलिंग शटर आणि व्हेंटिलेटर्सची योग्य पद्धतीने उभारणी करावी.

वखार विकास व नियामक प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचनांच्या तपशिलानुसार गोदामात उत्तम प्रकाश व्यवस्थेच्या दृष्टीने गोदामाच्या छताला दोन मिलिमीटर जाडीचा पारदर्शक पॉलीकॉर्बोनेटच्या शीट बसवून घ्यावे. गोदाम हवेशीर होण्यासाठी छताला टर्बो व्हेंटिलेंटर्स बसवावेत.

वास्तविकपणे २००० टन क्षमतेपर्यंत टर्बो व्हेंटिलेंटर्सची आवश्यकता नसते. परंतु हवामान बदल आणि तापमान वाढीमुळे साठवणूक केलेल्या धान्यातील ओलावा प्रमाणापेक्षा कमी होऊन अन्नधान्याच्या वजनामध्ये कमालीची घट संभावते. त्यामुळे आर्थिक नुकसान होऊ शकते. हे नुकसान टाळण्यासाठी टर्बो व्हेंटिलेंटर्स महत्त्वाचे आहे.

हवेतील ओलावा शोषून घेणारी साठवणुकीतील विविध उत्पादने जसे की युरिया, साखर, गूळ, सिमेंट, दूध पावडर इत्यादी उत्पादनांच्या साठवणुकीच्या बाबतीत वातावरणात ओलावा शोषून घेतल्याने अशी उत्पादने खराब होऊ शकतात. अशा परिस्थितीत छताला लावलेले टर्बो व्हेंटिलेंटर्स आणि भिंतीला समोरासमोर असलेली खिडक्यांची रचना अशा दोन्ही पद्धतींमुळे गोदामातील वातावरण हवेशीर राहून साठवणूक केलेल्या उत्पादनांची गुणवत्ता टिकून राहू शकते. टर्बो व्हेंटिलेंटर्स किमान ६० सेंटिमीटर व्यासाचे असावेत. गोदामाच्या छतावर ५ मीटर अंतराने एक टर्बो व्हेंटिलेंटर अशा पद्धतीने त्यांची रचना करण्यात यावी.

धान्यातील कीड नियंत्रण

साठवणूक करण्यात आलेल्या उत्पादनांची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी, नुकसानकारक किटकांपासून संरक्षण करण्यासाठी अॅल्युमिनिअम फॉस्फेटच्या गोळ्या धान्य साठवून ठेवलेल्या पोत्यांच्या बाजूला ठेवून संपूर्ण साठा टार्पोलिनच्या कागदाने झाकण्यात येतो. हा साठा हवाबंद करण्यासाठी वाळूच्या छोट्या बॅग बनवून त्या साठ्याच्या सभोवती टार्पोलिनच्या कागदावर ठेवल्याने गोळ्यांमधून निघणारा गॅस बाहेर न येता पोत्यातील किडींपर्यंत पोहोचून किडीच्या वाढीस प्रतिबंध करतो.

सलग दोन दिवस अशाच परिस्थितीत धान्याचा साठा झाकून ठेवणे आवश्यक असते. तसेच अशा परिस्थितीत रोलिंग शटर्स व टर्बो व्हेंटिलेंटर्स सुद्धा बंद ठेवण्यात येतात. या पद्धतीमुळे विषारी वायू गोदामाच्या बाहेर येण्यास प्रतिबंध होतो.

चोरीपासून संरक्षण

गोदामाच्या खालील बाजूस असणाऱ्या खिडक्या तोडून असामाजिक घटक आतील बाजूस साठवणूक करण्यात आलेल्या धान्याच्या साठ्याचे चोरीच्या उद्देशाने नुकसान करू शकतात. याकरिता खिडक्यांना काचेसहित ६ मिलिमीटर जाडीच्या जाळ्या बसविण्यात याव्यात. रोलिंग शटर्सला सेंट्रल लॉक बसवून घ्यावे जेणेकरून चोरांपासून होणारे नुकसान टाळता येऊ शकेल.

रोलिंग शटर्सला एमएस पद्धतीचे ग्रीलसुद्धा बसवून घेण्यात यावेत, जेणेकरून गोदामातील साहित्य चोरीपासून सुरक्षित राहू शकेल. दिवसासुद्धा गोदाम निर्धोकपणे उघडे ठेवून गोदामातील वातावरण हवेशीर राहू शकेल. रोलिंग शटर्सला लावलेल्या ग्रील्समुळे गोदामात दिवस कोणीही प्रवेश करू शकणार नाही. रोलिंग शटर्सच्या ग्रीलची उंची सुमारे १.२ मीटरपर्यंत असावी, जेणेकरून गोदामात शेळी, मेंढी व गाय यासारखे प्राणी यांना गोदामात शिरण्यापासून अडथळा तयार होईल. गोदामात कामकाज करताना वादळ, वाऱ्यापासून संरक्षण करण्याच्या उद्देशाने समोरासमोरील विरुद्ध दिशेचे रोलिंग शटर्स उघडे ठेवावेत.

इलेक्ट्रिक वायरिंग सुविधा

गोदामाच्या आतील बाजूस इलेक्ट्रिक वायरिंगची सुविधा नसावी. यामुळे गोदामाच्या आतील बाजूस शॉट सर्किटमुळे आग लागून साठविण्यात आलेल्या मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन आर्थिक हानी होऊ शकते. यामुळे शक्यतो गोदामाच्या बाहेरच्या बाजूस विजेची सुविधा करण्यात यावी.

(माहितीचा स्रोत : भारतीय अन्न महामंडळ माहिती पुस्तिका व महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे सनदी अभियंता यांची गोदाम उभारणी विषयक माहिती पुस्तिका)

मातीच्या प्रकारानुसार गोदामाच्या पायाची बांधणी

गोदामाच्या निर्मितीमध्ये पाया अत्यंत महत्त्वाचा आहे. काळी माती पीक लागवडीसाठी उपयुक्त असली तरी बांधकाम क्षेत्रासाठी हीच माती धोकादायक ठरते. उन्हाळ्यात ती आकुंचन पावते आणि पाण्याच्या संपर्कात आल्यास प्रसरण पावते. काळ्या मातीच्या या गुणधर्मामुळे कोणत्याही बांधकामास धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे काळ्या मातीत गोदाम उभारणी करताना पायातील संपूर्ण काळी माती काढून त्यात मुरूम भरावा. याकरिता योग्य ती शासकीय प्रक्रिया पूर्ण करावी. संपूर्ण तांत्रिक मार्गदर्शनासाठी अनुभवी बांधकाम अभियंत्याचे साह् घ्यावे.

पडीक, खडकाळ किंवा टेकडीसदृश जमिनीत पायाची उभारणी करताना कडक मुरूम किंवा मजबूत खडक असेल किंवा जमीन जास्त खोलवर खणण्याची आवश्यकता नसेल तर अशा ठिकाणी पायाभरणी जलदगतीने करता येऊ शकते.

गोदामाचा पाया तयार करताना काळी माती, वालुकामय माती किंवा चिकण माती असेल तर राफ्ट फाउंडेशनमुळे गोदामाच्या पायाची मजबुती वाढते. राफ्ट फाउंडेशन हा पायाचा एक प्रकार असून तो संपूर्ण गोदामाच्या संरचनेला आधार देतो. राफ्ट फाउंडेशनमुळे इमारतीला स्थिरता मिळते. इमारतीला दीर्घायुष्य प्राप्त होते.

कोणतेही बांधकाम सुरू करण्यापूर्वी नियोजित बांधकाम योग्य आहे की नाही याची चाचणी करण्यासाठी ट्रायल पीट किंवा चाचणी खड्डा घेणे आवश्यक असते. या चाचणी खड्यामुळे जमिनीची परिस्थिती व मातीची रचना तपासणे शक्य होते. ट्रायल पीट किंवा चाचणी खड्डयाचा आकार १.५० बाय १.५० बाय १.५० मीटर असावा. खड्डे घेताना जमिनीच्या थरामध्ये काळीमाती अथवा चिकण माती किंवा वालुकामय माती, कच्चा मुरूम, पक्का मुरूम, कडक मुरुमामध्ये दगडाचे मिश्रण, कच्चा खडक व नंतर कठीण खडक असे टप्पे पडतात. प्रत्येक गोदामाला चार चाचणी खड्डे गोदामाच्या पायाच्या चारही कोपऱ्यात घ्यावेत. गोदाम निर्मितीची जागा मोठी असेल आणि गोदामांची संख्या जास्त असेल तर प्रत्येक २०० चौरस फुटांवर चाचणी खड्डे घेऊन त्यावरून नोंदी घ्याव्यात.

गोदामाचा पाया खणताना बऱ्याच वेळा मुरूम, कठीण दगड बाहेर पडतात. या साहित्याची स्वतंत्र साठवणूक करून हेच साहित्य पुढे खड्डे भरण्यासाठी वापरावे, जेणेकरून स्वतंत्ररीत्या बाहेरून कठीण खडक किंवा मुरूम आणण्याची आवश्यकता पडणार नाही. यामुळे शासनाला रॉयल्टी शुल्क भरण्याची गरज पडणार नाही. परंतु जर पाया खणताना कठीण मुरूम व लगेच खडक लागला तर खड्डे व पायाभरणी करताना जास्तीचा मुरूम बाहेरून आणावा लागतो. याकरिता शासनाचे रॉयल्टी शुल्क भरूनच मुरूम व कठीण खडकाचा भुगा आणावा, अन्यथा महसूल विभागाच्या कारवाईस सामोरे जावे लागते, दंड भरावा लागू शकतो. पायामध्ये मुरूम भरताना प्रत्येक १ फुटावर प्लेट व्हायब्रेटर आणि रोलरने दाब देण्यात यावा. प्रत्येक एक फुटावर मुरूम भरल्यानंतर आणि त्यावर दाब दिल्यानंतर लाल तेलाच्या रंगाने खूण करून ठेवावी, जेणेकरून खड्ड्यामध्ये मुरूम योग्यरीत्या भरला गेल्याचे दिसू शकेल.

गोदाम निर्मितीच्या सर्व सूक्ष्म बाबी अथवा घटकांची माहिती घेतल्याने शेतकरी उत्पादक कंपन्या, सहकारी संस्था आणि महिला बचत गटांचे फेडरेशन यांच्यामार्फत विविध योजनांच्या माध्यमातून गोदामांची उभारणी करताना या संस्था सहजपणे गोदाम निर्मितीचे व्यवस्थापन करू शकतात. यामुळे गोदाम व्यवस्थापनातील अभियंत्यासोबत चर्चा करताना या माहितीचा नक्कीच या समुदाय आधारित संस्थांना फायदा होऊ शकतो.

प्रशांत चासकर, ९९७०३६४१३० (शेतीमाल तारण व्यवस्थापन सेवा तज्ज्ञ, प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्या. स्मार्ट, साखर संकुल, पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : मक्याच्या बाजारात चढ उतार; कापूस, सोयाबीन, ज्वारी तसेच काय आहेत आजचे मका दर ?

Rain Update : 'डाना' चक्रीवादळाचा जमिनीवरील प्रवास सुरू; राज्यात रविवारपासून पाऊस? 

Fodder Production : चारा उत्पादन कमी; पावसाने दर्जा खालावला

Agriculture Work : पावसाने उघडीप दिल्याने शेतीकामांनी घेतला वेग

Shaktipeeth Mahamarg : शक्तीपीठ महामार्गावरून सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्यात जुंपली

SCROLL FOR NEXT