Orchards Measures Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Garden Measures : अवकाळी पाऊस, गारपीटग्रस्त बागेत करावयाच्या उपाययोजना

Team Agrowon

डॉ. दिनेश पैठणकर, डॉ. योगेश इंगळे

Unseasonal Rain, Hail in the Garden Management : विदर्भात ९ ते १२ एप्रिल या कालावधीत वादळी वाऱ्यासहित कमी अधिक प्रमाणात पावसासोबत गारपीट झालेली आहे. अवकाळी पावसासोबत गारपीट झाल्याने संत्रा, लिंबू व मोसंबी बागांचे नुकसान संभवते. अशा वेळेस नुकसानग्रस्त बागांची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच आंबिया व हस्त बहराचे व्यवस्थापन काटेकोर करणे आवश्यक आहे.

गारपिटीमुळे झाडांची झालेली हानी

झाडाच्या फांद्यावरील आणि खोडावरील सालीला जखमा होतात. या जखमांतून विविध बुरशींचे संक्रमण होण्याची शक्यता असते. त्यात प्रामुख्याने फायटोप्थोरा, कोलेटोट्रीकम, डिप्लोडीया, ॲल्टरनेरिया यांसारख्या बुरशींचा जखमांमधून शिरकाव होऊन रोगांचा प्रसार वाढतो.

झाडांच्या पानांवर गारांचा मार बसल्यामुळे पाने फाटतात व गळतात. त्यामुळे झाडांतील अन्नद्रव्ये तयार करण्याची प्रक्रिया मंदावते.

झाडांवरील आंबिया बहराच्या छोट्या फळांची तसेच हस्ताच्या लिंबू फळांची मोठ्या प्रमाणात गळ होते.

करावयाच्या उपाययोजना

अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे बागेतील झाडांना झालेल्या जखमा लवकरात लवकर भरून निघणे गरजेचे आहे. तसेच झाडांना संतुलित अन्नपुरवठा होणे आवश्यक आहे. त्याकरिता खालीलप्रमाणे उपाययोजना कराव्यात.

गारपिटीमुळे मोडलेल्या फांद्या आरीच्या साह्याने कापाव्यात. कापलेल्या भागावर बोर्डो पेस्ट (१:१:१०) लावावी. गारपीटग्रस्त झाडाच्या बुंध्यास १ मीटर उंचीपर्यंत बोर्डो पेस्ट लावावी.

झाडाची साल फाटली असल्यास, पोटॅशिअम परमॅंग्नेट (१ टक्का) १० ग्रॅम प्रति लिटर पाण्याच्या द्रावणाने स्वच्छ पुसून घ्यावी. जखमेवर बोर्डो पेस्ट (१:१:१०) लावावी.

झाडांची मुळे उघडी पडली असल्यास, मातीची भर द्यावी. उन्मळून पडलेल्या झाडांना बांबू किंवा बल्लीच्या साह्याने आधार देऊन झाड उभे करावे.

झाडांची मुळे उघडी पडली असल्यास वाफ्यामध्ये सायमोक्झॅनिल अधिक मॅन्कोझेब (संयुक्त बुरशीनाशक) २ ग्रॅम किंवा मेटॅलॅक्झिल अधिक क्लोरोथॅलोनील (संयुक्त बुरशीनाशक) या बुरशीनाशकांची २ मिलि प्रति लिटर पाणी याप्रमाणात द्रावण करून (८ ते १० लिटर द्रावण प्रति झाड) या प्रमाणात वापरावे.

गारपीटग्रस्त झाडांवर कॉपर ऑक्सिक्लोराइड ३ ग्रॅम प्रति लिटर किंवा बोर्डो मिश्रण (चुना ६०० ग्रॅम अधिक मोरचूद ६०० ग्रॅम अधिक १०० लिटर पाणी) या बुरशीनाशकांची फवारणी करावी.

गारपीटग्रस्त झाडांना खते देऊन अन्नद्रव्यांचा पुरवठा करावा. त्याकरिता अमोनियम सल्फेट १ किलो प्रति झाड याप्रमाणे द्यावे. शक्य असल्यास चिलेटेड स्वरूपातील सूक्ष्म अन्नद्रव्ये (झिंक अधिक कॅल्शिअम अधिक फेरस सल्फेट मिश्र घटक) ०.२ टक्का प्रमाणात फवारणी करावी. गारपीटग्रस्त झाडांवर कॅल्शिअम नायट्रेट (१ टक्का) १ किलो अधिक जिबरेलिक ॲसिड २ ग्रॅम प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्यामुळे झाडावरील पानांच्या संख्येत वाढ होईल.

आंबिया बहराच्या बागेतील गळून पडलेली फळे गोळा करून त्यांची योग्य विल्हेवाट लावावी.

सद्यःस्थितीतील आंबिया बहर व लिंबू बागेचे नियोजन

सध्या आंबिया बहरातील संत्रा किंवा मोसंबी बागेतील फळे बोर ते लिंबू आकाराएवढी झालेली आहेत. फळांची निरोगी वाढ होण्याकरिता तसेच फळांनी आकार घेण्याकरिता जिबरेलिक ॲसिड १.५ ग्रॅम (१५ पीपीएम) अधिक १३:०:४५ हे खत १ किलो अधिक १०० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.

सततच्या ढगाळ वातावरणामुळे तसेच पावसानंतर झालेल्या जखमांमुळे आंबिया बहराच्या बागेतील फळांवर बुरशीचे संक्रमण होण्याची शक्यता आहे. त्यासाठी संपूर्ण झाडावर कॉपर ऑक्सिक्लोराइड (५० डब्ल्यूपी) ३ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

पावसामुळे कागदी लिंबावरील खैऱ्या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. त्यासाठी कॉपर ऑक्सिक्लोराइड ३० ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोमायसीन* एक ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

डॉ. दिनेश पैठणकर, ७०३८०३७६४२, (अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प (फळे) डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT