Warkari Tradition Agrowon
ॲग्रो विशेष

Tukaram Maharaj Palkhi: भक्तिरसात न्हाहले वैष्णवजन

Dehu to Pandharpur: देहूनगरीत टाळ मृदंगाचा निनाद, नामस्मरणाचा जयघोष, आणि संत तुकारामांच्या पादुकांची महापूजेनंतर पालखीला वारीचे प्रस्थान. संत परंपरेच्या साक्षात दर्शनाचा अनुभव घेत वारकरी भक्तिरसात न्हालेला दिसला. पावसात भिजत, विठ्ठल भेटीच्या आसक्तीत देहू ते पंढरपूरचा वारी सोहळा पुन्हा एकदा सजीव झाला.

Team Agrowon

देहू, जि. पुणे :

दास झालो हरिदासांचा ।

बुद्धिकायामनेंवाचा ।।१।।

तेथे प्रेमाचा सुकाळ ।

टाळ मृदंगकल्लोळ ।

नासें दृष्टबुद्धि सकळ ।

समाधि हरि कीर्तनी ।।धृ।।

ऐकता हरिकथा ।

भक्ती लागे त्या अभक्तां ।।२।।

देखोनि कीर्तनाचा रंग ।

कैसा उभा पांडुरंग ।।३।।

हे सुख ब्रह्मादिकां ।

म्हणे नाहीं नाहीं तुका ।।४।।

पंढरीच्या सावळ्या विठुरायाला भेटण्यासाठी वैष्णवांचा मेळा बुधवारी (ता. १८) देहूतील इंद्रायणी नदीकाठी जमला. निमित्त होते आषाढीवारीचे. विठुरायाला भेटण्यासाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने देहूतून पंढरपूरकडे तीनच्या सुमारास प्रस्थान ठेवले. हातात भगव्या पताका घेऊन आषाढी वारीसाठी जमलेल्या हजारो वारकऱ्यांनी केलेल्या टाळ-मृदंगाचा गजर आणि ज्ञानोबा तुकाराम नामघोषात देहूनगरी दुमदुमली. प्रस्थान सोहळ्याला पावसाने हजेरी लावली. पावसात आणि भक्तिरसात न्हाऊन निघालेल्या वैष्णवांनी आनंदाने पालखीसमोर फेर धरला.

राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो वारकऱ्यांनी संत तुकाराम महाराज मुख्य देऊळवाडा परिसरात पालखी प्रस्थान सोहळा प्रसंग याची देही, याची डोळा अनुभवला. प्रस्थान सोहळ्याचा पारंपरिक कार्यक्रम पहाटे चारपासून सुरू झाला. सर्वांत आधी काकडा झाला. पहाटे साडेचारला देऊळवाड्यातील विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख दिलीप महाराज मोरे, विश्‍वस्त विक्रमसिंह उमराज मोरे, वैभव महाराज मोरे यांच्या हस्ते महापूजा झाली. पहाटे पाच वाजता संत तुकाराम महाराज शिळा मंदिरात अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे, विश्‍वस्त गणेश महाराज मोरे,

लक्ष्मण महाराज मोरे, विक्रमसिंह महाराज मोरे यांच्या हस्ते महापूजा झाली. पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायण महाराज यांच्या समाधी मंदिरातील महापूजा संस्थानचे विश्‍वस्त उमेश महाराज मोरे, लक्ष्मण महाराज मोरे यांच्या हस्ते झाली. वैकुंठस्थान मंदिरातील महापूजा संस्थानचे अध्यक्ष व विश्‍वस्तांच्या हस्ते झाली. सकाळी दहा वाजता पुंडलिक महाराज मोरे यांचे पालखी सोहळ्याचे काल्याचे कीर्तन झाले.

तुझिया सांगाती.. या अभंगावर निरूपण केले. सकाळी साडेदहा वाजता संत तुकाराम महाराजांच्या पादुका देहूतील घोडेकर बंधू (सराफ) यांनी चकाकी देऊन इनामदारवाड्यात आणल्या. पालखी सोहळा प्रमुख दिलीप महाराज मोरे इनामदार यांनी संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची पूजा केली. मानकरी म्हसलेकर दिंडीच्या वतीने तुकोबांच्या पादुका संबळ, टाळ-मृदंग आणि तुताऱ्या वाद्यांसह वाजतगाजत मुख्य मंदिरातील भजनी मंडपात आणण्यात आल्या. दुपारी तीन वाजता देऊळवाड्यातील भजनी मंडपात पालखी प्रस्थान सोहळ्यास सुरुवात झाली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार सुनेत्रा पवार, आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते महापूजा झाली. तसेच पालखी सोहळ्यातील दिंडी क्रमांक २८ मधील विणेकरी आणि पंढरपूर येथील शिवाजी शिंदे या वारकऱ्यास महापूजा करण्याचा मान मिळाला. खासदार श्रीरंग बारणे, आमदार विजय शिवतारे, शंकर मांडेकर व इतर उपस्थित होते. परंपरेनुसार पुण्यातील कोथरूड येथील ग्रामपुजारी सुभाष गणेश टंकसाळे यांनी पौराहित्य केले. पूजा सुरू झाल्यानंतर मानाच्या दिंड्यांना महाद्वारातून प्रवेश देण्यात आला.

मुख्यमंत्र्यांना शासकीय महापूजेचे निमंत्रण

सोलापूर ः पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने निमंत्रण देण्यात आले. निमंत्रण देण्यासाठी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज-औसेकर यांच्या शिष्टमंडळाने मुंबई येथे वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट घेतली. या वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांचा मंदिर समितीच्या वतीने वीणा, वारकरी पटका, श्रींची मूर्ती, उपरणे, चिपळ्या देऊन सन्मान करण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Urea Shortage : युरिया टंचाईवर ग्रीन अमोनियाची मात्रा?

Manikrao Kokate Controversy : बेगानी शादीमें अब्दुल्ला दिवाना

MSP Committee : हमीभाव समितीच्या तीन वर्षांत सहा बैठका

Atal Pension Yojana : आडातच नाही तर पोहऱ्यात येणार कोठून?

Maharashtra ITI upgrade : राज्यातील शंभर ‘आयटीआय’चे बळकटीकरण करणार

SCROLL FOR NEXT