Warehouse Management Agrowon
ॲग्रो विशेष

Warehouse Management : गोदाम व्यवस्थापनात ‘ब्लॉकचेन’चा वापर

Blockchain Technology : ब्लॉकचेन तंत्रज्ञान हे गोदाम व्यवसायातील भागधारकांची साखळी तयार करण्यास मदत करते. गोदाम मालक, बँक, शेतकरी कंपनी, व्यापारी इत्यादी गोदाम साखळीशी निगडित भागधारकांच्या प्रत्येक व्यवहाराच्या नोंदीचे शाश्‍वत जतन ब्लॉकचेन तंत्रज्ञानातून करता येते.

Team Agrowon

मंगेश तिटकारे, हेमंत जगताप

Agriculture Warehouse : राज्यात विविध प्रकल्पांच्या माध्यमातून गोदाम, शीतगृहांची निर्मिती केल्यानंतर या पायाभूत सुविधा कार्यान्वित करणे व त्यातून उत्पन्न मिळविणे हे फार मोठे आवाहन प्रकल्पासमोर व सर्व समुदाय आधारित संस्थांसमोर असणार आहे. सध्या भारतात गोदाम व्यवस्थापनाशी निगडित तंत्रज्ञान केंद्रीय गोदाम महामंडळाच्या बरोबरीने काही गोदाम व्यवस्थापनातील मोठ्या कंपन्या वापरत आहेत. गोदाम सेवा देणाऱ्या भारतातील गोदाम क्षेत्राशी निगडित कंपन्या गोदाम व्यवस्थापनात कोणत्याही प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करीत नव्हत्या. परंतु काळाची पावले ओळखून त्यांनी तंत्रज्ञान वापरास सुरवात केली आहे.

गोदाम क्षेत्रात सद्यःस्थितीत गोदाम मालक/ चालक, अर्थसाह्य पुरवठादार कंपन्या आणि गोदामात धान्य साठवणूक करणारे ग्राहक (शेतकरी, व्यापारी, प्रक्रियादार, खरेदीदार व निर्यातदार) यांच्यात विश्‍वासदर्शक वातावरणाची कमतरता आहे. याचे निराकरण करण्याचा आणि व्यवहार सुलभ करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे गोदाम व्यवस्थापनात ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर. ब्लॉकचेन तंत्रज्ञान हे गोदाम व्यवसायातील भागधारकांची साखळी तयार करण्यास मदत करते.

गोदाम मालक, बँक, शेतकरी कंपनी, व्यापारी इत्यादी गोदाम साखळीशी निगडित भागधारकांच्या प्रत्येक व्यवहाराच्या नोंदीचे शाश्‍वत जतन ब्लॉकचेन तंत्रज्ञानाद्वारे करण्यात येते. या साखळीचा प्रत्येक सदस्य जतन केलेल्या व्यवहाराच्या नोंदीच्या संग्रहामध्ये प्रवेश करून साठवणूक केलेल्या मालाशी निगडित संपूर्ण माहिती घेऊ शकतो. ज्यामुळे संकलित माहितीची पारदर्शकता व मालाच्या माहितीचे मूळ याची गुणवत्तापूर्ण माहिती मिळाल्याने गोदाम साखळीतील भागधारकांमध्ये विश्‍वासपूर्ण वातावरण निर्मिती होऊन उत्तम व्यवहारांमुळे गोदाम व्यवसाय वाढीस मदत होऊ शकते. या उपक्रमामुळे शेतीमालाच्या मूल्यसाखळीत कार्यरत विविध भागीदार यांच्याकरिता बाजारपेठ अधिक सुरक्षित होण्यास हातभार लागू शकतो.

ब्लॉकचेन प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी व ही व्यावसायिक साखळी निर्माण करण्यासाठी गोदाम व्यवसायातील भागधारक जसे की गोदाम मालक, बँक, शेतकरी कंपन्या, सहकारी संस्था, प्रक्रियादार, निर्यातदार आणि व्यापारी यांची या ब्लॉकचेन साखळीची नियमावली व संरचनेसाठी पूर्वसंमती असणे अत्यंत आवश्यक असते. यासाठी सर्व सभासदांकडे सॉफ्टवेअर असणे आवश्यक असते. गोदामात धान्य स्वीकारताना व नियमित कालावधीमध्ये धान्याच्या लॉटची गुणवत्ता चाचणी करणे, त्याचा अहवाल बनविणे याबाबतही नियमावली बनविणे आवश्यक असते. याप्रकारची माहिती गोदाम साखळीतील प्रत्येक भागधारकला ब्लॉकचेन तंत्रज्ञानाद्वारे मिळते. तसेच खरेदीदाराला उपलब्ध शेतमालाचा साठा आणि त्याची गुणवत्ता याची माहिती पारदर्शकरीत्या उपलब्ध होणार असल्याने व्यवहार सुलभरीत्या होऊ शकतो.

तंत्रज्ञानाचा वापर

ब्लॉकचेन तंत्रज्ञान वापरण्यात अग्रभागी असणाऱ्या संस्थामध्ये उत्तम उदाहरण म्हणजे महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ. मागील काही वर्षांत महामंडळाने तंत्रज्ञान वापरामध्ये चांगली प्रगती केली आहे. ब्लॉकचेन तंत्रज्ञान निर्मिती करणाऱ्या खासगी सेवापुरवठादार कंपनीच्या साह्याने महामंडळाने राज्यात शेतकरी, व्यापारी, राज्य सहकारी बँक व स्वत: महामंडळ अशा सर्व भागधारकांना एका छत्राखाली आणून गोदाम पावती योजनेचे बळकटीकरण करण्यात मोठा हातभार लावला आहे.

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळामार्फत गोदाम पावती योजनेत शेतकऱ्यांना गोदाम भाड्यात ५० टक्के सूट व शेतकरी उत्पादक कंपन्यांना २५ टक्के सूट देऊन शेतीमालाच्या एकूण किमतीच्या ७० टक्के कर्ज ९ टक्के व्याजदराने राज्य सहकारी बँकेच्या साह्याने दिले जाते. शेतकऱ्यांना ५ लाख आणि शेतकरी कंपनीला ७५ लाख रुपयांच्या मर्यादेत कर्ज दिले जाते. हे कर्ज देण्यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञान वापरण्यात येत असून, महामंडळामार्फत सुमारे १८०.८६ कोटींचे कर्जवाटप शेतकरी तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांना २४ तासाच्या आत देण्यात या तंत्रज्ञानाचा मोठा वाटा आहे. आज अखेर सुमारे ६,९७४ शेतकरी आणि ३०६ शेतकरी उत्पादक कंपन्यांनी अनुक्रमे १६६.३७ कोटी रुपये आणि १४.४९ कोटी रुपये डिजिटल कर्जाचा फायदा घेतला आहे.

कर्ज मंजुरी व वितरण ही प्रक्रिया तसे पहिले तर खूप वेळखाऊ आहे. यापूर्वी हेच कर्ज मंजुरी देऊन पुढे शेतकऱ्याच्या हातात पोहोचण्यासाठी किमान सात दिवसांचा कालावधी लागायचा. परंतु आता ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा अवलंब केल्याने प्रक्रिया अत्यंत वेगवान झाल्याने सर्व भागीदार महाराष्ट्र राज्य वखार महामंडळामार्फत करण्यात येणाऱ्या व्यवहाराबाबत खूप समाधानी आहेत.

महाराष्ट्र वखार महामंडळामार्फत जागतिक बँक अर्थसाह्यित स्मार्ट प्रकल्पाच्या साह्याने डिजिटायझेशनमध्ये आणखी एक पाऊल उचलण्यात आले. २०२१-२२ पासून महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाने ब्लॉकचेनद्वारे खासगी सेवापुरवठादाराद्वारे गोदाम पावती योजनेची अंमलबजावणी सुरू केली. या घटकाच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर सुमारे १४० सेंटरवर सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत. जेणेकरून गोदाम परिसरातील सर्व प्रकारच्या हालचालींवर लक्ष ठेवून विविध निरीक्षणांच्या आधारे गोदामाच्या कामकाजविषयक व भविष्यातील धोरणांविषयी नियोजन करणे शक्य होऊ शकेल.

या यंत्रणेमुळे शेतीमालाच्या चोरीवर नियंत्रण, शेतीमालाच्या प्रत्यक्ष साठवणुकीदरम्यान देखरेख, शेतीमालाच्या गाड्या आणि मालाची आवक जावक विषयक संनियंत्रण, गोदाम व्यवस्थापनात सुसूत्रता, गोदामात व परिसरातील अपघातविषयक प्रकरणांबाबत प्रत्यक्ष निरीक्षणे, गुणवत्ता नियंत्रण विषयक व्यवस्थापन तसेच फिडेलिटी म्हणजेच कर्मचारीवर्गाशी निगडित कामकाजविषयक तक्रारींचे व्यवस्थापन अशा सर्व प्रकारच्या घटनांवर नियंत्रण ठेवता येईल. महामंडळाची राज्यातील सर्व गोदामे मुख्यालयातील यंत्रणेमार्फत एका क्लीकवर पाहणे व त्यावर नियंत्रण ठेवणे शक्य होऊ शकेल.

यापुढील काळात गोदामात किती शेतीमाल आहे हे खरेदीदाराला बसल्या जागेवरूनच पहायचे असेल तर तशा प्रकारची व्यवस्थासुद्धा डिजिटायझेशनमुळे शक्य असेल. सद्यःस्थितीत सॅटेलाइटद्वारे सुद्धा गोदाम पाहता येऊ शकते परंतु गोदामाच्या आतल्या भागातील मालाचे निरीक्षण करावयाचे असेल तर असे तंत्रज्ञान खर्चिक असून, परदेशातील सॅटेलाइट ही सुविधा काही प्रमाणात शुल्क घेऊन पुरवू शकतात.

कृषी क्षेत्रात यापुढील काळात ब्लॉकचेन तंत्रज्ञानामुळे मोठे बदल होणार आहेत. पीक उत्पादन, काढणी पश्‍चात तंत्रज्ञान, बाजारपेठेशी निगडित माहिती, शेतीमाल साठवणूक व्यवस्थापन, वित्तीय व्यवस्थापन, बँकेमार्फत होणारे आर्थिक व्यवस्थापन, शेतीमाल गुणवत्तेबाबत विश्‍वासार्हता, व्यापारविषयक प्रक्रिया, अन्न व व्यापार परवाना या सर्व घटकांमध्ये सुसूत्रता आल्यामुळे शेतीचा शाश्‍वत विकास होण्यास मदतच होणार आहे.

प्रशांत चासकर, ९९७०३६४१३०,

(शेतीमाल तारण व्यवस्थापन सेवा तज्ज्ञ, प्रकल्प अंमलबजावणी कक्ष,

महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्या. स्मार्ट, साखर संकुल, पुणे)

Chart

प्रशांत चासकर, ९९७०३६४१३०,

(शेतीमाल तारण व्यवस्थापन सेवा तज्ज्ञ, प्रकल्प अंमलबजावणी कक्ष,

महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्या. स्मार्ट, साखर संकुल, पुणे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gharkul Yojana : ग्रामीण भागातील घरकुलांना शहरीप्रमाणे निधी द्या

Women Entrepreneur : महिला उद्योजकांनी विक्री व्यवस्था उभारणे आवश्यक ः आवटे

Soybean Procurement : सोयाबीन खरेदीला धाराशिवमध्ये वेग

Mahayuti Press Conference : महाराष्ट्रातील हा ऐतिहासिक विजय असून लाडक्या बहिणींनी अंडरकरंट दिला; महायुतीच्या पत्रकार परिषदेतून शिंदे, फडणवीस, अजित पवार यांची मविआवर टीका

Onion Cultivation : एक लाख हेक्टरपर्यंत पोहोचले कांदा लागवड क्षेत्र

SCROLL FOR NEXT