Vachanvata Pustak Agrowon
ॲग्रो विशेष

Vachanvata Pustak : जगणं समृद्ध करणाऱ्या ‘वाचनवाटा’

अतुल देऊळगावकर

Book publishing : पाचशे वर्षांपासून पिढ्यान् पिढ्या ज्यांच्या अक्षरधनावर पोसल्या, ते तुकोबा आत्मसंवाद साधताना म्हणत होते,

कोणाच्या आधारे करू मी विचार।

कोण देईल धीर माझ्या जिवा॥

शास्त्रज्ञ पंडित नव्हे मी वाचक।

यातिशुद्ध एक ठाव नाही॥

कठीण प्रसंगातच नव्हे तर एरवीही योग्य मार्गानं जाण्यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या शब्दांना ते रत्न, धन, शस्त्र, जीवन, गौरव, पूजा व देव मानत होते. अनेक ज्ञानी लोकांनी, ‘उत्तम वाचणे - पाहणे व ऐकणे हा ज्ञान मिळवण्याचा सोपा मार्ग आहे.’ हे सांगून ठेवलं आहे. आता सध्याच्या ‘पडदानशीं’ च्या (छोट्या-मोठ्या पडद्यात मग्न) वाचन मंद मंद होत चाललं आहे.

अमेरिकेतील ‘प्यू रिसर्च सेंटर’ ही ना नफा कार्य करणारी विश्वस्त संस्था सामाजिक विषयांवर संशोधन करते. त्यांनी २०१४ मध्ये ‘भ्रमणध्वनीचा (मोबाइल) सामाजिक परिणाम’ या विषयावर सखोल संशोधन करून सांगितलं होतं, ‘‘सामाजिक संवाद चालू असताना नव्वद टक्के प्रौढ हे भ्रमणध्वनी पाहत असतात.

घरीसुद्धा एकत्र बसल्यावर जेवताना, गप्पा चालू असताना पालक त्यावरील संदेश पाहण्यास व उत्तर देण्यास अधिक प्राधान्य देतात. त्यामुळं संवाद नाहीसा झाला आहे, असं ऐंशी टक्के लोकांना वाटतं. स्वत:च्या मुलांशीच संवाद कमी होणं हे भीषण आहे. बालकांच्या भावनिकतेवर आणि व्यक्तिमत्त्व विकासावर होणारे दुष्परिणाम पाहता हा आगीशी खेळ आहे.’’ (नऊ वर्षे उलटल्यावर पुन्हा नव्याने तपासणी केल्यास काय आढळेल?)

शरीराचा वापर न होणारा भाग निकामी होतो, तसा आपसांतील संवाददेखील गळून पडत आहे. मानवी जीवनाचा व संस्कृतीचा, कुटुंबांचा व समाजाचा, नातेसंबंधाचा गाभा असलेला संवादच आता लोकांना नकोसा झाला आहे.

हे अमेरिकेतील सामाजिक मानसशास्त्रज्ञ व शैक्षणिक सल्लागार डॉ. शेरी टर्केल यांच्या लक्षात आल्यामुळे त्या याच्या शोधात निघाल्या आणि त्यातून ‘रिक्लेमिंग कॉन्व्हर्सेशन - द पॉवर ऑफ टॉक इन डिजिटल एज’ हे अनन्यसाधारण महत्त्वाचं पुस्तक आकाराला आलं. टर्केल या उपकरण आणि माणूस यांमधील संबंधांचा शोध सातत्यानं घेत आहेत.

त्या म्हणतात, ‘‘यंत्रे कसलीही मागणी न करता विनाशर्त काम करतात. त्यांच्यापासून फसवणूक होत नाही. ते जवळीक न साधता मैत्री असल्याचा आभास निर्माण करतात. त्यामुळं भावनिक गरजाही भागविल्या जातात. माणसांना यंत्रांच्या मदतीनं आभासी जगात रममाण होणं सुखावह वाटत असून, ते माणसांपेक्षा निर्जीव यंत्रांवर अवलंबून राहणं पसंत करीत आहेत. यामुळे आपण सामाजिक विनाशाच्या उंबरठ्यावर उभे आहोत.’’

प्रगत देशांत कौटुंबिक व सामाजिक पातळीवर संवाद वाढविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा अनुभवांती निष्कर्ष आहे, ‘निसर्ग रपेट व वाचन हे दोन प्रभावी उपाय आहेत.’ निसर्ग भ्रमण व वाचन यांची महती नव्यानं समजावून सांगताना शास्त्रज्ञ आवर्जून सांगत आहेत, ‘‘वाचनामुळं एकाग्रता, स्मरणशक्ती व सहानुभूती यांत वाढ होते. संवाद कौशल्य व नातेसंबंधांमध्ये सुधारणा होते. तणाव कमी होऊन मानसिक आरोग्य सुधारते.’’

प्रत्येकाला ‘उत्तम वाचक होण्यासाठी काय वाचावं? क्रम कसा असावा,’ अशा प्रश्न मालिकांतून जावं लागतंच. ख्यातनाम साहित्यिक डॉ. राजन गवस म्हणतात, ‘‘वाचन महत्त्वाचं आहे, असं म्हणत राहायचं; पण त्यासाठी ठोस काहीही करायचं नाही. यातून आपलं भविष्य कसं घडणार? आपण एखादा विचार सर्वदूर कसा पोहोचविता येईल? याची पद्धत वा शास्त्र तयार करण्याचा विचार कधीही केलेला नाही.

पुस्तक किंवा पुस्तकातील विचार कोणापर्यंत व कसा पोहोचेल? त्याचा त्या विचारांच्या बाजूनं व विरोधात असणाऱ्यांवर काय परिणाम होईल? हे कसं जाणता येईल? त्या विचारांत तसूभर का असेना वाढ व्हावी अशी पुस्तकाकडं नेणारी पद्धत आपण तयार केली नाही. थोडक्यात, वाचनवाढ व्हावी यासाठी आपण पद्धतशीरपणे काहीच केलं नाही.’’

इंग्रजीमध्ये वाचनवाढीला चालना देणाऱ्या पुस्तकांविषयीच्या पुस्तकांचं (बुक्स ऑन बुक्स) समृद्ध दालन आहे. मागील काही वर्षांत डॉ. गवस यांच्या अपेक्षेनुसार मराठीमध्येही अशी पुस्तके येत आहेत. ‘ॲग्रोवन’चे संपादक आदिनाथ चव्हाण यांनी ‘वाचनवाटा’मधून घडविलेली ग्रंथयात्रा हा त्यातीलच एक महत्त्वाचा टप्पा.

‘ॲग्रोवन’ या शेतकरी व शेतीविषयक समग्र दृष्टी देणाऱ्या दैनिकात परंपरा व आधुनिकता याचा उत्तम मिलाफ घडविला जातो. त्यातून शेतीसोबतच राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, पर्यावरणशास्त्र व साहित्यविषयक विविध पैलू सादर केले जातात.

त्याचे संपादक आदिनाथ चव्हाण यांना शेतीसंस्कृती उमजून तिची वर्तमानकाळाशी सांगड कशी घातली जावी, याची जाण आहे. त्यानुसार त्याची विषयपत्रिका ते ठरवत जातात. किंबहुना, त्यांच्यामुळे ‘ॲग्रोवन’ला दर्जेदार व बहुव्यापी तोंडवळा प्राप्त झाला आहे.

आदिनाथ बहुश्रुत व चतुरस्र वाचक असून, दैनंदिन व्यापातून सवड काढत वाचनानंद घेतात. त्यांनी एक वर्ष ‘मला भावलेलं पुस्तक’ ही लेखमाला ‘ॲग्रोवन’मधून चालविली. त्यातून ते माणूस, त्याचं मन व जीवन, त्याचे जगतानाचे संघर्ष, त्याची प्रेमभावना व त्यातून घडणारी दिव्यता यांना भिडवितात.

निसर्गाचं सौंदर्य व गूढता दाखवतात. जगातील अभिजात साहित्य, त्याची महत्ता व समकालीनता जाणवून देत वाचकाला अंतर्मुख करतात. प्रस्तुत पुस्तकातून ते वाचकांना, साहित्यिक विश्वातील एकेक अनमोल नक्षत्र निरखून पाहण्याची रीत दाखवतात.

साहित्यकृतीतून आपली मानसिकता व कुवतीनुसार दरवेळी वेगवेगळे अर्थ निघू शकतात, हे सांगण्यासाठी त्यांनी कॅनव्हास विशाल केला आहे. इतिहास, राजकारण, तत्त्वज्ञान, समाजशास्त्र आणि मानसशास्त्र या क्षेत्रांमध्ये वाचकांनी विषयप्रवेश करावा, ही कळकळ घेऊन ते आपल्याला लिओ टॉलस्टॉय, हेन्री डेव्हिड थोरो, खलिल जिब्रान, ऑस्कर वाइल्ड, अर्नेस्ट हेमिंग्वे, जॉर्ज ऑरवेल, बर्ट्रांड रसेल, गॅब्रिअल गार्सिया मार्केझ, सिग्मंड फ्रॉइड व सिमोन द बोव्हार आदी महानुभावांच्या अनुभव व विचारविश्वाचं प्रतिबिंब असलेल्या महान साहित्यकृतींची यात्रा घडवितात.

कादंबरी ते चित्रपट निर्मिती करताना सादरीकरण कसं पालटत जातं, हे सांगताना ‘शिंड््लर्स लिस्ट’, ‘ॲना कॅरेनिना’, ‘लिटल विमेन’,‘द इयरलिंग’, ‘द मोटारसायकल डायरीज’, ‘दि ब्रिजेस ऑफ मॅडीसन कौंटी’, ‘द ग्रेप्स ऑफ रॉथ’, ‘शेरलॉक होम्स’ यांसारख्या हॉलिवूडच्या चित्रपटांचे वा त्यावर आधारित हिंदी चित्रपटांचे संदर्भ देतात.

त्यांनी लेखमालेसाठी निवडलेली अडतीस पुस्तके पाच गटांत विभागली आहेत. माणूस व माणूसपण जाणून घेणारी- ‘मन वढाय वढाय’, माणसांच्या वाट्याला येणारं जीवन - ‘जिंदगी एक सफर’ व त्यासाठीचा संघर्ष - ‘कभी किसीको मुकम्मल जहॉं नहीं मिलता’, अत्यंत विपरीत परिस्थितीतही बहरणारे उत्कट प्रेम- ‘दो लफ्जों की है’ आणि आत्मशोधात निसर्गरम्यता- ‘निसर्गराजा ऐक सांगतो,’ यातून वाचकाला समृद्ध करणारा साहित्यानुभाव मिळत जातो.

आपल्या सर्वांना माणूस पाहण्याची, त्याची चेहरेपट्टी, देहबोली व कृती यांवरून त्याचा ‘स्व-भाव’ जोखण्याची सवय असते. मात्र ‘स्व’ बदलण्याकडे अजिबात लक्ष नसते. विवेकनिष्ठ मानसशास्‍त्र विकसित करणारे डॉ. अल्बर्ट एलिस म्हणतात, ‘सहसा सर्व घटना एकसारख्या असतात. त्याला मिळणारा प्रतिसाद तीव्र असला, की खटके उडतात व विसंवाद निर्माण होतो.

हे जाणून घेऊन संताप वा दु:खाच्या सातव्या मजल्यावर जाऊन बसू नका. प्रतिक्रियेची तीव्रता कमी करणं हाच विवेक!’ पुढं अंजली जोशी यांनी ‘मी अल्बर्ट एलिस’ या पुस्तकातून दाखवलेला विवेकाचा मार्ग का आवश्यक आहे, हे स्पष्ट करतात.

वाचकांना विश्वासात घेत नवीन विषयांकडं ओढून नेण्याचं कौशल्य असलेले समीक्षक केवळ पुस्तकाचा परिचय करून थांबत नाहीत, त्या त्या लेखकाची जडणघडण, पुस्तकामागील पार्श्वभूमी, ऐतिहासिक महत्त्व आणि त्याची समकालीनता हे उलगडत नेतात. भाषाही उत्तमोत्तम कवींच्या काव्याचा स्पर्श घेऊन वाचकाची अभिजात साहित्याशी जवळीक निर्माण करणारी वापरतात. क्षुद्र व हिंसक वृत्तीचा धिक्कार आणि त्यामागील कार्यकारणभाव सौम्यपणे येतो.

युद्धातील अत्याचारामुळं होरपळणाऱ्या चिमुरड्या ॲन फ्रॅंकच्या डायरीनं जगाला हादरवून सोडले. एकूण ३२० पैकी एकट्या पोलंडमध्ये ३०० छळछावण्या सुरू होतात. अशा भयग्रस्त वातावरणातही एरवी मद्यपी आणि पक्का बाईलवेडा असे विशेषण लाभलेला ऑस्कर शिंड््लर हा कत्तलीसाठी निवडलेल्या बाराशे ज्यूंना हिकमतीने वाचवतो.

त्याची कहाणी थॉमस केनेली यांनी ‘शिंड््लर्स लिस्ट’ या कादंबरीतून मांडली. तिला ‘बुकर’सह अनेक आंतरराष्ट्रीय सन्मान लाभले. ती स्टिव्हन स्पिलबर्ग यांनी मोठ्या पडद्यावरही आणली.

साहित्य आणि निसर्गात रममाण होणारा हेन्री डेव्हिड थोरो याने निसर्गाप्रमाणं स्वत:ला अधिकाधिक शुद्ध करण्याचा ध्यास घेतला होता. १८४५ मध्ये त्यानं अमेरिकेतील कॉन्कॉर्डजवळील ‘वॉल्डन’ या तळ्याकाठी झोपडी बांधून निसर्गस्नेही जीवनपद्धती स्वीकारली. त्यामागील त्याची भूमिका तो सांगतो, ‘‘माझं जगण्यावर प्रेम असल्यानं मला संन्यास घ्यायचा नव्हता. आयुष्याला जोखायचं होतं.

तिन्ही त्रिकाळ निसर्ग जवळून अनुभवायचा होता. जीवनाच्या अत्यावश्यक सत्याला सामोरं जायचं होतं. म्हणून मी जंगलात राहण्यास गेलो.’ त्यानं मांडलेले चिंतन ‘वॉल्डन’ या सार्वकालिक महान पुस्तकातून आपल्यापुढं येतं. ‘पावसाच्या एकाच हलक्या सरीनं हिरव्यागार व टवटवीत झालेल्या गवताला पाहून आपलंही मन प्रफुल्लित होतं, विचारही सकारात्मक होतात.

गवताचं पातं त्यावर पडणाऱ्या प्रत्येक दवबिंदूचा फायदा उठवितं. आयुष्यातील हुकलेल्या संधींचा वृथा शोक करण्यात काय अर्थ आहे? आताचा क्षण जगण्यातच जगण्याचं मर्म दडलं आहे.’

गांधीजी हे थोरोला मन:पूर्वक मानत होते, हे सांगून आदिनाथ लिहितात, ‘स्वत:च्या विवेकबुद्धीला मान्य नसणाऱ्या अन्याय्य व जाचक कायद्यांचं पालन करण्यास नम्रपणे, तरीही ठाम नकार देण्याची संकल्पना थोरो यांनीच प्रथम मांडली. महात्मा गांधी यांनी त्यातूनच ‘सविनय कायदेभंगाचं’ अमोघ अस्त्र निर्माण केलं.’

या पुस्तकातील प्रत्येक लेख म्हणजे विश्व वाङमयातील अजरामर साहित्यकृतींचे रसग्रहणात्मक सार आहे. शिवाय ते संदर्भासह आपल्या दैनंदिन जगण्याशी भिडविलेलं आहे. साहजिकच हे लिखाण आपल्या मनाचा ताबा घेतं, मूळ पुस्तक वाचल्याचा आनंद देतं. उत्तम वाचनाची सवय जडलेल्यांच्या ही वाचनवाटांवर प्रकाश टाकणारा हा ऐवज आहे.

आपल्या सभोवतालच्या अनेक विषयांकडे नेत अंतर्मुख करणारं हे पुस्तक वाचकाला वैश्विकतेची अनुभूती देतं. मनाला विराट करणारी ही विचारांची वैश्विकता भावली,तर पुस्तक व वाचकांमध्ये अडसर असणारे ‘पडदे’ दूर होत जातील. तेव्हा तुकोबा-ज्ञानोबा ते विनोबा आदी प्रभृती, काय व का म्हणाल्या, हे उमजत जाईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Sugar Factory Repayment : आमची राखीव थकहमी द्या

Fruit Crop Insurance : फळपीक विमा योजनेत नियमबाह्य सहभागाबाबत कारवाईसत्र

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

SCROLL FOR NEXT