Uttapa
Uttapa  Agrowon
ॲग्रो विशेष

Santosh Dukre story: एक उत्तप्पा पातळसा...

संतोष डुकरे 

Santosh Dukre Story "ए थांबा ! कसा काय खाता राव तुम्ही हा उत्तप्पा ? याला काय चव हे का ? कडंला जाड, मधी पाताळ... असा कुठं उत्तप्पा असतोय का ?"

पुणे - नाशिक हायवेला नारायणगाव (Narayangaon Bypass) बायपासच्या प्रसिद्ध हॉटेलमध्ये उत्तर नगरकर मित्रानं अर्धा खालेल्या उत्तप्प्याला (Uttapa) खोडा घातला आणि माझ्या कपाळाला आठ्या पडल्या.

"काय राव... उतप्प्या सारखाच उतप्पाय की... जाड पाताळ होणार थोडंफार !" मी आपली जुंद्री बाजू सावरुन घ्यायचा प्रयत्न केला. मात्र नगरी गडी दुप्पट उसळला.

"तुमची ही अशी कसंही चालवून घ्यायची, अॅडजस्ट करायची, समोर येईल त्या पदार्थाला चांगलं म्हणायची सवय ना... घरी चांगलीय. बाहेर पडलं की ती सोडत जा. नाय तं काय खरं नाय !" काळे-कोल्हे स्टाईलनं हे सुनावत त्यानं दराऱ्यात वेटरला हाक मारली.

आता नक्की राडा होणार. कारण खोट काढायला उत्तप्पा एवढाही वाईट नव्हता. खूप चांगला नसला तरी वाईट नक्कीच नव्हता. पण इथं नूर वेगळाच होता.

वेटर आला. तो काही बोलायच्या आत त्याच्यावर क्षेपणास्रांचा मारा सुरु झाला. "याला काय उत्तप्पा म्हणतात काय राव... चब बिव काय विषय हाय का नाय... ?" पहिल्याच झटक्यात वेटर गारद.

"बदलून देतो !" हे त्याचं तहाचं वाक्य आलं आणि फर्मान सुटलं, "उत्तप्पा नको आता, कट स्पंज डोसा... त्यावर चीज किसून टाक आणि टेस्टी करायला सांग, नाही तर तो पण परत घेवून जावा लागंल."

वेटर गेला, मस्त सजवलेलं नवीन ताट घेवून आला. मंडळी खुष झाली. पुढचा कार्यक्रम सुरळीत पार पडला. नाश्तापाणी करुन निरोप घेवून ते गेले, पण गणगणीत टाकून गेले...

खरंच उतप्पा बदलून घ्यावा, खाऊ नये एवढा खराब होता ? की त्याऐवजी दुसरं खायची लहर आली म्हणून आडगेपणाच्या बळावर फुकटात एक डिश सरप्लस मिळवली गेली ? बरं असं करुन जी काही भेटलं असेल त्यानं खरंच तृप्त झाला असेल आत्मा ? नक्की सुख कशाचं भेटलं असेल... अन्नाचं की कशी एक डीश जादा मिळवून पोटभर खाल्लं या सायकॉलॉजिकल ऑरगॅझमचं.

बरं... वेटरनं तरी एका शब्दानंही आडवं न लावता बिनबोभाट शांततेनं कसा स्विकारला हा आक्षेप ? त्यांनी फॉल्ट आपलेसा केला... की फॉल्टी ग्राहक ? की शंभरात असं एखादं आडमुठं ग्राहक येणार आणि त्याला अशाच शांत, बिनबोभाट, अन्नासोबत खोडीच्या पातळीवरही तृप्ती देण्याचं धोरणच आहे हॉटेलचं. त्यांच त्यांना माहीत...

कळत नाही... आपण आपल्या मवाळपणात अडकतो... की जहालपणाच्या अभावात... की विषयाला भिडण्याच्या पद्धतीत... की अतिपरिचयात पुढच्याला आपल्याला गुंडाळू देण्यात ? आक्षेपी मित्र आणि साक्षेपी वेटर... वागणं आणि व्यवहाराचे अनेक अव्यक्त पट उलगडून गेले जाता जाता. अर्थातच, उलगडणूकीचा खर्च ३२० रुपये कॅश पेड करावा लागला तो भाग वेगळा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT