Mangaon News : पाऊस लांबल्याने यंदा वलगणीच्या माशांची, खेकडा, चिंबोऱ्यांची खवय्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. पावसाळा सुरू झाला की खेडेगावात वेध लागतात ते वलगणीचे मासे पकडण्याचे. पावसाच्या नदी नाल्यातून येणारे मासे, खेकडे अतिशय चविष्ट व गाभोळीयुक्त असतात.
हे मासे शेतीतून, ओहोळामधून अंडी सोडण्यासाठी मुख्य डोहापासून स्थलांतर करतात. माशांच्या या प्रवासास वलगण लागली असे म्हणतात. पाण्यात अंडी सोडल्यानंतर मासे परतीच्या प्रवासास सुरुवात करतात. यास वलगन उतरणे असे म्हणतात.
पाग, कंडाळ घेऊन भर पावसात वळगणींचे मासे मारण्यासाठी अनेकजण दिवसरात्र एक करतात. या माशांमध्ये मळ्याचे मासे, शिवरे, शिंगट्या प्रसिद्ध आहेत. खोल पाण्यात मासेमारी करण्यापेक्षा अनेक मासेमार वलगणींचे मासे पकडण्यास प्राधान्य देतात.
प्रवाहाविरुद्ध हे मासे पोहतात. यंदा अनेकांचे पाग तयार आहेत, मासे पकडण्यासाठी गरगे घालून तयार आहेत. मात्र पाऊस लांबल्याने ओढे, नाले कोरडे आहेत. त्यामुळे वलगणीच्या माशांची, खेकड्याची चव लवकर चाखायला मिळत नसल्याने खवय्ये नाराज आहेत.
गतवर्षी पाऊस लवकर सुरू झाल्याने वलगणीचे मासे खवय्यांना चाखायला मिळाले होते. वलगणीचे गाभोळीयुक्त मळ्याचे मासे २०० रुपये, शिवड्याचे मासे ४०० रुपये किलो दराने विक्री होतात.
सुरुवातीच्या पावसात मिळणारे मासे अतिशय चविष्ट असतात. छोट्या ओहोळामधून हे मासे पकडले जातात. पाग घेऊन दरवर्षी मासेमारी करतो. यंदा पाऊस लांबल्याने वलगणीची प्रतीक्षा आहे. मात्र पाऊस दमदार झाल्यास एक-दोन दिवसांत
वलगण चढेल. डोहातून, नाल्यांतून वलगणीचे मासे मिळतात. २०० ते ३०० रुपये किलोने मळ्याचे मासे विकत मिळतात.दीपेश केदारी, मत्स्यप्रेमी
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.