Rural Story मे १९९५ चा कडकडीत उन्हाळा. संत्याची पाचवीची परीक्षा नुकतीच संपलेली. गावात भैरवनाथाची यात्रा (Rural Fair) होती. नव्या कोऱ्या पॅंट व शर्टमध्ये बापाने दिलेले दहा रुपये दोन जागी ठेवून संत्या बैलगाड्यांच्या शर्यती (Bullock Cart Race) पहायला गेला.
घरी पाव्हणे रावळे आलेले. त्याच्याहून पाच सात वर्षांनी मोठ्या आत्तेभावानं भर उन्हात संत्याला घाटाजवळ गाठला. काहीही केलं तर मेव्हणाच तो. मामाचं पोरगं म्हणजे त्याचं ठरलेलं गिऱ्हाईक. त्याने टिंगल करायला सुरवात केली.
"काय भावड्या जत्राये राव तुमची. जिलंबी, भजी काय चारणार का नाय ? ह्ये काय बरुबर नाय राव, पाव्हण्याला उपाशी ठेवायचं आन् बैलगाडं पाहात फिरायचं.'' "आण्णा तुपल्याकं लय पैसं हायेत. तुच खावू घाल मला. लय भूक लागली."
"माझ्याकडं नाईत पयसं आज. ह्यं बघ खिसं.'' संत्याला सात आत्तेभाऊ. सगळेजण एकत्र येऊन वेळ मिळेल तेव्हा टिंगल करायचं. अण्णा आघाडीवर असायचा. संत्याला बोलता यायचं नाही. गप हेट्या ऐकून घ्यायचा.
आज मात्र संत्याला संधी दिसली. मनातल्या मनात प्लॅन तयार झाला. "च्यायला आण्णा, पयसं कमी हायत रं. पाचच रुपयं दिलं दादानी. जिलाबी नाय. पण रस घ्यंऊ उसाचा. चल.''
भोळा संत्या रस पाजायला तयार झाल्यावर अण्णाचं डोळं लुकलुकलं. चोराची लंगोटी.. रस तर रस याचं काय घ्या, म्हणून अण्णा रस प्यायला निघाला. दोघे जरा गर्दीच्या ठिकाणी लामखड्याच्या चरखाच्या पालात रस प्यायला गेले.
"आण्णा, घ्ये तुला काय घ्यायचंय ! पण परत परत टुमकावणं लावायचं नाय... पावण्याला हे पाज, पावण्याला ते पाज म्हून''"
"दोन फुल ग्लास रस द्या ओ....'' आण्णानं पाण्याचा मग हाती घेत रसावाल्या पोऱ्याला ऑडर दिली. लगेचच लिंबाच्या फोडी पिळलेले, बर्फ टाकलेले दोन रसाचे ग्लास भरुन आले.
संत्याच्या हाती ग्लास पडल्याबरोबर त्यानं तो पटकन तोंडाला लावला. आण्णा ग्लास हाती धरेपर्यंत संत्याचा ग्लास रिकामा झाला.
अण्णानं अतिव समाधानानं, चेहऱ्यावरच्या रेषा हसवत ग्लास तोंडाला लावल्याबरोबर संत्या बाकड्यावर बसल्या बसल्या मागे पाय फिरवून गर्दीत पसार झाला. (वीस वर्षे उलटली या घटनेला.
तेव्हाचा शाळकरी आण्णा आता मोठा मास्तर झालाय. मात्र अजूनही तो रसाच्या धक्क्यातून सावरतोय. रस पाज, जिलेबी किंवा भजी खाऊ घाल, असं तो चुकूनही कधी म्हणत नाही. पाहू पुढच्या यात्रेला योग आला तर त्याला परत एकदा उसाचा रस पाजेन म्हणतोय.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.