Ashadhi Wari 2025 : अश्व धावता रिंगणी, नाचे विठू काळजात
Nashik News : तुझा पाहूणी सोहळा, माझा रंगला अभंग....गेला शिणवटा सारा, मेघ झाले पांडुरंग..नाम तुकोबाचे घेता, डोले पताका डौलात...अश्व धावता रिंगणी, नाचे विठू काळजात...या उक्तीची अनुभूती रविवारी (ता. १५) निवृत्तीनाथांच्या पालखी सोहळ्यानिमित्ताने सिन्नर तालुक्यातील दातली येथे झालेल्या रिंगण सोहळ्यात आली. टाळ-मृदंगाचा गजर आणि विठ्ठलाचे अभंग गात पंढरीच्या दिशेने चालणाऱ्या पावलांनी या रिंगण सोहळ्यातून पुढच्या प्रवासासाठी अनोख्या चैतन्याची ऊर्जा घेतली.
पालखीचा सकाळी लोणारवाडी येथील मुक्काम हलवल्यावर सिन्नरकरांचे आदरातिथ्य स्वीकारत पालखीसमवेतचे हजारो वारकरी कुंदेवाडी येथे दुपारच्या जेवणासाठी थांबले. तेथून खंबाळे येथील मुक्कामाकडे जात असताना दातलीत हजारो भाविकांच्या उपस्थितीत रिंगण सोहळा पार पडला. सायंकाळी साडेचारच्या सुमारास रिंगणाला सुरुवात झाली.
पालखीसमवेत असलेल्या दिंडीतील विणेकरी, टाळकरी, पखवाज वादक, झेंडेकरी व डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला स्वतंत्र गटाने गोलाकार उभ्या राहिल्या. संत निवृत्तीनाथ महाराज देवस्थानचा मानाच्या अश्व व समवेत संस्थानचा जरीपटका असलेले निशान घेऊन असलेल्या आश्वास रिंगण दाखवण्यात आल्यावर पालखीचे आगमन झाले.
पालखी व दिंड्या रिंगणात दाखल झाल्यावर मृदंग व टाळांच्या गजरात हजारोंच्या मुखातून ‘ज्ञानोबा-तुकाराम’चा नामघोष करीत ठेका धरण्यात आला. झेंडेकरी, विणेकरी, टाळकरी, मृदंग वादक, तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला या क्रमाने सर्वजण रिंगणातून धावले. सर्वांत शेवटी नाथांच्या पालखीसमवेत असलेला मानाच्या अश्वाने प्रदक्षिणा पूर्ण केली.
रिंगण संपल्यावर रिंगणाच्या परिघातच हमामा, फुगडी, हुतूतू, आट्यापाट्या, एकीबेकी हे खेळ टाळ-मृदंगाच्या गजरात सुरू होते. रिंगणात मनसोक्त नाचणारे वारकरी आपला थकवा विसरून पुढच्या प्रवासासाठी नवी ऊर्जा घेऊन पुढच्या प्रवासाला निघाले.
पालखीचे मानकरी बाळकृष्ण महाराज डावरे, मोहन महाराज बेलापूरकर, जयंत महाराज गोसावी, आचार्य डॉ. रामकृष्णदास महाराज लहवितकर, एकनाथ महाराज गोळेसर, कैलास महाराज तांबे, संजय महाराज धोंगडे, चैतन्य महाराज नागरे, सागर महाराज दौंड, चंद्रकांत दादा आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली व दातली ग्रामस्थांच्या सहकार्याने सोहळा पार पडला.
एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील, सहायक निरीक्षक दीपक सुरवाडकर, सिन्नर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संभाजी गायकवाड, वावीचे सहायक निरीक्षक गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी, एक दंगा नियंत्रण पथकाचा बंदोबस्त या वेळी ठेवण्यात आला होता.
पालखी सोहळा प्रमुख गोकुळ महाराज गांगुर्डे, संत निवृत्तीनाथ महाराज देवस्थान त्रंबकेश्वरचे अध्यक्ष सोमनाथ घोटेकर, सचिव श्रीपाद कुलकर्णी, विश्वस्त नारायण मुठाळ, नीलेश गाढवे, जयंत गोसावी, माधवदास राठी, राहुल साळुंखे, अमर ठोंबरे आदींनी सोहळ्यासाठी नियोजन केले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.