Disaster Management Agrowon
ॲग्रो विशेष

Disaster Management : आपत्ती व्यवस्थापनाकडे सार्वत्रिक दुर्लक्ष

Team Agrowon

अमोल साळे

Natural Disaster : पाणी आणि आग या दोन गोष्टी भयंकर धोकादायक असतात, याचं भान ठेवलं नाही तर मृत्यू कधीही गाठू शकतो. लोक पाण्याला सहज घेतात. पावसाळ्यात नदी, नाल्यात उतरणं धोकादायक ठरू शकतं, या साध्या बाबीकडे दुर्लक्ष केलं जातं. पोहायला येत नसताना, लोक विहिरीच्या पाण्याजवळ, तळ्यावर, शेततळ्यावर जातात आणि मृत्यू पावतात. हे सहज टाळण्यासारखं आहे. पण आपण आपत्ती व्यवस्थापन तर शिकत नाहीच, पण अनुभवातूनही काहीच धडा घेत नाही, हे दुर्देवी आहे. गाव पातळीवर आपत्ती व्यवस्थापनाचे धडे गिरवणे खरोखर खूपच आवश्यक आहे.

आपत्ती व्यवस्थापन हे एक शास्त्र आहे. मी किल्लारी भूकंपानंतर त्याचा अभ्यास केला. आंध्र प्रदेशातील पूरग्रस्त भागात जाऊन काम बघितलं. बरचसं हिंदी, इंग्रजी साहित्य वाचलं. १९९९६-९७ च्या सुमारास ‘गावपातळीवरील आपत्ती व्यवस्थापन’ नावाची एक पुस्तिका काढली. पुण्यातील ‘यशदा’ने या पुस्तिकेचे वितरण केले. याच काळात दिल्लीत देशभरातील निवडक सनदी अधिकाऱ्यांची आठवडाभराची आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा झाली. लातूरचे तत्कालीन अतिरिक्त जिल्हाधिकारी डी. आर. बनसोड यांच्या सोबात मलाही निमंत्रण होतं. पत्रकार, सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी एकमेव होतो. हे सगळं मी केव्हाच विसरून गेलो. पण आपत्ती व्यवस्थापन विसरलं नाही. ते डोक्यात पक्कं बसलं आहे. पण ते आता स्वत:पुरतंच आहे.

खरे तर आपत्ती व्यवस्थापनाचा शालेय स्तरावरील अभ्यासक्रमात समावेश होणे गरजेचे आहे. त्याचा अभ्यास केला तर पर्यटनातील संभाव्य धोक्यांची कल्पना येऊन अपघाती मृत्यू टळू शकतात. किल्ले, नद्या, तलाव, धबधबे या ठिकाणी होत असलेल्या मृत्यूंना केवळ अज्ञान कारणीभूत आहे. पाण्याचं गांभीर्य माहीत नसलेले लोक अति उत्साहात बळी पडत आहेत. हे दुःखद आहे. भुशी डॅमवर नुकतंच एक कुटुंब वाहून गेलं. पंधरा-वीस फुटांची एखादी मजबूत दोरी कोणाकडं असती तरी कोणीही दगावलं नसतं. अर्थात, अशी दोरी सोबत ठेवण्यासाठी त्याला आपत्तीपूर्व व्यवस्थापन म्हणजे काय ते माहीत असावं लागतं.

मी सातत्याने पर्यटन करतो. अनेक किल्ले, डोंगर फिरलोय. मी चांगलं पोहतो. दोन वर्षांपूर्वी कोकणात चिपळूणला आशुतोष जोशी या मित्राकडं गेलो होतं. आम्ही कोकणात कितीतरी अवघड जागी फिरलो. धबधब्याच्या उगमस्थानापासूनचा प्रवास थ्रीलिंग होता. हात-पाय मोडू शकला असता. पण त्यात जिवाची जोखीम नव्हती. आम्ही नदीच्या पाण्यात पोहलो. सोबत एक १२ वर्षांचा मुलगाही होता. त्याचे डॉक्टर असलेले वडीलही होते. सगळे पट्टीचे पोहणारे व माहीतगार होते. आम्ही बरेच समुद्रकिनारे पालथे घातले. मी नेपाळमधील आठ दिवसांचा कठीण ट्रेक केला. पण प्रत्येक प्रवास भावनेने नाही तर विचाराने केला.

कुठं काय धोके आहेत, काय घडू शकतं याचा विचार करूनच मी फिरतो. तीन आठवड्यांपूर्वी उत्तराखंडला जाऊन अवघड खलिया ट्रेक केला. मी एकटाच होतो; पण प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घेतला. काही पर्यटक माझ्या पाठोपाठ येत आहेत, याची खात्री करूनच मी पुढे झालो. ती चढण कठीण, दमवणारी असली तरी मी खलिया झीरो पॉइंट गाठू शकतो, याची खात्री मला होती. अनुभवातून निर्माण झालेला हा विश्‍वास अनाठायी नव्हता. माझ्यासोबत पाणी आणि ड्रायफ्रूट्स होते. घसरून पडण्यासारखा रस्ता नव्हता. या सगळ्यांचा विचार करूनच मी चढाईचा निर्णय घेतलेला होता. आपली क्षमता काय, याचं भान पर्यटनात ठेवावंच लागतं.

पाणी आणि आग या दोन गोष्टी भयंकर धोकादायक असतात, याचं भान ठेवलं नाही, तर मृत्यू कधीही गाठू शकतो. लोक पाण्याला सहज घेतात. पावसाळ्यात नदी, नाल्यांत उतरणं धोकादायक ठरू शकतं, या साध्या बाबीकडे दुर्लक्ष केलं जातं. पोहायला येत नसताना, लोक विहिरीच्या पाण्याजवळ, तळ्यावर, शेततळ्यावर जातात आणि मृत्यू पावतात. हे सहज टाळण्यासारखं आहे. पण आपण आपत्ती व्यवस्थापन तर शिकत नाहीच, पण अनुभवातूनही काहीच धडा घेत नाही, हे दुर्देवी आहे. गाव पातळीवर आपत्ती व्यवस्थापनाचे धडे गिरवणे खरोखर खूपच आवश्यक आहे.

(लेखक लातूर येथील शेतकरी व ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Modi In Wardha : मोदींच्या हस्ते अमरावतीतील टेक्स्टटाईल पार्कचं भूमिपूजन; कापूस उत्पादकांना होणार फायदा?

Cotton Bollworm : गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी कीटक मिलन व्यत्यय तंत्रज्ञान

Sericulture : रेशीम शेतीसाठी तुतीच्या सुधारित जाती

Vegetables Market : कोल्हापूर बाजारात टोमॅटो दरात वाढ; कोथिंबीरचे अचानक दर घसरले, कांद्याची आवक वाढली

Water Conservation : जलसंधारणासह जयपूरची पर्यावरणात आघाडी

SCROLL FOR NEXT