Nashik News : राज्यात हेलावून टाकणाऱ्या महिनाभरातील हुंडाबळीच्या घटनांमुळे समाजातील या दुष्ट चालीरीती आणी त्यावरील उपायांबाबत विचारमंथन करण्यासाठी मराठा विद्या प्रसारक (मविप्र) समाज, नाशिक, मराठा महासंघ–नाशिक शाखा, यशवंतराव चव्हाण सेंटर नाशिक तसेच विविध सामाजिक संघटनांतर्फे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. या वेळी लग्नातील अवाजवी खर्चाला फाटा दिला जावा. यासह हुंडापद्धतीविरोधात विविध सामाजिक संघटनांची वज्रमूठ करण्यात आली आहे.
गावाकडील अल्पभूधारक गरीब शेतकरी आणि गर्भश्रीमंत, नवश्रीमंत लोकांची परंतु दोघांतही एक गोष्टीची समानता दिसते ती म्हणजे ‘लग्नाबाबतीत भावकी, नातेवाईक आणि इतर चारचौघे काय म्हणतील?’ या खोट्या सामाजिक प्रतिष्ठेच्या भीतीतून कित्येक वर्षे अनेक जण प्रसंगी कर्ज काढून मोठ्या थाटामाटात लग्न समारंभ पार पाडतात.
मुलांचे शिक्षण जितके वाढले, जितक्या चांगल्या नोकऱ्या मिळवल्या, दुर्दैवाने सर्वच नाही परंतु अनेक जणांचे हुंड्याचे अक्षरशः दर ठरलेले असतात. यातून प्रसंगी वधूपक्षास नाडले जाते, छळ केला जातो. गेल्या महिनाभरात या हुंडापद्धतीचे बळी ठरलेले प्रसंग समोर आले आहेत. या गंभीर विषयावर मंथन करण्यासह जनजागृती केली जाणार आहे.
मविप्र सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे म्हणाले, की हुंडापद्धती, सति प्रथा आणि यासारख्या वाईट चालीरीती ज्या त्या काळातील समाजात परंपरा म्हणून स्वीकारलेल्या होत्या, त्याविरुद्ध आयुष्यभर झिजून महापुरुष व समाजसुधारकांनी सुसंस्कृत महाराष्ट्र आपल्या हाती दिला. त्यांचा अखंड त्याग आणि परिश्रमाने परिवर्तन होत बहुजनवर्ग शिकला, सुशिक्षित झाला.
परंपरा आणि आधुनिकतेची सांगड घालीत अनेकविध क्षेत्रात सर्वच समाजांतील तरुण मुलेमुली प्रगती करत आहेत. एका बाजूला ही प्रगती दिसते तर दुसऱ्या बाजूला सर्व समाजात विशेषतः मराठा समाजात एक सामाजिक दरी दिसते. अनेक महिला त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराबाबत सांगत नाहीत किंवा वेळ निघून गेल्यावर सांगतात अशा प्रसंगात महिलांनी खंबीर होत दाद मागितली पाहिजे.
पोलिस, महिला आयोग, न्यायालये हे मदतीसाठी आहेत. ज्याला व्हिसल ब्लोअर म्हणतो त्या पद्धतीने महिलांनी आपल्यावरील अन्यायाबाबत अथवा त्यांच्या संबंधितांनी डोळ्यादेखत होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध त्वरित आवाज उठवला पाहिजे, असे आवाहन या वेळी करण्यात आले.
या प्रसंगी माजी प्राचार्य डॉ. हरीश आडके, कालिकादेवी ट्रस्ट संचालक केशव पाटील, मराठा महासंघातर्फे चंद्रकांत बनकर, मराठा उत्कर्ष विवाहसंस्थेचे अरुण पळसकर, मविप्र उपाध्यक्ष विश्वास मोरे, संचालक विजय पगार आदी उपस्थित होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.